काकडा आरती अभंग (संपूर्ण मंगलचरण पहिले)

काकडा आरती अभंग(संपूर्ण मंगलचरण पहिले)

संपूर्ण मंगलचरण पहिले

रुप पाहता लोचणी । सुख झाले वो साजणी ॥१॥

तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा॥२॥

बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठली आवडी ॥३॥

सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥

राहो आता हेचि ध्यान । डोळां मन लंपट॥१॥

कोंडकोंडुनि धरीन जीवे । देहभावे पूजीन ॥२॥

होईल येणे कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥३॥

तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पाया पडो द्या ॥४॥

वचन ऐका कमळापती । माझी रंकाची विनंती ॥१॥

कर जोडितों कथेकाळीं । आपण असावें जवळीं ॥२॥

घेई घेई माझी भाक । जरीं का मागेन आणिक ॥३॥

तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाची राखावा ॥४॥

तुज पाहता सामोरी । दृष्टी न फिरे माघारी ॥१॥

माझे चित्त तुझ्या पाया । मिठी पडली पंढरीराया ॥२॥

नव्हे सारिता निराळे । लवण मेळविता जळे ॥३॥

तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ॥४॥

तुम्ही सनकादिक संत । म्हणविता कृपावंत ॥१॥

एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥२॥

माझी भाकावी करुणा । विनवा वैकुंठीचा राणा ॥३॥

तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥४॥

आता तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ॥१॥

ते ते करा माझे । भार ओझे तुम्हांसी ॥२॥

वंचिले ते पायापाशी । नाही यासी वेगळे ॥३॥

तुका म्हणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायासी ॥४॥

लेकुराचे हित । वाहे माउलीचे चित्त ॥१॥

ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥२॥

पोटी भार वाहे । त्याचे सर्वस्वही साहे ॥३॥

तुका म्हणे माझे । तुम्हा संतावरी ओझे ॥४॥

करुनि उचित । प्रेम घाली हृदयांत ॥१॥

आलो दान मागायास । थोर करुनिया आस ॥२॥

चिंतन समयी । सेवा आपुलीच देई ॥३॥

तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावे देवा ॥४॥

न करी उदास । माझी पुरवावी आस ॥१॥

ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥२॥

मायबाप बंधुजन । तूचि सोयरा सज्जन ॥३॥

तुका म्हणे तुजविरहित । कोण करील माझे हित ॥४॥

१०

गरुडाचे पायी । ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥

वेगीं आणावा तो हरी । मज दीनाते उद्धरी ॥२॥

पाय लक्ष्मीच्या हाती । म्हणोंन येतो काकुलती ॥३॥

तुका म्हणे शेषा । जागे करा हृषीकेशा ॥४॥

११

येग येग विठाबाई । माझे पंढरींचे आई ॥१॥

भिमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींची गंगा ॥२॥

इतुक्यांसहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें ॥३॥

माझा रंग तुझे गुणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

|| ज्ञानेश्वर माउली ||
|| ज्ञानराज माउली तुकाराम ||
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने