१
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया ॥१॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥
मकरकुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणि विराजित ॥३॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥
२
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठी वैजयंती ॥२॥
मुकुट कुंडले श्रीमुख शोभले । सुखाचे ओतले सकळही ॥३॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो ॥४॥
सकळही तुम्ही व्हागे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाही ॥५॥
३
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरीया ॥१॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्वकाळ ॥२॥
विठू माउलिये हाचि वर देई । संचरोनि राहीं हृदयी माझ्या ॥३॥
तुका म्हणे काही न मागो आणिक । तुझे पायी सुख सर्व आहे ॥४॥
४
आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहता लोचन सुखावले ॥१॥
आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे । जो मी तुज पाहे पांडुरंगा ॥२॥
लांचावले मन लागलीसे गोडी । ते जीवे न सोडी ऐसे झाले ॥३॥
तुका म्हणे आम्ही मागावी लडिवाळी । पुरवावी आळी मायबापा ॥४॥
५
झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा । तेणे माझ्या मना बोध केला ॥१॥
अनंत जन्मीचे विसरलो दुःख । पाहता तुझे मुख पांडुरंगा ॥२॥
योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी । तो तू आम्हांपासी मागे पुढे ॥३॥
नामा म्हणे जीवे करीन निंबलोण । विटेसहित चरण ओवाळीन ॥४॥
६
पाहता श्रीमुख सुखावले सुख । डोळियांची भूक न वजे माझ्या ॥१॥
जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिके पुढे ॥२॥
श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद निवारोनी ॥३॥
महामळे मन होते जेगादले । शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे ॥४॥
तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन । विठ्ठल निधान सापडले ॥५॥
७
येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम । तेचि मज प्रेम देई देवा ॥१॥
डोळे भरूनिया पाहीन तुझे मुख । तेचि मज सुख देई देवा ॥२॥
कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती । ते मज विश्रांति देई देवा ॥३॥
वाहे रंगी टाळी नाचेन उदास । हे देई हातांस पाया सुख ॥४॥
तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणिक नको ठाव चिंतू यासी ॥५॥
८
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव । मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥
दावी रूप मज गोपिकारमणा । ठेवू दे चरणांवरी माथा ॥२॥
पाहीन श्रीमुख देईन आलिंगन । जीवे निंबलोण उतरीन ॥३॥
पुसता सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥४॥
तुका म्हणे यासी न लावी उशीर । माझे अभ्यंतर जाणोनिया ॥५॥