संत तुकाराम अभंग गाथा १३०१ ते १४००

संत तुकाराम अभंग १३०१ ते १४००

संत तुकाराम गाथा

अभंग १३०१ ते १४००

अभंग १३०१
देवावरिल भार । काढूं नये कांहीं पर ॥१॥
तानभुके आठवण । घडे तें बरें चिंतन ॥ध्रु.॥
देखावी नििंश्चती । ते चि अंतर श्रीपती ॥२॥
वैभव सकळ । तुका मानितो विटाळ ॥३॥
अभंग १३०२
थुंकोनियां मान । दंभ करितों कीर्तन ॥१॥
जालों उदासीन देहीं । एकाविण चाड नाहीं ॥ध्रु.॥
अर्थ अनर्थ सारिखा । करूनि ठेविला पारिखा ॥२॥
उपाधिवेगळा । तुका राहिला सोंवळा ॥३॥
अभंग १३०३
काय हएाचें घ्यावें । नित्य नित्य कोणें गावें ॥१॥
केलें हरिकथेनें वाज । अंतरोनी जाते निज ॥ध्रु.॥
काम संसार । अंतरीं हे करकर ॥२॥
तुका ह्मणे हेंड । ऐसे मानिती ते लंड ॥३॥
अभंग १३०४
वदे साक्षत्वेंसीं वाणी । नारायणीं मििश्रत ॥१॥
न लगे कांहीं चाचपावें । जातों भावें पेरीत ॥ध्रु.॥
भांडार त्या दातियाचें। मी कैचें ये ठायीं ॥२॥
सादावीत गेला तुका । येथें एकाएकीं तो ॥३॥
अभंग १३०५
ऐसी जिव्हा निकी । विठ्ठल विठ्ठल कां न घोकी ॥१॥
जेणें पाविजे उद्धार । तेथें राखावें अंतर ॥ध्रु.॥
गुंपोनि चावटी । तेथें कोणा लाभें भेटी ॥२॥
तुका ह्मणे कळा । देवाविण अमंगळा ॥३॥
अभंग १३०६
साजे अळंकार । तरि भोगितां भ्रतार ॥१॥
व्यभिचारा टाकमटिका । उपहास होती लोकां ॥ध्रु.॥
शूरत्वाची वाणी । रूप मिरवे मंडणीं ॥२॥
तुका ह्मणे जिणें । शर्त्तीविण लाजिरवाणें ॥३॥
अभंग १३०७
मानामान किती । तुझ्या क्षुल्लका संपत्ती ॥१॥
जा रे चाळवीं बापुडीं । कोणी धरिती तीं गोडी ॥ध्रु.॥
रििद्धसिद्धी देसी। आह्मीं चुंभळें नव्हों तैसीं ॥२॥
तुका ह्मणे ठका । ऐसें नागविलें लोकां ॥३॥
अभंग १३०८
पाहातोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥१॥
वरि ठेवूं दे मस्तक । ठेलों जोडूनि हस्तक ॥ध्रु.॥
बरवें करीं सम । नको भंगों देऊं प्रेम ॥२॥
तुका ह्मणे चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥३॥
अभंग १३०९
भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि ॥१॥
विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥ध्रु.॥
निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें । कांहीं च सांकडें पडों नेदी ॥२॥
तुका ह्मणे सत्य कर्मा व्हावें साहे । घातलिया भये नकाऩ जाणें ॥३॥
अभंग १३१०
तों च हीं क्षुल्लकें सखीं सहोदरें । नाहीं विश्वंभरें वोळखी तों ॥१॥
नारायण विश्वंभर विश्वपिता । प्रमाण तो होतां सकळ मिथ्या ॥ध्रु.॥
रवि नुगवे तों दीपिकाचें काज । प्रकाशें तें तेज सहज लोपे ॥२॥
तुका ह्मणे देहसंबंध संचितें । कारण निरुतें नारायणीं ॥३॥
अभंग १३११
यज्ञ भूतांच्या पाळणा । भेद कारीये कारणा । पावावया उपासना । ब्रह्मस्थानीं प्रस्थान ॥१॥
एक परी पडिलें भागीं । फळ बीजाचिये अंगीं । धन्य तो चि जगीं । आदि अंत सांभाळी ॥ध्रु.॥
आवशक तो शेवट । मागें अवघी खटपट । चालों जाणे वाट । ऐसा विरळा एखादा ॥२॥
तुका होवोनि निराळा । क्षराअक्षरावेगळा । पाहे निगमकळा । बोले विठ्ठलप्रसादें ॥३॥
अभंग १३१२
वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाखविलें ॥१॥
तुझीं वर्में तूं चि दावूनि अनंता । होतोसी नेणता कोण्या गुणें ॥ध्रु.॥
यज्ञाचा भोक्ता तरि कां नव्हे सांग । उणें पडतां अंग क्षोभ घडे ॥२॥
वससी तूं या भूतांचे अंतरीं । तरि कां भेद हरी दावियेला ॥३॥
तपतिर्थाटणें तुझे मूतिऩदान । तरि कां अभिमान आड येतो ॥४॥
आतां क्षमा कीजे विनवितो तुका । देऊनियां हाका उभा द्वारीं ॥५॥
अभंग १३१३
जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा ॥१॥
पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें ॥ध्रु.॥
फुटोनियां दोन्ही भाग होऊं पाहे । पाहातोसी काय हृदय माझें ॥२॥
घेऊनि जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें काहींहीं न चले येथें ॥३॥
तुका ह्मणे माझी तूं होसी जननी । आणीक निर्वाणीं कोण राखे ॥४॥
अभंग १३१४
अभक्त ब्राह्मण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥१॥
वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ध्रु.॥
ऐसा हा निवाडा जालासे पुराणीं । नव्हे माझी वाणी पदरींची ॥२॥
तुका ह्मणे आगी लागो थोरपणा । दृिष्ट त्या दुर्जना न पडो माझी ॥३॥
अभंग १३१५
नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥
माप टाकी सळ धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटीं लावी तुका ॥३॥
अभंग १३१६
द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥
आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥ध्रु.॥
सेवटील स्थळ निंच माझी वृित्त । आधारें विश्रांती पावइऩन ॥२॥
नामदेवापायीं तुक्या स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥३॥
अभंग १३१७
त्रिपुटीच्या योगें । कांहीं नव्हे कोणां जोगें । एक जातां लागें । एक पाठीं लागतें ॥१॥
मागें पुढें अवघा काळ । पळों नये न चले बळ । करितां कोल्हाळ । कृपे खांदां हरि वाहे ॥ध्रु.॥
पापपुण्यात्मयाच्या शक्ती । असती योजिल्या श्रीपती । यावें काकुलती। तेथें सत्तानायेका ॥२॥
तुका उभा पैल थडी । तरि हे प्रकाश निवडी । घातल्या सांगडी । तापे पेटीं हाकारी ॥३॥
अभंग १३१८
देखण्याच्या तीन जाती । वेठी वार्ता अत्यंतीं ॥१॥
जैसा भाव तैसें फळ । स्वातीतोय एक जळ ॥ध्रु.॥
पाहे सांगे आणि जेवी । अंतर महदांतर तेवी ॥२॥
तुका ह्मणे हिरा । पारखियां मूढां गारा ॥३॥
अभंग १३१९
अनुभवें अनुभव अवघा चि साधिला । तरि िस्थरावला मनु ठायीं ॥१॥
पिटूनियां मुसे आला अळंकार । दग्ध तें असार होऊनियां ॥ध्रु.॥
एक चि उरलें कायावाचामना । आनंद भुवनामाजी त्रयीं ॥२॥
तुका ह्मणे आह्मी जिंकिला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ॥३॥
अभंग १३२०
ऐसिया संपत्ती आह्मां संवसारी । भोगाचिया परि काय सांगों ॥१॥
काम तो कामना भोगीतसे देवा । आिंळगणें हेवा चरण चुंबीं ॥ध्रु.॥
शांतीच्या संयोगें निरसला ताप । दुसरें तें पाप भेदबुिद्ध ॥२॥
तुका ह्मणे पाहें तिकडे सारिखें । आपुलें पारिखें निरसलें ॥३॥
अभंग १३२१
राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एक चि सकळ दुजें नाहीं ॥१॥
मंगळावांचूनि उमटेना वाणी । अखंड चि खाणी एकी रासी ॥ध्रु.॥
मोडलें हें स्वामी ठावाठाव सेवा । वाढवा तो हेवा कोणा अंगें ॥२॥
तुका ह्मणे अवघें दुमदुमिलें देवें । उरलें तें गावें हें चि आतां ॥३॥
अभंग १३२२
निवडोनि वाण काढिले निराळे । प्रमाण डोहळे यावरि ते ॥१॥
जयाचा विभाग तयासी च फळे । देखणें निराळें कौतुकासी ॥ध्रु.॥
शूर तो ओळखे घायडायहात । येरां होइल मात सांगायासी ॥२॥
तुका ह्मणे माझी केळवते वाणी । केला निजस्थानीं जाणवसा ॥३॥
अभंग १३२३
याजसाटीं केला होता आटाहास्ये । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥
आतां नििश्चतीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥
ह्मणे मुिक्त परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥
अभंग १३२४
भक्तीचिया पोटीं रत्नाचिया खाणी । बह्मींची ठेवणी सकळ वस्तु ॥१॥
माउलीचे मागें बाळकांची हरी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥ध्रु.॥
जेथील जें मागे तें रायासमोर । नाहींसें उत्तर येत नाहीं ॥२॥
सेवेचिये सत्ते धनी च सेवक । आपुलें तें एक न वंची कांहीं ॥३॥
आदिअंताठाव असे मध्यभाग । भोंवतें भासे मग उंचासनी ॥४॥
भावारूढ तुका जाला एकाएकीं । देव च लौकिकीं अवघा केला ॥५॥
अभंग १३२५
सांगतां दुर्लभ ज्ञानाचिया गोष्टी । अनुभव तो पोटीं कैचा घडे ॥१॥
भजनाचे सोइऩ जगा परिहार । नेणत्यां सादर चित्त कथे ॥ध्रु.॥
नाइकवे कानीं साधन उपाय । ऐकतो गाय हरुषें गीत ॥२॥
नव्हे आराणूक जावयासी वना । वेध कामिमना हरिकथेचा ॥३॥
काळाच्या साधना कोणा अंगीं बळ । चिंतना मंगळ अष्टप्रहर ॥४॥
तुका ह्मणे आह्मी खेळों भातुकुलें । विभागासी मुलें भोळीं येथें ॥५॥
अभंग १३२६
जाणपण बरें देवाचे शिरीं । आह्मी ऐसीं बरीं नेणतीं च ॥१॥
देखणियांपुढें रुचे कवतुक । उभयतां सुख वाढतसे ॥ध्रु.॥
आशंकेचा बाधा नाहीं लडिवाळां । चित्त वरि खेळा समबुिद्ध ॥२॥
तुका ह्मणे दिशा मोकऑया सकळा । अवकाशीं खेळा ठाव जाला ॥३॥
अभंग १३२७
वचनांचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे ॥१॥
जातां घरा मागें । उरों नेणें खंती । मिळाल्या बहुतीं फांकलिया ॥ध्रु.॥
उदयीं च अस्त उदयो संपादला । कल्पनेचा केला जागेपणें ॥२॥
जाणवूनि गेला हांडोरियां पोरां । सावध इतरां करुनी तुका ॥३॥
अभंग १३२८
याति शूद्र वैश केला वेवसाव । आदि तो हा देव कुळपूज्य ॥१॥
नये बोलों परि पािळलें वचन । केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ॥ध्रु.॥
संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥२॥
दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥३॥
लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥४॥
देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥५॥
आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥६॥
कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियां ॥७॥
गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥८॥
संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥९॥
टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥१०॥
वचन मानिलें नाहीं सहुदाऩचें । समूळ प्रपंचें वीट आला ॥११॥
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१२॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥१३॥
यावरि या जाली कवित्वाची स्फूतिऩ । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥१४॥
निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१५॥
बुडविल्या वहएा बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥१६॥
विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होइऩल उशीर आतां पुरे ॥१७॥
आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥
भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥
तुका ह्मणे माझें सर्व भांडवल । बोलविले पांडुरंगें ॥२०॥
अभंग १३२९
ऐका वचन हें संत । मी तों आगळा पतित । काय काजें प्रीत । करीतसां आदरें ॥१॥
माझें चित्त मज ग्वाही । सत्य तरलों मी नाहीं । एकांचिये वांहीं । एक देखीं मानिती ॥ध्रु.॥
बहु पीडिलों संसारें । मोडीं पुसें पिटीं ढोरें । न पडतां पुरें । या विचारें राहिलों ॥२॥
सहज सरलें होतें कांहीं । द्रव्य थोडें बहु तें ही । त्याग केला नाहीं । दिलें द्विजां याचकां ॥३॥
िप्रयापुत्रबंधु । यांचा तोडिला संबंधु । सहज जालों मंदु । भाग्यहीन करंटा ॥४॥
तोंड न दाखवे जना । शिरें सांदी भरें राणां । एकांत तो जाणां । तयासाटीं लागला ॥५॥
पोटें पिटिलों काहारें । दया नाहीं या विचारें । बोलावितां बरें । सहज ह्मणें यासाटीं ॥६॥
सहज वडिलां होती सेवा । ह्मणोनि पूजितों या देवा । तुका ह्मणे भावा । साटीं झणी घ्या कोणी ॥७॥
अभंग १३३०
बरें जालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली ॥१॥
अनुतापें तुझें राहिलें चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ध्रु.॥
बरें जालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ढोरें गुरें ॥३॥
बरें जालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा ॥४॥
> बरें जालें तुझें केलें देवाइऩल । लेंकरें बाइऩल उपेिक्षलीं ॥५॥
तुका ह्मणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासीं जागरण ॥६॥ ॥३॥
अभंग १३३१
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु.॥
बंधनापासूनि उकलली गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥२॥
तुका ह्मणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रितें ॥३॥
अभंग १३३२
मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥१॥
आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥
जालों बरा बळी। गेलों मरोनि तेकाळीं ॥२॥
दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥३॥
अभंग १३३३
जग अवघें देव । मुख्य उपदेशाची ठेव ॥१॥
आधीं आपणयां नासी । तरि उतरे ये कसीं ॥ध्रु.॥
ब्रह्मज्ञानाचें कोठार । तें हें निश्चयें उत्तर ॥२॥
तुका ह्मणे ते उन्मनी । नास कारया कारणीं ॥३॥
अभंग १३३४
साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचें ॥१॥
पिक्षयासी नाहीं मारगीं आडताळा । अंतराक्षी फळासी चि पावे ॥ध्रु.॥
भक्तीची जोडी ते उखत्या चि साटीं । उणें पुरें तुटी तेथें नाहीं ॥२॥
तुका ह्मणे आलें सांचत सांचणी । आजि जाली क्षणी एकसरें ॥३३॥
अभंग १३३५
नाहीं येथें वाणी । सकळां वणाअ घ्यावी धणी ॥१॥
जालें दर्पणाचें अंग । ज्याचा त्यासी दावी रंग ॥ध्रु.॥
एका भावाचा एकांत । पीक पिकला अनंत ॥२॥
तुका खळे दाणीं । करी बैसोनी वांटणी ॥३॥
अभंग १३३६
ठेविलें जतन । करूनियां निज धन ॥१॥
जयापासाव उत्पित्त । तें हें बीज धरिलें हातीं ॥ध्रु.॥
निवडिलें वरळा भूस । सार आइन जिनस ॥२॥
तुका ह्मणे नारायण । भाग संचिताचा गुण ॥३॥
अभंग १३३७
भ्रमना पाउलें वेचिलीं तीं वाव । प्रवेशतां ठाव एक द्वार ॥१॥
सार तीं पाउलें विठोबाचीं जीवीं । कोणीं न विसंभावीं क्षणभरि ॥ध्रु.॥
सुलभ हें केलें सकळां जीवन । काुंफ्कावें चि कान न लगेसें ॥२॥
तुका ह्मणे येथें सकळ ही कोड । पुरे मूळ खोड विस्ताराचें ॥३॥
अभंग १३३८
कांहीं जाणों नये पांडुरंगाविण । पाविजेल सीण संदेहानें ॥१॥
भलतिया नावें आळविला पिता । तरि तो जाणता कळवळा ॥ध्रु.॥
अळंकार जातो गौरवितां वाणी । सर्वगात्रा धणी हरिकथा ॥२॥
तुका ह्मणे उपज विल्हाळे आवडी । करावा तो घडी घडी लाहो ॥३॥
अभंग १३३९
बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ ॥१॥
तया मूर्ख ह्मणावें वेडें । कैसें तुटेल सांकडें ॥ध्रु.॥
दावितिया वाट। वेठी धरूं पाहे चाट ॥२॥
पुढिल्या उपाया । तुका ह्मणे राखे काया ॥३॥
अभंग १३४०
मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥१॥
वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥ध्रु.॥
अगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥२॥
तुका ह्मणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥३॥
अभंग १३४१
वेश वंदाया पुरते । कोण ब्राह्मण निरुते ॥१॥
ऐसें सांगा मजपाशीं । संतां निरवितों येविशीं ॥ध्रु.॥
असा जी प्रवीण । ग्रंथीं कळे शुद्धहीण ॥२॥
तुका ह्मणे लोपें । सत्याचिया घडती पापें ॥३॥
अभंग १३४२
ज्या ज्या आह्मांपाशीं होतील ज्या शिक्त । तेणें हा श्रीपती अळंकारूं ॥१॥
अवघा पायांपाशीं दिला जीवभाव । जन्ममरणाठाव पुसियेला ॥ध्रु.॥
ज्याचें देणें त्यासी घातला संकल्प। बंधनाचें पाप चुकविलें ॥२॥
तुका ह्मणे येथें उरला विठ्ठल । खाये बोले बोल गाये नाचे ॥३॥
अभंग १३४३
आह्मी आळीकरें । प्रेमसुखाचीं लेंकुरें ॥१॥
पायीं गोविली वासना । तुश केलें ब्रह्मज्ञाना ॥ध्रु.॥
येतां पाहें मुळा । वाट पंढरीच्या डोळां ॥२॥
तुका ह्मणे स्थळें । मग मी पाहेन सकळें ॥३॥
अभंग १३४४
आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशीं ॥१॥
आतां सांडोनि भोजन । भिके जावें वेडेपणें ॥ध्रु.॥
उसंतिली वाट । मागें परतावें फुकट ॥२॥
तुका ह्मणे वाणी । वेचों बैसोन ठाकणीं ॥३॥
अभंग १३४५
धन्ये शुद्ध जाती । धरीं लौकरी परती ॥१॥
ऐकिलें तें चि कानीं । होय परिपाक मनीं ॥ध्रु.॥
कळवळा पोटीं । सावधान हितासाठीं ॥२॥
तुका ह्मणे भाव । त्याचा तो चि जाणां देव ॥३॥
अभंग १३४६
जीवित्व तें किती । हें चि धरितां बरें चित्तीं ॥१॥
संत सुमनें उत्तरें । मृदु रसाळ मधुरें ॥ध्रु.॥
विसांवतां कानीं । परिपाक घडे मनीं ॥२॥
तुका ह्मणे जोडी । हाय जतन रोकडी ॥३॥
अभंग १३४७
अभिमानाची स्वामिनी शांति । महत्त्व घेती सकळ ॥१॥
कळोनि ही न कळे वर्म । तरि श्रम पावती ॥ध्रु.॥
सर्व सत्ता करितां धीर । वीर्यां वीर आगळा ॥२॥
तुका ह्मणे तिखट तिखें । मृदसखें आवडी ॥३॥
अभंग १३४८
भोजन तें पाशांतीचें । निंचें उंचें उसाळी ॥१॥
जैशी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिता ॥ध्रु.॥
कल्पना ते देवाविण । न करी भिन्न इतरीं ॥२॥
तुका ह्मणे पावे भूती । ते नििंश्चती मापली ॥३॥
अभंग १३४९
पोटापुरतें काम । परि अगत्य तो राम ॥१॥
कारण तें हें चि करीं । चित्तीं पांडुरंग धरीं ॥ध्रु.॥
प्रारब्धी हेवा । जोडी देवाची ते सेवा ॥२॥
तुका ह्मणे बळ । बुद्धी वेचूनि सकळ ॥३॥
अभंग १३५०
बहुतां जन्मां अंतीं । जोडी लागली हे हातीं ॥१॥
मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरीं पांडुरंगीं भाव ॥ध्रु.॥
बहु केला फेरा । येथें सांपडला थारा ॥२॥
तुका ह्मणे जाणे । ऐसे भले ते शाहाणे॥३॥
अभंग १३५१
रूप नांवें माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयावरि ॥१॥
सींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवीं समजती ॥ध्रु.॥
पोटा आलें तिच्या लोळे मांडएांवरि । पारखी न करी खंतीं चित्तीं ॥२॥
तुका ह्मणे भक्तीसाटीं हरिहर । अरूपीचें क्षरविभाग हें ॥३॥
अभंग १३५२
लेकराची आळी न पुरवी कैसी । काय तयापाशीं उणें जालें ॥१॥
आह्मां लडिवाळां नाहीं तें प्रमाण । कांहीं ब्रह्मज्ञान आत्मिस्थति ॥ध्रु.॥
वचनाचा घेइऩन अनुभव पदरीं । जें हें जनाचारीं मिरवलें ॥२॥
तुका ह्मणे माझी भोिळवेची आटी । दावीन शेवटीं कौतुक हें ॥३॥
अभंग १३५३
आर्तभूतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शिक्त ॥१॥
फळ आणि समाधान । तेथें उत्तम कारण ॥ध्रु.॥
अल्पें तो संतोषी। स्थळीं सांपडे उदेसीं ॥२॥
सहज संगम । तुका ह्मणे तो उत्तम ॥३॥
अभंग १३५४
मुळाचिया मुळें । दुःखें वाढती सकळे ॥१॥
ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ध्रु.॥
न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥२॥
तुका ह्मणे थीत । दुःख पाववावें चित्त ॥३॥
अभंग १३५५
भाग्यवंतां हें चि काम । मापी नाम वैखरी ॥१॥
आनंदाची पुिष्ट अंगीं । श्रोते संगीं उद्धरती ॥ध्रु.॥
पिकविलें तया खाणें किती । पंगतीस सुकाळ ॥२॥
तुका करी प्रणिपात । दंडवत आचारियां ॥३॥
अभंग १३५६
लटिकें तें रुचे । साच कोणां ही न पचे ॥१॥
ऐसा माजल्याचा गुण । भोगें कळों येइल सीण ॥ध्रु.॥
वाढवी ममता । नाहीं वरपडला तो दूतां ॥२॥
कांहीं न मनी माकड । तुका उपदेश हेकड ॥३॥
अभंग १३५७
कौतुकाची सृष्टी । कौतुकें चि केलें कष्टी ॥१॥
मोडे तरी भलें खेळ । फांके फांकिल्या कोल्हाळ ॥ध्रु.॥
जाणणियासाटीं। भय सामावलें पोटीं ॥२॥
तुका ह्मणे चेता । होणें तें तूं च आइता ॥३॥
अभंग १३५८
भोवंडींसरिसें । अवघें भोंवत चि दिसे ॥१॥
ठायीं राहिल्या निश्चळ । आहे अचळीं अचळ ॥ध्रु.॥
एक हाकेचा कपाटीं। तेथें आणीक नाद उठी ॥२॥
अभ्रें धांवे शशी । तुका असे ते तें दुसरें भासी ॥३॥
अभंग १३५९
नव्हों आह्मी आजिकालीचीं । काचीं कुचीं चाळवणी ॥१॥
एके ठायीं मूळडाळ । ठावा सकळ आहेसी ॥ध्रु.॥
तुमचें आमचेंसें कांहीं । भिन्न नाहीं वांटलें ॥२॥
तुका ह्मणे जेथें असें । तेथें दिसें तुमचासा ॥३॥
अभंग १३६०
योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभयलोकीं कीतिऩ सोहळा मान ॥१॥
येरयेरांवरी जायांचें उसिणें । भाग्यस्थळीं देणें झाडावेसीं ॥ध्रु.॥
केलिया फावला ठायींचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काव्हवितो ॥२॥
तुका ह्मणे लाभ अकर्तव्या नांवें । शिवपद जीवें भोगिजेल ॥३॥
अभंग १३६१
मरणा हातीं सुटली काया । विचारें या निश्चयें ॥१॥
नासोनियां गेली खंती । सहजिस्थति भोगाचे ॥ध्रु.॥
न देखें सें जालें श्रम । आलें वर्म हाता हें ॥२॥
तुका ह्मणे कैची कींव । कोठें जीव निराळा ॥३॥
अभंग १३६२
नव्हे ब्रह्मचर्य बाइलेच्या त्यागें । वैराग्य वाउगें देशत्यागें ॥१॥
काम वाढे भय वासनेच्या द्वारें । सांडावें तें धीरें आचावाचे ॥ध्रु.॥
कांपवूनि टिरी शूरत्वाची मात । केलें वाताहात उचित काळें ॥२॥
तुका ह्मणे करी जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मळ स्तुति होतां ॥३॥
अभंग १३६३
नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥
मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥ध्रु.॥
नको गुंपों भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥२॥
तुका ह्मणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥३॥
अभंग १३६४
अवघी मिथ्या आटी । राम नाहीं तंव कंठीं ॥१॥
सावधान सावधान । उगवीं संकल्पीं हें मन ॥ध्रु.॥
सांडिलें तें मांडे। आघ्र उरल्या काळें दंडे ॥२॥
तुका ह्मणे आलें भागा । देउनि चिंतीं पांडुरंगा ॥३॥
अभंग १३६५
न संगावें वर्म । जनीं असों द्यावा भ्रम ॥१॥
उगींच लागतील पाठीं । होतीं रितीं च हिंपुटीं ॥ध्रु.॥
सिकविल्या गोटी । शिकोनि धरितील पोटीं ॥२॥
तुका ह्मणे सीण । होइल अनुभवाविण ॥३॥
अभंग १३६६
जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटीं वाहों नये ॥१॥
होणार तें घडो होणाराच्या गुणें । होइल नारायणें निमिऩलें तें ॥ध्रु.॥
व्याघ्राचिये भुके वधावी ते गाय । याचें नांव काय पुण्य असे ॥२॥
तुका ह्मणे न करी विचार पुरता । गरज्याची माता पिता खर ॥३॥
अभंग १३६७
शाहाणियां पुरे एक चि वचन । विशारती खुण ते चि त्यासी ॥१॥
उपदेश असे बहुतांकारणें । घेतला तो मनें पाहिजे हा ॥ध्रु.॥
फांसावेना तरिं दुःख घेतें वाव । मग होतो जीव कासावीस ॥२॥
तुका ह्मणे नको राग धरूं झोंडा । नुघडितां पीडा होइल डोळे ॥३॥
अभंग १३६८
अभिन्नव सुख तरि या विचारें । विचारावें बरें संतजनीं ॥१॥
रूपाच्या आठवें दोन्ही ही आपण । वियोगें तो क्षीण होत नाहीं ॥ध्रु.॥
पूजा तरि चित्तें कल्पा तें ब्रह्मांड । आहाच तो खंड एकदेसी ॥२॥
तुका ह्मणे माझा अनुभव यापरि । डोइऩ पायांवरि ठेवीतसें ॥३॥
अभंग १३६९
नटनाटए तुह्मी केलें याच साटीं । कवतुकें दृष्टी निववावी ॥१॥
नाहीं तरि काय कळलें चि आहे । वाघ आणि गाय लांकडाची ॥ध्रु.॥
अभेद चि असे मांडियेलें खेळा । केल्या दीपकळा बहुएकी ॥२॥
तुका ह्मणे रूप नाहीं दर्पणांत । संतोषाची मात दुसरें तें ॥३॥
अभंग १३७०
रवीचा प्रकाश । तो चि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥१॥
आतां हा चि वसो जीवीं । माझे अंतरी गोसावीं । होऊं येती ठावीं । काय वर्में याच्यानें ॥ध्रु.॥
सवें असतां धणी । आड येऊं न सके कोणी । न लगे विनवणी । पृथकाची करावी ॥२॥
जन्माचिया गति । येणें अवघ्या खुंटती । कारण ते प्रीति । तुका ह्मणे जवळी ॥३॥
अभंग १३७१
ऐसे सांडुनियां घुरे । किविलवाणी दिसां कां रे । कामें उर भरे । हातीं नुरे मृित्तका ॥१॥
उदार हा जगदानी । पांडुरंग अभिमानी । तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥ध्रु.॥
न लगे पुसावी चाकरी । कोणी वकील ये घरीं । त्याचा तो चाकरी । पारपत्य सकळ ॥२॥
नाहीं आडकाटी । तुका ह्मणे जातां भेटी । न बोलतां मिठी । उगी च पायीं घालावी ॥३॥
अभंग १३७२
उपकारी असे आरोणि उरला । आपुलें तयाला पर नाहीं ॥१॥
लाभावरि घ्यावें सांपडलें काम । आपला तो श्रम न विचारी ॥ध्रु.॥
जीवा ऐसें देखे आणिकां जीवांसी । निखळ चि रासि गुणांची च ॥२॥
तुका ह्मणे देव तयांचा पांगिला । न भंगे संचला धीर सदा ॥३॥
अभंग १३७३
कोणा पुण्यें यांचा होइऩन सेवक । जींहीं द्वंदादिक दुराविलें ॥१॥
ऐसें वर्म मज दावीं नारायणा । अंतरीं च खुणा प्रकटोनि ॥ध्रु.॥
बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥२॥
तुका ह्मणे मग नयें वृत्तीवरी । सुखाचे शेजारीं पहुडइऩन ॥३॥
अभंग १३७४
क्षणक्षणां सांभािळतों । साक्षी होतों आपुला ॥१॥
न घडावी पायीं तुटी । मन मुठी घातलें ॥ध्रु.॥
विचारतों वचनां आधीं । धरूनि शुद्धी ठेविली ॥२॥
तुका ह्मणे मागें भ्यालों ॥ तरीं जालों जागृत ॥३॥
अभंग १३७५
आणूनियां मना । आवघ्या धांडोिळल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥१॥
यासी अनुसरल्या काय । घडे ऐसें वांयां जाय । देखिले ते पाय । सम जीवीं राहाती ॥ध्रु.॥
तो देखावा हा विध । चिंतनें तें कार्य सिद्ध । आणिकां संबंध । नाहीं पर्वकाळासी ॥२॥
तुका ह्मणे खळ । हो क्षणें चि निर्मळ । जाऊनियां मळ । वाळवंटीं नाचती ॥३॥
अभंग १३७६
धरितां ये पंढरीची वाट । नाहीं संकट मुक्तीचें ॥१॥
वंदूं येती देव पदें । त्या आनंदें उत्साहें ॥ध्रु.॥
नृत्यछंदें उडती रज । जे सहज चालतां ॥२॥
तुका ह्मणे गरुड टके । वैष्णव निके संभ्रम ॥३॥
अभंग १३७७
नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृत चि जरवे । होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥१॥
मन रंगलें रंगलें । तुझ्या चरणीं िस्थरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥ध्रु.॥
जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें। अंगा येती उद्गार ॥२॥
सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा । तुका ह्मणे लेखा । आतां नाहीं आनंदा ॥३॥
अभंग १३७८
रुची रुची घेऊं गोडी । प्रेमसुखें जाली जोडी ॥१॥
काळ जाऊं नेदूं वांयां । चिंतितां विठोबाच्या पायां ॥ध्रु.॥
करूं भजन भोजन । धणी घेऊं नारायण ॥२॥
तुका ह्मणे जीव धाला । होय तुझ्यानें विठ्ठला ॥३॥
अभंग १३७९
वेळोवेळां हें चि सांगें । दान मागें जगासि ॥१॥
विठ्ठल हे मंगळवाणी । घेऊं धणी पंगती ॥ध्रु.॥
वेचतसे पळें पळ । केलें बळ पाहिजे ॥२॥
तुका ह्मणे दुिश्चत नका । राहों फुका नाड हा ॥३॥
अभंग १३८०
आणीक ऐसें कोठें सांगा । पांडुरंगा सारिखें ॥१॥
दैवत ये भूमंडळीं । उद्धार कळी पावितें ॥ध्रु.॥
कोठें कांहीं कोठें कांहीं । शोध ठायीं स्थळासी ॥२॥
आनेत्रींचें तीथाअ नासे । तीथाअ वसे वज्रलेप ॥३॥
पांडुरंगींचें पांडुरंगीं । पाप अंगीं राहेना ॥४॥
ऐसें हरें गिरिजेप्रति । गुहए िस्थती सांगितली ॥५॥
तुका ह्मणे तीर्थ क्षेत्र । सर्वत्र हें दैवत ॥६॥
अभंग १३८१
पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥
नव्हती हे आहाच बोल । मोकळें फोल कवित्व ॥ध्रु.॥
भावें घ्या रे भावें घ्या रे । येगदा जा रे पंढरिये ॥२॥
भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥३॥
पापपुण्या करील झाडा । जाइल पीडा जन्माची ॥४॥
घ्यावी हातीं टाळदिंडी । गावे तोंडीं गुणवाद ॥५॥
तुका ह्मणे घटापटा । न लगे वाटा शोधाव्या ॥६॥
अभंग १३८२
कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगें पतन ॥१॥
भलत्या काळें नामावळी । सुलभ भोळी भाविकां ॥ध्रु.॥
प्रायिश्चत्तें पडती पायां । गाती तयां वैष्णवां ॥२॥
तुका ह्मणे नुपजे दोष करा घोष आनंदे ॥३॥
अभंग १३८३
पाहा रे हें दैवत कैसें । भिक्तपिसें भाविक ॥१॥
पाचारिल्या सरिसें पावे । ऐसें सेवे बराडी ॥ध्रु.॥
शुल्क काष्ठीं गुरुगुरी । लाज हरि न धरी ॥२॥
तुका ह्मणे अर्धनारी । ऐसीं धरी रूपडीं ॥३॥
अभंग १३८४
बहुत सोसिले मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावें ॥१॥
एकाचिये अंगीं हें ठेवावें लावून । नये भिन्न भिन्ना चांचपडो ॥ध्रु.॥
कोण होइऩल तो ब्रह्मांडचाळक । आपणें चि हाके देइऩल हाके ॥२॥
तुका ह्मणे दिलीं चेतवूनि सुणीं । कौतुकावांचूनि नाहीं छळ ॥३॥
अभंग १३८५
आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचें । कैसें दिलें साचें करोनियां ॥१॥
दुजियासी तंव अकळ हा भाव । करावा तो जीव साक्ष येथें ॥ध्रु.॥
एकीं अनेकत्व अनेकीं एकत्व । प्रकृतिस्वभाव प्रमाणें चि ॥२॥
तुका ह्मणे करूं उगवूं जाणसी । कुशळ येविशीं तुह्मी देवा ॥३॥
अभंग १३८६
अस्त नाहीं आतां एक चि मोहोरा । पासूनि अंधारा दुरि जालों ॥१॥
साक्षत्वें या जालों गुणाचा देखणा । करीं नारायणा तरी खरें ॥ध्रु.॥
आठवें विसरु पडियेला मागें । आलें तें चि भागें यत्न केलें ॥२॥
तुका ह्मणे माझा विनोद देवासी । आह्मी तुह्मां ऐसीं दोन्ही नव्हों ॥३॥
अभंग १३८७
क्षर अक्षर हे तुमचे विभाग । कासयानें जग दुरी धरा ॥१॥
तैसे आह्मी नेणों पालटों च कांहीं । त्यागिल्याची नाहीं मागें चाड ॥ध्रु.॥
प्रतिपादिता तूं समविषमाचा । प्रसाद तो याचा पापपुण्य ॥२॥
तुका ह्मणे तुह्मां नाना अवगणीं । लागे संपादणी लटिक्याची ॥३॥
अभंग १३८८
सर्वरसीं मीनलें चित्त । अखंडित आनंदु ॥१॥
गोत पति विश्वंभरीं । जाला हरि सोयरा ॥ध्रु.॥
वोळखी ते एका नांवें । इतरभावें खंडणा ॥२॥
तुका ह्मणे नांवें रूपें । दुसरीं पापें हारपलीं ॥३॥
अभंग १३८९
मीं हें ऐसें काय जाती । अवघड किती पाहातां ॥१॥
नाहीं होत उल्लंघन । नसतां भिन्न दुसरें ॥ध्रु.॥
अंधारानें तेज नेलें। दृष्टीखालें अंतर ॥२॥
तुका ह्मणे सवें देव । घेतां ठाव दावील ॥३॥
अभंग १३९०
कवेश्वरांचा तो आह्मांसी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥१॥
दंभाचे आवडी बहिराट अंधळे । सेवटासि काळें होइल तोंड ॥ध्रु.॥
सोन्यासेजारी तों लाखेची जतन । सतंत ते गुण जैसेतैसे ॥२॥
सेव्य सेववता न पडतां ठावी । तुका ह्मणे गोवी पावती हीं ॥३॥
अभंग १३९१
वाढलियां मान न मनावी नििश्चती । भूतांचिये प्रीती भूतपण ॥१॥
ह्मणऊनि मना लावावी कांचणी । इंिद्रयांचे झणी ओढी भरे ॥ध्रु.॥
एका एकपणें एकाचिये अंगीं । लागे रंग रंगीं मिळलिया ॥२॥
तुका ह्मणे देव निष्काम निराळा । जीवदशे चाळा चळणांचा ॥३॥
अभंग १३९२
माया साक्षी आह्मी नेणों भीड भार । आप आणि पर नाहीं दोन्ही ॥१॥
सत्याचिये साटीं अवघा चि भरे । नावडे व्यापार तुटीचा तो ॥ध्रु.॥
पोंभािळता चरे अंतरींचें दुःख । लांसें फांसें मुख उघडावें ॥२॥
तुका ह्मणे नव्हे स्फीतीचा हा ठाव । निवाडएासी देव साक्षी केला ॥३॥
अभंग १३९३
संतां आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ ॥१॥
परिसतां तेथें नाहीं एकविणें । मोहें न पवे सीण ऐसें राखे ॥ध्रु.॥
केले अन्याय ते सांडवी उपचारें । न देखें दुसरें नासा मूळ ॥२॥
तुका ह्मणे मुख्य कल्पतरुछाया । काय नाहीं दया तये ठायीं ॥३॥
अभंग १३९४
संतांच्या धीकारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु तेणें सांडी परि ॥१॥
कुळ आणि रूप वांयां संवसार । गेला भरतार मोकलितां ॥ध्रु.॥
मूळ राखे तया फळा काय उणें । चतुर लक्षणें राखों जाणे ॥२॥
तुका ह्मणे सायास तो एके ठायीं । दीप हातीं तइऩ अवघें बरें ॥३॥
अभंग १३९५
ओलें मूळ भेदी खडकाचें अंग । आभ्यासासी सांग कार्यसििद्ध ॥१॥
नव्हे ऐसें कांहीं नाहीं अवघड । नाहीं कइऩवाड तोंच वरि ॥ध्रु.॥
दोरें चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासें सेवनीं विष पडे ॥२॥
तुका ह्मणे कैंचा बैसण्यासी ठाव । जठरीं बाळा वाव एकाएकीं ॥३॥
अभंग १३९६
अमर आहां अमर आहां । खरें कीं पाहा खोटें हें ॥१॥
न ह्मणां देह माझा ऐसा । मग भरवसा कळेल ॥ध्रु.॥
कैंचा धाक कैंचा धाक । सकिळक हें आपुलें ॥२॥
देव चि बरे देव चि बरे । तुका ह्मणे खरे तुह्मी ॥३॥
अभंग १३९७
काम नाहीं काम नाहीं । जालों पाहीं रिकामा ॥१॥
फावल्या या करूं चेष्टा । निश्चळ दृष्टा बैसोनि ॥ध्रु.॥
नसत्या छंदें नसत्या छंदें । जग विनोदें वि†हडतसे ॥२॥
एकाएकीं एकाएकीं । तुका लोकीं निराळा ॥३॥
अभंग १३९८
हातीं घेऊनियां काठी । तुका लागला किळवरा पाठी ॥१॥
नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी ते ठाकणीं ॥ध्रु.॥
काडिलें तें ओढें । मागील उपचाराचें पुढें ॥२॥
नाहीं वाटों आला भेव । सुख दुःख भोगिता देव ॥३॥
याजसाटीं हें निर्वाण । केलें कसियेलें मन ॥४॥
तुका ह्मणे अनुभव बरा । नाहीं तरी सास्त होय चोरा ॥५॥
अभंग १३९९
कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ॥१॥
प्रेमाछंदें नाचे डोले । हारपला देहभाव ॥ध्रु.॥
एकदेशीं जीवकळा। हा सकळां सोयरा ॥२॥
तुका ह्मणे उरला देव । गेला भेव त्या काळें ॥३॥
अभंग १४००
न बोलेसी करा वाचा । उपाधीचा संबंध ॥१॥
एका तुमच्या नामाविण । अवघा सीण कळतसे ॥ध्रु.॥
संकल्पाचे ओढी मन । पापपुण्य सम चि ॥२॥
तुका ह्मणे नारायणीं । पावो वाणी विसांवा ॥३॥
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने