काकडा आरती (संपूर्ण मंगलचरण तिसरे)

संपूर्ण मंगलचरण तिसरे

उंच नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भावभक्त देखोनिया ॥१॥

दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्याघरी रक्षी प्रल्हादासी ॥२॥

चर्म रंगू लागे रोहिदासा संगे । कबिराचे मागे शेले विणी ॥३॥

सजन कसाया विकु लागे मांस । माळ्या सावत्यास खुरपू लागे ॥४॥

नरहरी सोनारा घडू फुंकू लागे । चोखामेळ्यासंगे ढोरे ओढी ॥५॥

नामयाची जनी सवे वेची शेणी । धर्मा घरी पाणी वाहे झाडी ॥६॥

नाम्यासवे जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियाची भिंत अंगे ओढी ॥७॥

अर्जुनाचे रथी होय हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ॥८॥

गौळियांचे घरी अंगे गायी वळी । द्वारपाळ बळीद्वारी झाला ॥९॥

येकोबाचे ऋण फेडी हृषीकेशी । अंबऋषींचे सोसी गर्भवास ॥१०॥

मीराबाईसाठी घेतो विषप्याला । दामाजीचा झाला पाडेवार ॥ ११ ॥

घडी माती वाहे गोऱ्याकुंभाराची । हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी ॥ १२ ॥

पुंडलिकासाठी अझूनि तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची ॥ १३ ॥

श्रवणे कीर्तने झाले ते पावन । सनकादिक जाण परम भक्त ॥१॥

झाली ते विश्रांती याचका सकळा । जीवी जीवनकळा श्रीमूर्तिरया॥धृ॥

पादसेवने अक्रूर झाला ब्रम्हरूप । प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे ॥३॥

सख्यपणे अर्जुन नरनारायण । सृष्टी जनार्दन एकरूप ॥४॥

दास्यत्व निकट हनुमंते केले । म्हणोनी देखिले रामचरण ॥५॥

बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद । बिभीषणवरद चंद्रार्क ॥६॥

व्यास आणि वसिष्ठ वाल्मिकादिक । आणिक पुंडलीक शिरोमणी ॥७॥

शुकादिक योगी रंगले श्रीरंगी । परिक्षितीच्या अंगी ठसावले ॥८॥

उद्धव यादव आणि ते गोपाळ । गोपिकांचे मेळ ब्रम्हरूप ॥९॥

अनंत भक्तराशी तरले ते वानर । ज्ञानदेवा घर चिदानंदी ॥१०॥

पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ॥१॥

कर्मधर्म त्यांचा झाला नारायण । त्यांचेनि पावन तिन्ही लोक ॥धृ ॥

वर्णअभिमाने कोण झाले पावन । ऐसे द्या सांगून मजपाशी ॥३॥

अंत्यजादि योनी तरल्या हरिभजने । तयाची पुराणे भाट झाली ॥४॥

वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहीदास ॥५॥

कबीर मोमीन लतिफ मुसलमान । सेना न्हावी जाण विष्णूदास ॥६॥

कान्होपात्रा खोदु पिंजारी तो दादु । भजनी अभेदु हरीचे पायी ॥७॥

चोखामेळा बंका जातीचे महार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥८॥

नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवे ॥९॥

मैराळ जनक कोण कुळ त्यांचे । महिमान तयाचे काय सांगो ॥१०॥

यातायाती धर्म नाही विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ॥ ११॥

तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणो किती ॥ १२॥

बहु उतावीळ भक्तीचिंया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥१॥

तुझ्या पायी मज झालासे विश्वास । म्हणोनिया आस मोकलिली ॥ ध्रु॥

ॠषि मुनि सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥२॥

नाही नास ते सुख दिले तयास । झाले जे उदास सर्वभावे ॥३॥

तुका म्हणे सुख न माये मानसी । धरिले जीवेसी पाय तुझे ॥४॥

पुण्यवंत व्हावे । घेता सज्जनांची नावे ॥१॥

नेघे माझी वाचा तुटी । महालाभ फुकासाठी ॥धृ॥

विश्रांतीचा ठाव । पायी संताचिया भाव ॥३॥

तुका म्हणे पापे । जाती संताचिया जपे ॥४॥

उठा उठा हो साधक । साधा आपुलालें हित।।

गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत।।1।।

उठा उठा हो वेगेंसीं। चला जाऊं राऊळासी।।

हरतिल पातकांच्या राशी। कांकड आरती पाहोनी ।।धृ।।

उठोनियां हो पाहाटें । पाहा विठ्ठल उभा विटे।।

चरण तयाचे गोमटे। अमृतदृष्टीं अवलोका।।2।।

जागें करा रुक्मिणीवरा । देव आहे निजसुरा।।

देगें निंबलोण करा। दृष्ट होईल तयासी।।3।।

पुढें वाजंत्री । ढोल दमामे गर्जती।।

होत कांकड आरती । माझ्या पंढरीरायाची।।4।।

सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं ।।

केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ।।5।।

उठा उठा प्रभात जाहली । चिंता श्रीविठ्ठल माऊली ।

दीन जनांची साउलीं । येई धांउनी स्मरतांचि ॥१॥

पंढरपुरी जे भीमातटी । सुंदर मनोहर गोमटी ।

दोन्ही कर ठेवोनिया कटी । भेटीसाठी तिष्ठतसे ॥२॥

किरीट कुंडले मंडित । श्रीमुख अतिसुंदर शोभत ।

गळा वैजयंती डुल्लत । हार मिरवत तुळशीचा ॥३॥

सुरेख मूर्ति सगुण सावळी । कंठी कौस्तुभ एकावळी ।

केशर उटी परिमळ आगळी । बुक्का भाळी विलसतसे ॥४॥

पीत पीतांबर कसला कटी । अक्षयी वीट चरण तळवटी ।

सकळ सौंदर्य सुखाची पेटी । हृदय संपुष्टी आठवा ते ॥५॥

अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का । तैसीच प्रीति करी भोळ्या भाविका ।

नामा पदपंकज पादुका । शिरी मस्तकी वंदीतसे ॥६॥

उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला ।

वैष्णवांचा मेळा गरुडपारी दाटला ॥१॥

वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत ।

सुरवरांची दाटी उभे जोडूनि हात ॥२॥

शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी ।

कवाडा आडूनि पाहताती जगजेठी ॥३॥

सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ ।

रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ ॥४॥

रंभादिक नाचती उभ्या जोडूनि हात ।

त्रिशूळ डमरू घेऊनि आला गिरजेचा कांत ॥५॥

पंचप्राण आरत्या घेऊनिया देवस्त्रिया येती ।

भावे ओवाळिती राही रखुमाईचा पती ॥६॥

अनंत अवतार घेसी भक्तांकारणे ।

कनवाळु कृपाळु दीनालागी उद्धरणे ॥७॥

चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी ।

पाठीमागे डोळे झांकुनि उभी ती जनी ॥८॥

१०

कांहो तुम्ही निश्र्चिंतीने । निजलाती हरी ।

मानियेले सुख आम्ही । वाचुं कैशापरी ।

ऊठा सावध व्हावे । क्षेम सकला द्यावे ।

जयाजी वासना । तया तैसे पुरवावे ।

जन्मोजन्मी सांभाळीले । क्षमा करा अन्याय ।

कृपा करी देवा आम्हां । तुची मायबाप ।

तुका म्हणे करा । वडीलपण दानासी ।

तेणे सुख होय । सकलही जनांसी ।

११

उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ।

झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥१॥

संतसाधुमुनी अवघे झालेती गोळा ।

सोडा सेजसुख आता पाहुं द्या मुखकमळा ॥२॥

रंगमंडपीं महाद्वारी झालीसे दाटी ।

मन उतावीळ रूप पाहावया दृष्टी ॥३॥

राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया ।

सेजेहालउनि जागे करा देवराया ॥४॥

गरुड हनुमंत पुढे पाहती वाट ।

स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥५॥

झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।

विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥६॥

१२

उठा अरुणोदय प्रकाश झाला । घंटा गजर गर्जिन्नला ।

हरि चौघडा सुरु झाला । काकड आरती समयाचा ॥१॥

महाद्वारी वैष्णवजन । पूजा सामुग्री घेऊन ।

आले द्यावे तयासी दर्शन । बंदिजन गर्जती ॥२॥

सभामंडपी कीर्तन घोष । मृदंग टाळ विणे सुरस ।

आनंदे गाती हरिंचे दास । परम उल्हास करूनिया ॥३॥

चंद्रभागे वाळवंटी । प्रातःस्नानाची जनदाटी ।

आता येतील आपुले भेटी । उठी उठी गोविंदा ॥४॥

ऐसे विनवी रुक्मिणी । जागृत झाले चक्रपाणी ।

नामा बद्धांजुळी जोडुनि । चरणी माथा ठेवितसे ॥५॥

१३

भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती ।

पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती ॥१॥

ओवांळू आरती माझ्या पंढरीनाथा ।

दोन्ही कर जोडोनि चरणी ठेवीन माथा ॥२॥

काय महिमा वर्णू आता सांगणे किती ।

कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ॥३॥

राही रखुमाई दोही दो बाहीं ।

मयूर पिच्छ चामरे ढाळिती ठायीं ठायीं ॥४॥

तुका म्हणे दीप घेऊनी उन्मन ती शोभा ।

विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥५॥

१४

अवघे हरिजन मिळोनि आले राउळा ।

दोन्ही कर जोडोनि विनविती गोपाळा ॥१॥

उठा पांडुरंगा हरिजना सांभाळी ।

पाहुं द्दा वदन वंदूं पायाची धूळी ॥२॥

उगवला दिनकर झाल्या निवळस दिशा ।

कोठवरी निद्रा आता उठा परेशा ॥३॥

तुका म्हणे आम्ही उभे तिष्ठत द्वारासी ।

दोन्ही कर जोडोनि गाई गोपाळ सेवेसी ॥४॥

१५

सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा ।

उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ॥१॥

काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया ।

चराचर मोहरले तुझी मूर्ति पाहावया ॥२॥

कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक ।

नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख ॥३॥

आरती करिता तेज प्रकाशले नयनी ।

तेणे तेजेमिनला एकाएकी जनार्दनी ॥४॥

१६

कनकाच्या परियेळी उजळुनि आरती ।

रत्न दीप प्रभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥

ओवाळू गे माये सबाह्य साजिरा ।

राही रखुमाई सत्यभामेच्या वरा ॥२॥

मंडित चतुर्भुज दिव्य कानी कुंडले ।

श्रीमुखाची शोभा पाहता तेज फांकले ॥३॥

वैजयंतीमाळ गळा शोभे श्रीमंत ।

शंख चक्रगदा पद्म आयुधे शोभत ॥४॥

सावळा सकुमार जैसा कर्दळीचा गाभा ।

चरणीची नुपूरे वांकी गर्जती नभा ॥५॥

ओवाळीता मन हे उभे ठाकले ठायीं ।

समदृष्टी समान तुकया लागला पायी ॥६॥

१७

लाजले गे माय आता कोणा ओवाळू ।

जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू ॥१॥

ओवाळू मी गेले माय गेले द्वारके ।

जिकडे पहावे तिकडे चतर्भुज सारिखे ॥२॥

ओवाळू मी गेले माय सखिया माझारी ।

जिकडे पहावे तिकडे चतुर्भूज नरनारी ॥३॥

ओवाळू मी गेले माय सारंगधरा ।

जिकडे पहावे तिकडे चतुर्भूज परिवारा ॥४॥

वैजयंतीमाळ गळा श्रीवत्सलांछन ।

विष्णुदास नामा येणे दाविली खूण ॥५॥

१८

तुझिये निढळी कोटी चंद्र प्रकाशे ।

कमल नयन हास्य वदन हांसे ॥१॥

हाल का रे कृष्ण डोल का रे ।

घडिये घडिये घडिये गुज बोल का रे ॥२॥

उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो ।

बाप रखुमादेविवरू विठ्ठलु नाहो ॥३॥

उठा सकळ जन उठिले नारायण ।

आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥

करा जयजयकार वाद्यांचा गजर ।

मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥२॥

जोडोनिया कर मुख पाहा सादर ।

पायावरी शिर ठेवूनिया ॥३॥

तुका म्हणे काय पढियंते मागा ।

आपुलाले सांगा सुखदुख ॥४॥

|| ज्ञानेश्वर माउली ||
|| ज्ञानराज माउली तुकाराम ||
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने