संत ज्ञांनेश्वर महाराज गवळणी

संत ज्ञांनेश्वर महाराज गवळणी

संत ज्ञांनेश्वर महाराज गवळणी

त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये ।

कल्पद्रुमातळी वेणु वाजवीत आहे ॥१॥

गोविंदु वो माये गोपाळु वो ।

सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु वो ॥धृ॥

सांवळे सगुण सकळा जिवांचे जीवन ।

घनानंदमूर्ति पाहता हारपले मन ॥२॥

शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ ।

बापरखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ॥३॥

योगिया मुनिजनां ध्यानी ।

ते सुख आसनी शयनी ॥१॥

हरिसुख फावले रे ॥धृ॥

गोकुळीच्या गौळिया ।

गोपि गोधना सकळा ॥२॥

बापरखुमादेविवरु विठ्ठले ।

ते सुख सवंगडिया दिधले ॥३॥

तुजवीण एकली रे कृष्णा न गमे राती ।

तंव तुवा नवल केले वेणु घेऊनि हाती ।

आलिये तेचि सोय तुझी ओळखिली गती ॥१॥

नवल हे वालभ रे कैसे जोडले जिवा ।

दुसरे दुरी ठेले प्रीति केला रिघावा ॥२॥

पारु रे पारु रे कान्हा झणे करिसी अव्हेरु ।

तू तंव हृदयीचा होसी चैतन्य चोरु ।

बापरखुमादेवीवरु विठो करी का अंगिकारु ॥३॥

लक्ष लावुनि अंतरी । कृष्णा पाहती नरनारी ।

लावण्यसागरु हरि । परमानंदु ॥१॥

छंदे छंदे वेणु वाजे ।त्रिभुवनी घनु गाजे ।

उतावेळ मन माझे । भेटावया ॥धृ॥

ब्रह्मविद्येचा पुतळा । गाई राखितो गोवळा ।

श्रुति नेणवे ते लीळा । वेदां सनकादिका ॥२॥

भूतग्रामीचा परेशु । तापत्रयाचा करी नाशु ।

आड धरुनि गोपवेषु । वत्सें राखे ॥३॥

रासक्रीडा वृंदावनी खेळे । इंदुवदन मेळे ।

उद्धरी यदुकुळे । कुळदीपके ॥४॥

निवृत्ति दासाचा दातारु । बापरखुमादेवीवरु ।

भक्तां देतो अभयकरु । क्षणक्षणांमाजि ॥५॥

यातिकुळ माझे गेले हारपोनि ।

श्रीरंगावांचुनी आनु नेंणे ॥१॥

किती वो शिकवाल मज वेळोवेळा ।

मी तया गोवळा रातलिये ॥२॥

अष्टभोग भोगणे माते नाही चाड ।

भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ॥३॥

बापरखुमादेवीवरु जीवींचा जिव्हाळा ।

कांही केलिया वेगळा नव्हे गे माये ॥४॥

माझ्या कान्हाचे तुम्ही नाव भरी घ्यावो ।

हृदयी धरोनि यासी खेळावया न्यावो ॥१॥

भक्तांकारणे येणे घेतलीसे आळी ।

दहा गर्भवास सोसिले वनमाळी ॥२॥

कल्पनेविरहित भलतया मागे ।

अभिमान सांडुनी दीनापाठी लागे ॥३॥

शोषिली पुतना येणे तनू मोहियेले तरु ।

आळी न संडी बापरखुमादेविवरु ॥४॥

घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा ।

भवतारकु हा कान्हा वेगी भेटवा का ॥१॥

चांद वो चांदणे । चांपे वो चंदनु ।

देवकी नंदनुविण नावडे वो ॥२॥

चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।

कान्हो वनमाळी वेगी भेटवा का ॥३॥

सुमनाची सेज । सितळ वो निकी ।

पोळे आगिसारिखी वेगी विझवा का ॥४॥

तुम्ही गातसां सुस्वरे । ऐकोनि द्यावी उत्तरे ।

कोकिळे वर्जावे तुम्ही बाइयांनो ॥५॥

दर्पणी पाहाता । रुप न दिसे वो आपुले ।

बापरखुमादेवीवरे विठ्ठले मज ऐसे केले ॥६॥

पांवया छंदे तल्लीन गोविंदे ।

नाचती आनंदे गोपाळ कैसे ॥१॥

यमुनेच्या तीरी गाई चारी हरी ।

गोपाळ गजरी आनंदले ॥२॥

ठायीं ठायीं मातु पे द्या पै नाचतु ।

वाकुल्या दावितु हरी छंदे ॥३॥

गायी ठाती उभ्या विसरल्या माया ।

हाकितु लवलाह्या कृष्णहरी ॥४॥

ज्ञानदेवा जीवी कृष्ण चिरंजीवी ।

गोपाळ रंजवी प्रेमभक्तां ॥५॥

जीवीचिया जीवा । प्रेमभावाचिया भावा ।

तुज वांचूनि केशवा । अनु नावडे ॥१॥

जीवे अनुसरलिये । अजुनी का नये ।

वेगी आणावा तो सये । प्राण माझा ॥२॥

सौभाग्यसुंदरु । लावण्यसागरु ।

बापरखुमादेवीवरु । श्रीविठ्ठलु ॥३॥

१०

पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा ।

विठो देखियेला डोळा बाईये वो ॥१॥

वेधले वो मन तयाचिया गुणी ।

क्षणभर न विसंबे विठ्ठलरुक्मिणी ॥२॥

पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणां होय उणे ।

तैसे माझे जिणे एक विठ्ठलेवीण ॥३॥

बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि पुरे ।

चित्त चैतन्य मुरे बाई ये वो ॥४॥

११

सावळे परब्रह्म आवडे या जीवा ।

मने मन राणिवा घर केले ॥१॥

काय करु सये सांवळे गोवित ।

आपे आप लपत मन तेथे ॥धृ॥

बापखुमादेविवरु सांवळी प्रतिमा ।

मने मनी क्षमा एक झाले ॥३॥

१२

काय सांगू तूते बाई काय सांगू तूते ॥धृ॥

जात होते यमुने पाणिया वातेत भेतला सांवला ।

दोईवल तोपी मयुल पुछाची खांद्यावली कांबला ॥१॥

तेणे माझी केली तवाली मग मी तिथुन पलाली ।

पलता पलता घसलून पलली । दोईची घागल फुतली ॥२॥

माझे गुलघे फुतले मग मी ललत बथले ।

तिकुन आले शालंगपाणी मला पोताशीं धलिले ॥३॥

मला पोताशीं धलिले माझे समाधान केले ।

निवृत्तीचे कृपे सुख हे ज्ञानदेवा लाधले ॥४॥

१३

गायी चालील्या वनाप्रती ।

सवे पे द्या चाले सांगाती ॥धृ॥

वळी गोवळीया कान्होबा ।

यमुने पाण्या नेई तु बा ॥१॥

पावया छंदे परतल्या गायी ।

विसरल्या चारा तल्लीन ठायी ॥२॥

ज्ञानदेव सवे सवंगडी लाठा ।

गायी हाकितो गोधना तटा ॥३॥

१४

नवल देखिले कृष्णरूप बिंब ।

सांवळी स्वयंभ मूर्तिं हरीची॥१॥

मन निवाले समाधान जाले ।

कृष्णरूपे बोधले मन माझें॥२॥

बापरखुमादेविवरू सांवळा सर्व घटी ।

चित्त चैतन्या मिठी घालीत खेवो॥३॥

१५

परब्रम्ह निष्काम तो हा गौळिया घरी ।

वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥

म्हणती गौळणी हरीची पाउले धरा ।

रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥

लपत छपत येतो हरी हा राजभुवनी ।

नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनी ॥३॥

सांपडला देव्हारी यासी बांधा दाव्यांनी ।

शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥

बहुता कष्टें बहुता पुण्यें जोडले देवा ।

अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥

नामा म्हणे केशवा अहो जी तुम्ही दातारा ।

जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥

१६

यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल ॥धृ॥

साध्या गव्हांची पोळी लाटी । मला पुरण पोळी करून दे मोठी ।

नाही अडवीत गुळासाठी । मला जेवू घाल ॥१॥

तूप लावून भाकर करी । वांगे भाजून भरीत करी ।

वर कांद्याची कोशिंबिरी । मला जेवू घाल ॥२॥

आई ग खडे साखरेचे खडे । लवकर मला करून दे वडे ।

बाळ स्फुंदस्फुंदोनी रडे । मला जेवू घाल ॥३॥

आई लहानच घे गे उंडा । लवकर भाजुन दे मांडा ।

लांब गेल्या गाईच्या झुंडा । मला जेवू घाल ॥४॥

आई मी खाईन शिळा घांटा ।दह्याचा करून दे मठ्ठा ।

नाही माझ्या अंगी ताठा । मला जेवू घाल ॥५॥

भाकर बरीच गोड झाली । भक्षुनी भूक हारपली ।

यशोदेने कृपा केली । मला जेवू घाल ॥६॥

आई मी तुझा एकुलता एक । गाई राखितो नऊ लाख ।

गाई राखून झिजलीं नख । मला जेवू घाल ॥७॥

नामा विनवी केशवासी । गाई राखितो वनासी ।

जाऊन सांगा यशोदेशी । मला जेवू घाल ॥८॥

१७

गेलिया वृंदावना तेथे देखिला कान्हा ।

संवगडियामाजी उभा ध्यान लागले मना ॥१॥

हरिनाम गोड झाले काय सांगों गे माय ।

गोपाळ वाहती पावे मन कोठे न राहे ॥२॥

त्याचे मुख साजिरे वो कुंडले चित्त चोरे ।

सांडुनी अमृत धनी लुब्धलीं चकोरे ॥३॥

सांडुनी ध्रुवमंडळ आली नक्षत्रमाळा ।

कौस्तुभा तळवटी वैजयंती शोभे गळा ॥४॥

सांडुनी मेघराजु कटिसूत्रीं तळपे विजू ।

भुलला चतुराननू तया नव्हे उमजू ॥५॥

सांडुनी लक्ष्मी निज गोपाळासी बोले गुज ।

अचोज हा चोजवेना ब्रम्हांदिका सहज ॥६॥

वांजट धीट मोठी ऐसी कवण असे खिळू ।

भेदली हरिचरणी पायी मुरडीव वांकी सोज्वळू ॥७॥

त्याचे पायींची नेपुरे वाजती वो गंभीरे ।

लुब्धलीया पक्षयाती धेनु पाचारी स्वरे ॥८॥

आणिक एक नवल कैसे स्वर्गीं देव झाले पिसे ।

ब्रम्हादिक उच्छिष्ठालागी देखा जळी झाले मासे ॥९॥

आणिक एक नवल परी करी घेऊनि शिदोरी ।

सवंगड्या वांटितसे नामया स्वामी मुरारी ॥१०॥

१८

कान्होबा निवडी आपुली गोधने ॥धृ॥

पांच पांच पोळ्या तीन भाकरी । दीड कानवला एक पुरी ।

आम्हा धाडिले वैल्या दुरी । आमची ठकवून खाल्ली शिदोरी ॥१॥

परियेसी शारंगधरा । तुझा बैल चुकला मोरा ।

सांगू गेलो तुझ्या घरा । पाठी लागला तुझा म्हातारा ॥२॥

परियेसी हृषीकेशी ।गाई म्हशीचे दुध पिशी ।

वासरे प्याली म्हणून सांगशी । उद्या ताक नाही आम्हासी ॥३॥

कान्होबा ओढाळ तुझ्या गाई । होत्या नव्हत्या कळंबा ठायीं ।

शिव्या देती तुझी आई ॥४॥

विष्णुदास नामा साहे । देवा तूचि बाप माये ।

अखंड माझे हृदयी राहे ॥५॥

१९

रात्र काळी घागर काळी ।

यमुनाजळे ही काळी वो माय ॥१॥

बुंथ काळी बिलवार काळी ।

गळा मोती एकावळी काळी वो माय ॥२॥

मी काळी कांचोळी काळी ।

कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥

एकली पाणीया नवजाय साजणी ।

सवे पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥

विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।

कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥५॥

२०

तळवे तळहात टेकीत । डाव्या गुडघ्याने रांगत ।

रंगणी रंगनाथ । तो म्यां देखिला सये ॥१॥

गवळण जसवंती पै सांगे । आले या कृष्णाचेनि मागे ।

येणे येणे वो श्रीरंगे । नवनीत माझे भक्षिले ॥२॥

एक्या हाती लोण्याचा कवळु ।मुख माखिले अळुमाळु ।

चुंबन देता येतो परिमळु । नवनीताचा गे सये ॥३॥

येणे माझे कवाड उघडिले । येणे शिंके हो तोडिले ।

२१

दह्यादुधाते भक्षिले । उलंडिले ताकाते ॥४॥

ऐसे जरी मी जाणते । यमुनापाणिया नव जाते ।

धरूनि खांबासी बांधिते । शिक्षा लाविते गोविंदा ॥५॥

ऐसा पुराण प्रसिद्ध चोर । केशव नाम्याचा दातार ।

पंढरपुरी उभा विटेवर । भक्त पुंडलिकासाठी ॥६॥

मला पोताशीं धलिले माझे समाधान केले ।

निवृत्तीचे कृपे सुख हे ज्ञानदेवा लाधले ॥४॥

२२

बाळ सगुण गुणाचे तान्हें गे । बाळ दिसते गोजिरवाणे गे ।

काय सांगता गाऱ्हाणे गे । गोकुळीच्या नारी ॥१॥

श्रीरंग माझा वेडा गे । याला नाही दुसरा जोडा गे ।

तुम्ही याची संगत सोडा गे । गोकुळीच्या नारी ॥२॥

पांच वर्षांचे माझे बाळ गे । अंगणी माझ्या खेळे गे ।

२३

का लटकाच घेता आळ गे । गोकुळीच्या नारी ॥३॥

सांवळा गे चिमणा माझा गे । गवळणींत खेळे राजा गे ।

तुम्ही मोठ्या ढालगजा गे । गोकुळीच्या नारी ॥४॥

तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे । आळ घेता या गोपाळा गे ।

तुम्ही ठाईंच्या वोढाळा गे । गोकुळीच्या नारी ॥५॥

तुम्ही लपवुनी याची गोटी गे । लागता गे याचे पाठी गे ।

ही एवढीच रीत खोटी गे । गोकुळीच्या नारी ॥६॥

तुम्ही लपवूनि याचा भवरा गे । धरूं पाहता शारंगधरा ।

तुम्ही बारा घरच्या बारा गे । गोकुळीच्या नारी ॥७॥

हा ब्रह्मविधीचा जनीता गे । तुम्ही याला धरूं पाहता गे ।

हा कैसा येईल हाता गे । गोकुळीच्या नारी ॥८॥

नामा म्हणे यशोदेसी गे । हा तुझा हृषिकेशी गे ।

किती छळितो आम्हांसी गे ।गोकुळीच्या नारी ॥९॥

|| ज्ञानेश्वर माउली ||
|| ज्ञानराज माउली तुकाराम ||
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने