गुरुपरंपरेचे अभंग

गुरुपरंपरेचे अभंग
sant dnyaneshwar maharaj sampurn haripath

गुरुपरंपरेचे अभंग

गुरुपरंपरेचे अभंग - १

सत्यगुरुराये कृपा मज केली |

परी नाही घडली सेवा काही || १ ||

सापडवीले वाटे जाता गंगास्नापणा |

मस्तकी तो जाणा ठेविला कर || २ ||

भोजना मागती तूप पावशेर |

पडिला विसर स्वप्नामाजी || ३ ||

काही काळे उपजला अंतराय |

म्हणोनिया काय त्वरा झाली || ४ ||

राघवचैतन्य केशवचैतन्य |

सांगितली खूण मालिकेची || ५ ||

बाबाजी आपुले सांगितले नाम |

मंत्र दिला राम कृष्ण हरी. || ६ ||

माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार |

केला अंगीकार तुका म्हणे || ७ ||

गुरुपरंपरेचे अभंग - २

माझिया मनीचा जाणोनिया भाव |

तो करी उपाव गुरुराव || १ ||

आवडीचा मंत्र सांगितला सोपा |

जेणे नोहे गुंफा कोठे काही || २ ||

जातीपुढे एक उतरले पार |

हा भवसागर साधुसंत || ३ ||

जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी |

उतार सांगडी तापे पेठे || ४ ||

तुका म्हणे संती दावियेला तारू |

कृपेचा सागरु पांडुरंग || ५ ||

गुरुपरंपरेचे अभंग - ३

घालुनिया भर राहिलो निश्चिती |

निरविले संती विठोबासी || १ ||

लावुनिया हात कुरवाळीला माथा |

सांगितली चिंता न करावी || २ ||

कटीकर समचरण साजिरे |

राहिला भीवरे तीरी उभा || ३ ||

खुंटले सायास आणिक या जीवा |

धरिले केशवा पाय तुझे || ४ ||

तुज वाटे आता ते करी अनंता |

तुका म्हणे संता लाज माझी || ५ ||

गुरुपरंपरेचे अभंग - ४

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव |

आपणचि देव होय गुरु || १ ||

पढिये देहभाव पुरवी वासना |

अंती ते आपणापाशी न्यावे || २ ||

मागे पुढे उभा राहे सांभाळीत |

आलीय आघात निवाराया || ३ ||

योगक्षेम त्याचा जाणे जडभारी |

वाट दावी करी धरूनिया || ४ ||

तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी |

पाहावे पुराणी विचारूनि || ५ ||

गुरुपरंपरेचे अभंग - ५

मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ |

संप्रदाय फळ तेथुनिया || १ ||

हंसरूपे ब्रम्हा उपदेशी श्रहरी |

चतुःश्र्लोकी चारी भागवत || २ ||

ते गुज विधाता सांगे नारदासी |

नारदें व्यासासी उपदेशिले || ३ ||

राघव चैतन्य केले अनुष्ठान |

यासी द्वापायने कृपा केली || ४ ||

कृपा करुनि हस्ता ठेवियेला शिरी |

बोध तो अंतरी ठसावला || ५ ||

राघवा चरणी केशव शरण |

बाबाजींशी पूर्ण कृपा त्यांची || ६ ||

बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला |

अनुग्रह दिधला निजप्रीती || ७ ||

जगद्गुरू तुका अवतार नामयाचा |

संप्रदाय सकळांचा तेथोनिया || ८ ||

निळा म्हणे मज उपदेश केला |

संप्रदाय दिधला सकळ जना || ९ ||

गुरुपरंपरेचे अभंग - ६

संप्रदायाचे मूळ हंसरूपी ब्रम्हाशी |

ब्रम्हाने अत्रीशी अनुग्रहीले || १ ||

तोचि अनुग्रह दत्तात्रया लाभला |

पूर्णकृपे दिधला नारायणा || २ ||

नारायण कृपे लक्ष्मणाशी बोध |

कृपेचा तो लाभ बलभीमाशी || ३ ||

बालभिमाचा बोध झाला सखयानंदा |

संती परमानंदा प्राप्त झाली || ४ ||

शांतामाई कृपेने बंडोबा सद्गद |

केरोबा ब्रह्मपदी बैसविले || ५ ||

केरोबांनी हस्त मस्तदकी ठेवुनी |

श्रीपादा उन्मेनी साधियेली || ६ ||

श्रीपाद हा सूर्य रामदास प्रभा |

धोंडा तेथे उभा पायापाशी || ७ ||

गुरुपरंपरेचे अभंग - ७

आदिनाथ उमा बीज प्रगटले |

मच्छिन्द्र लाधले सहज स्थिती || १ ||

तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली |

पूर्ण कृपा केली गहिनीनाथा || २ ||

वैराग्ये तापला सप्रेमे निवला |

ठेवा जो लाधला शांतीसुख || ३ ||

निर्द्वद्व निःशंक विचरता मही |

सुखानंद हृदयी स्थिरावला || ४ ||

विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख |

येऊनि सम्यक अनन्यता || ५ ||

निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण |

कुल हे पावन कृष्णनामे || ६ ||

गुरुपरंपरेचे अभंग - ८

आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा |

मच्छिन्द्र तयाचा मुख्य शिष्य || १ ||

मछिंद्राने बोध गोराक्षसी केला |

गोरक्ष वोळला गहिनीप्रती || २ ||

गहिनी प्रसादे निवृत्ती दातार |

ज्ञानदेवा सार चोजवीले || ३ ||

गुरुपरंपरेचे अभंग - ९

अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आंता |

चरणी जगन्नाथा चित्त ठेले || १ ||

माय जगन्नाथ बाप जगन्नाथ |

अनाथांचा नाथ जनार्दन || २ ||

एका जनार्दनीं एकपणे उभा |

चैतन्याची शोभा शोभतसे || ३ ||

गुरुपरंपरेचे अभंग - १०

अवघाचि संसार सुखाचा करिन |

आनंदे भरीन तिन्ही लोक || १ ||

जाईन गे माये तया पंढरपुरा |

भेटण माहेरा आपुलिया || २ ||

सर्व सुकृताचे फळ मी लाहिन |

क्षем मी देईन पांडुरंगा || ३ ||

बापरखुमादेवी वरु विठ्ठलाची भेटी |

आपुल्या सवंसाठी करुनि ठेला || ४ ||

गुरुपरंपरेचे अभंग - ११

श्रीगुरु सारिखा असता पाठीराखा |

इतरांचा लेखा कोण करी || १ ||

राजयाची कांता काय भीक मागे |

मनाचिया जोगे सिद्धी पावे || २ ||

कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला |

काय वाणी त्यानला सांगा जोजी || ३ ||

ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो |

साच उद्धारलो गुरुकृपे || ४ ||

गुरुपरंपरेचे अभंग - १२

इवलेसे रोप लावियले द्वारी |

तयाचा वेलू गेला गगनावरी || १ ||

मोगरा फुलला मोगरा फुलला |

फुले वेचिताची बहरू काळियासी आला || २ ||

मनचिये मनी गुंफियेला शेला |

बापरखुमादेवी वरु विठ्ठलु अर्पिला || ३ ||

गुरुपरंपरेचे अभंग - १३

कृपाळू सज्जन तुम्ही संतजन |

एवढे कृपादान तुमचे मज || धृ ||

आठवण तुम्ही घ्यावी पांडुरंगा |

कीव माझी सांगा काकुळती || १ ||

अननाथ अपराधी पतित आगळा |

परी पायां वेगळा नका करू || २ ||

तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी |

मग मज हरी उपेक्षीना || ३ ||

|| ज्ञानेश्वर माउली ||
|| ज्ञानराज माउली तुकाराम ||
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने