भुपाळ्याचे अभंग

भुपाळ्या

भुपाळ्या

योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।

पाहता पाहता मना न पुरे धणी ॥१॥

देखिला देखिला माये देवांचा देवो ।

फिटला संदेहो निमाले दुजेपण ॥२॥

अनंत रुपे अनंत वेषें देखिले म्यां त्यासी ।

बाप रखुमादेवीवरू खुण बाणली कैसी ॥३॥

अवताराची राशी तो हा उभा विटेवरी ।

शंखचक्रगदापद्म सहित करी ॥१॥

देखिला देखिला देवा आदिदेव बरवा ।

समाधान जीवा पाहता वाटे गे माये ॥२॥

सगुण चतुर्भुज रुपडे तेज पुंजाळती ।

वंदी चरणरज नामा विनवितसे पुढती ॥३॥

करूनी विनवणी पायी ठेवितो माथा ।

परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ॥१॥

अखंडित असावे ऐसे वाटते पायी ।

साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥२॥

असो नसो भाव आलो तुझिया ठाया ।

कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया ॥३॥

तुका म्हणे तुझी वेडी वाकुडी ।

नामे भवपाश हाते आपुल्या तोडी ॥४॥

माझे चित्त तुझे पायी । राहे ऐसे करी कांही ।

धरोनिया बाही । भव हा तारी दातारा ॥१॥

चतुरा तू शिरोमणी । गुण लावण्याची खाणी ।

मुकुट सकळा मणि । धन्य तूचि विठोबा ॥२॥

करी या तिमिराचा नाश । उदय होऊनि प्रकाश ।

तोडी आशापाश । करी वास हृदयी ॥३॥

पाहे गुंतलो नेणता । माझी असो तुम्हा चिंता ।

तुका ठेवी माथा । पायी आता राखावे ॥४॥

ऐसी वाट पाहे काही निरोप का मूळ ।

का हो कळवळा तुम्हा उमटेचिना ॥१॥

अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे ।

लावूनिया आसे चाळवुनी ठेविले ॥२॥

काय जन्मा येऊनिया केली म्यां जोडी ।

ऐसे घडोघडी चित्ता येतो आठव ॥३॥

तुका म्हणे खरा न पविजे विभाग ।

धिक्कारिते जग हाचि लाहे हिशोब ॥४॥

बोलोनिया दाऊ का तुम्ही नेणा जी देवा ।

ठेवाल ते ठेवा ठायी तैसा राहेन ॥१॥

पांगुळले मन कांही नाठवे उपाय ।

म्हणऊनि पाय जीवी धरुनि राहिलो ॥२॥

त्याग भोग दुःख काय सांडावे मांडावे ।

ऐसी धरियेली जीवे माझ्या थोर आशंका ॥३॥

तुका म्हणे बाळ माता चुकलिया वनी ।

न पवता जननी दुःख पावे विठ्ठले ॥४॥

का गा केविलवाणा केलो दीनाचा दीन ।

काय तुझी हीन शक्ति झालिसे दिसे ॥१॥

लाज वाटे मना तुझा म्हणविता दास ।

गोडी नाही रस बोलिलीया सारिखी ॥२॥

लाजविलीं मागे संताची हीं उत्तरे ।

कळो येते खरे दुजे एकावरुनि ॥३॥

तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी ।

प्रसादा वांचूनि तुमचिया विठ्ठला ॥४॥

जळो माझे कर्म वाया केली कटकट ।

झाले तैसे तट नाही आले अनुभवा ॥१॥

आता पुढे धीर काय देऊ या मना ।

ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे ॥२॥

गुणवंत केलो दोष जाणायासाठी ।

माझे माझे पोटी बळकट दूषण ॥३॥

तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा ।

बरवा हा लळा पाळियेला शेवटी ॥४॥

जळोत ती येथे उपजविती अंतराय ।

सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥

आता मज साह्य येथे करावे देवा ।

घेई सेवा सकळ गोवा उगवोनी ॥२॥

भोगे रोगा जोडोनिया दिले आणिका ।

अरुचि ते हो का आता सकळापासूनि ॥३॥

तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी ।

नाही ये लौकिकी आता मज वर्तणे ॥४॥

१०

न सांगता तुम्हा कळो येते अंतर ।

विश्वी विश्वंभर परिहारचि नलगे ॥१॥

परि हे अनावर आवरिता आवडी ।

अवसान ते घडी पुरो एकी देत नाही ॥२॥

काय उणे मज येथे ठेविलिये ठायीं ।

पोटा आलो तई पासूनिया समर्थे ॥३॥

तुका म्हणे अवघी आवरिली वासना ।

आता नारायणा दुसरियापासूनी ॥४॥

११

तुजसवे आम्ही अनुसरलो अबळा ।

नको अंगी कळा राहो हरी हीन देऊ ॥१॥

सासुरवासा भीतो जीव ओढे तुजपाशीं ।

आता दोहींविषी लज्जा राखे आमुची ॥२॥

न कळता संग झाला सहज खेळता ।

प्रवर्तली चिंता मागिलाचि यावरि ॥३॥

तुका म्हणे असता जैसे तैसे बरवे ।

वचन या भावे वेचुनिया विनटलो ॥४॥

१२

कामे नेले चित्त नेदी अवलोकूं मुख ।

बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय ॥१॥

का गा सासुरवासी मज केले भगवंता ।

आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही ॥२॥

प्रभातेसीं वाटे तुमच्या यावे दर्शना ।

येथे न चले चोरी उरली राहे वासना ॥३॥

येथे अवघे वाया गेले दिसती सायास ।

तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा ॥४॥

१३

चित्ती तुझे पाय डोळा रुपाचे ध्यान ।

अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥

हेचि एक तुम्हा देवा मागणे दातारा ।

उचित ते करा माझा भाव जाणोनि ॥धृ॥

खुंटले जाणीव माझे बोलणे आता ।

कळो यावी तैसी करा बाळाची चिंता ॥३॥

तुका म्हणे आता नको देऊ अंतर ।

कळे पुढे काय बोलू विचार ॥४॥

१४

येई वो येई धावोनिया ।

विलंब का वाया लावियेला कृपाळे॥१॥

विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके ।

कुठे गुंतलीस माये विश्वव्यापके ॥२॥

न करी न करी न करी आता आळस अव्हेरू ।

व्हावया प्रगट कैसी दूरी अंतरू ॥३॥

नेघे नेघे नेघे माझी वाचा विसावा ।

तुका म्हणे हावा हावा हावा साधावा ॥४॥

१५

आता कोठे धांवे मन ।

तुझे चरण देखिलिया ॥१॥

भाग गेला शीण गेला ।

अवघा झाला आनंद ॥२॥

प्रेमरसे बैसली मिठी ।

आवडी लाठी मुखासी ॥३॥

तुका म्हणे आम्हां जोगे ।

विठ्ठल घोगे खरे माप ॥४॥

|| ज्ञानेश्वर माउली ||
|| ज्ञानराज माउली तुकाराम ||
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने