संत नामदेव महाराज गवळणी

संत नामदेव महाराज गवळणी

प्रातकाळी प्रहरा रात्रीं उठिल्या गौळणी बाळा । घुसळण मांडियेले घरोघरी सकळा ।

नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा । सह्स्रापरी कैशा गाती मदन सांवळा ॥१॥

घुम घुम करिती घुम घुम करिती डेरे घुमती । आनंदल्या गौळणी छंदे छंदे डोलती ॥ धृ० ॥

एक म्हणती साजणी तुम्ही लपवा गे लोणी । नकळे नकळे वो बाई कृष्णाची करणी ।

कोणीकडून हा गे येईल सखये चक्रपाणी । खास खांदूनि तुम्ही आता लपवा दुधाणी ॥२॥

बोलता चालता इतुक्यामध्ये हरी आला । कवणेंही नाही देव दृष्टि देखिला ।

सूक्ष्म रूप धरूनि डेर्यामध्ये प्रवेशला । वरच्यावरी देव लोणी खाऊनिया गेला ॥३॥

उन्हवणी शिळवणी घालिती परते लोणी येईना । काय झाले टोणे सासूबाई कळेना ॥४॥

हा हा गे बायांनो तुमचे जाणते चाळे । यश्वदेच्या मुला नेऊनि देतसां गोळे ।

उगेंचि मग पाहता आता फिरगे निराळे । मारी ठोसरे दोन्ही गाल्होरे घेतले ॥५॥

डेर्यामधुनी मार माझा जगज्जीवन पाहे । नामा म्हणे धन्य धन्य वर्णूं मी काये ॥६॥

गड्यांनो राजा की रे झाला । कृष्ण सिंहासनी बैसला ॥धृ॥

पांवा मोहरी घोंगडी । आम्ही खेळू यमुने थडी ।

नाचा पाऊला देहुडी । कृष्ण आमुचा की रे गडी ॥२॥

खेळू हुतुतू हुंबरी । थडक हाणों टिरीवरी ।

आता चालिला दळभारी । आमुचा यशोदेचा हरी ॥३॥

कुस्ती खेळता कासाविसी । शेंबुड खरकटे नाकाशी ।

कडे घेऊ सावकाशी । आता बहु भितो यासी ॥४॥

आम्ही तुम्ही सवे जाऊ । गाई वळावया जाऊ ।

त्याचे मानेत बुक्या देऊ । जवळी जावयासी भिऊ ॥५॥

नामा म्हणे चला जाऊ । हात जोडूनी उभे राहूं ।

पाया पडून मागून घेऊ । जनी वनी तोचि कृष्णची ध्याऊ ॥६॥

हाती घेऊनिया काठी । शिकविते श्रीपती ।

यमुनेची माती । खासी का का का का ॥१॥

हरी तू खोडी नको करू माझ्या बा बा बा ॥धृ॥

धांऊनिया धरिला करी । बैसविला मांडिवरी ।

मुख पसरोनि करी । आ आ आ ॥२॥

विष्णुदास नामा म्हणे । मरोनिया जन्मा येणे ।

कृष्ण सनातन पाहूं । या या या या ॥३॥

रूपे श्यामसुंदर निलोत्पल गाभा । सखीये स्वप्नीं शोभा देखियेली ॥१॥

नेत्र विशाळ भाळ दंत हिरया ज्योती । बाइये मदनमूर्ति देखियेला ॥२॥

शंख चक्र गदा शोभती चहूं करी । सखीये गरुडावरी देखियेला ॥३॥

शयन शेषापृष्ठीं नभी परमेष्ठी । गंगा वामांगुष्ठी देखियेला ॥४॥

पीतांबर कटीतटी दिव्य चंदन उटी । सखीये जगजेठी देखियेला ॥५॥

विचारीता मानसी नये जो व्यक्तीसी । नामा केशवेसी लुब्धोनी ठेला ॥६॥

ऐकुनी वेणुचा नाद । लागला नामाचा छंद ॥१॥

निघाली लगबग पाण्याला । रिकामा घेवोनीया डेरा ।

गिरधर गोविंद गोविंद ॥२॥

निघाली धेनु चाराया । वासरे करोनिया गोळा ।

वाजवी पावा गोविंद ॥३॥

नामा म्हणे अहो केशवराज । नाम घ्या श्री कृष्ण गोविंद ।

गवळणी झाल्या मती मंद ॥४॥

कृष्णा तुला मी ताकीद करते , कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।

गवळ्याघरी बोभाट उठला , माठ दह्याचे घेऊ नको तू फोडू नको ॥१॥

रागीट तुझा पिता नंद मार तयाचा खाऊ नको ॥२॥

आली गौळण कपटी राधा, तिच्या घरात तू जाऊ नको ॥३॥

पाळण्यात घालूनी झोके देते, आता मुला, तू रडू नको ॥४॥

वरद्या वांकड्या पे द्या सुदामा, ह्यांच्या डावामध्ये खेळू नको ॥५॥

नामा म्हणे पतित पावना, ह्यांच्या नामा तू विसरू नको ॥६॥

|| ज्ञानेश्वर माउली ||
|| ज्ञानराज माउली तुकाराम ||
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने