संत एकनाथ महाराज गवळणी

संत एकनाथ महाराज गवळणी

गवळणी

वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे ।

वेणुनादे गोवर्धनु गाजे ।

पुच्छ पसरुनि मयूर विराजे ।

मज पाहता भासती यादवराजे ॥१॥

तृण चारा चरूं विसरली ।

गाई व्याघ्र एके ठायीं जालीं ।

पक्षीं कुळे निवांत राहिली ।

वैरभाव समूळ विसरली ॥२॥

यमुना जळ स्थिर स्थिर वाहे ।

रविमंडळ चालता स्तब्ध होये ।

शेषकूर्म वराह चकित राहे ।

बाळा स्तन देऊ विसरली माये ॥३॥

ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती ।

वांकी रुणझुण रुणझुण वाजती ।

देव विमानी बैसोनि स्तुती गाती ।

भानुदासा फावली प्रेमभक्ति ॥४॥

यशोदे कृष्णाला सांगावे ।

गोकुळी रहावे का जावे ॥धृ॥

अवघ्या मिळोनी गौळणी ।

जात होत्या मथुरा बाजारी ।

उभा हा कृष्ण वाटेवरी ॥१॥

अनया गवळी करी धंदा ।

त्याचीच गवळण मी राधा ।

जावूनी नंदासी सांगावे ॥२॥

पे द्या सुदामाची जोडी ।

बळीभद्र त्याचा गडी ।

याला बाई उखळासी बांधावे ।

देव हा विधीचा जनिता ।

भानुदास चरणी ठेवी माथा ।

प्रभुच्या चरणासी लागावे ॥३॥

गौळणी गाऱ्हाणे सांगती यशोदेसी ।

दही दूध खाऊनिया पळुनी जातो हृषीकेशी ॥१॥

लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे ।

याच्या खोडी सांगू किती महीपत्र सिंधु आटे ॥२॥

मेळवोनि गोपाळ घरांमध्ये शिरे कान्हा ।

धरुं जाता पळुनि जातो यादवांचा राणा ॥३॥

ऐसे मज याने पिसे लावियेले सांगू काई ।

एका जनार्दनी कायावाचामने पायी ॥४॥

माझा कृष्ण देखिला काय ।

कोणी तरी सांगा गे ॥धृ॥

हाती घेऊनिया फूल ।

अंगणी रांगत आले मूल ।

होते सारवित मी चूल ।

कैसी भूल पडियेली ॥१॥

माथां शोभे पिंपळपान ।

मेघवर्ण ऐसा जाण ।

त्याला म्हणती श्रीभगवान ।

योगी ध्यान विश्रांती ॥२॥

संगे घेऊनि गोपाळ ।

बाळ खेळे आळुमाळ ।

पायी पोल्हारे झळाळ ।

गळा माळ वैजयंती ॥३॥

एका जनार्दनी माय ।

घरोघरांप्रती जाय ।

कृष्णा जाणावे ते काय ।

कोणी सांगा गे ॥४॥

नानापरी समजाविते परी न राहे श्रीहरी ।

दहींभात कालवोनि दिला वेगी झडकरी ।

कडेवरी घेऊनिया फिरले मी दारोदारी ॥१॥

राधे राधे राधे राधे घेई शामसुंदरा ।

नेई आता झडकरी आपुलिया मंदिरा ॥धृ॥

क्षणभरी घरी असता करी खोडी शारंगपाणी ।

खेळावया बाहेरी जाता आळ घेती गौळणी ।

थापटोनि निजविता पळोनि जातो राजद्वारा ॥२॥

राधा घेऊनि हरिला त्वरे जात मंदिरी ।

हृदयमंचकी पहुडविला श्रीहरी ।

एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी ॥३॥

तुझे श्रीमुख सुंदर ।

कुसुम शुभकांति नागर ।

कासे पीतांबर मनोहर ।

पाहुनी भुल पडली करुणाघना ॥१॥

मुरली नको वाजवुं मनमोहना ॥धृ॥

सर परता होय माघारा ।

देहभाव बुडाला सारा ।

नाही संसारासी थारा ।

भेदभ्रम गेला कमलनयना ॥२॥

ध्वनि मंजुळ ऐकिली कानी ।

सर्व सुखां झाली धनी ।

एका जनार्दनी ध्यानी मनी ।

एकपणा जगज्जीवना ॥३॥

कशी जाऊ मी वृंदावना ।

मुरली वाजवी कान्हा ॥धृ॥

पैलतीरी हरी वाजवी मुरली ।

नदी भरली यमुना ॥१॥

कांसे पितांबर कस्तुरी टिळक ।

कुंडल शोभे काना ॥२॥

काय करु बाई कोणाला सांगू ।

नामाची सांगड आणा ॥३॥

नंदाच्या हरीने कौतुक केले ।

जाणे अंतरीच्या खुणा ॥४॥

एका जनार्दनी मनी म्हणा ।

देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥

भुलविले वेणुनादे ।

वेणु वाजविला गोविंदे ॥१॥

पांगुळले यमुनाजळ ।

पक्षी राहिले निश्चळ ॥२॥

तृणचरे लुब्ध झालीं ।

पुच्छ वाहुनिया ठेलीं ॥३॥

नाद न समाये त्रिभुवनी ।

एका भुलला जनार्दनी ॥४॥

चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहु ।

नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ ॥१॥

कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचुं ।

देहभाव ठेऊनी पायी ब्रह्मपदी नाचूं ॥२॥

सर्व गर्व सोडूनी बाई चला हरीपाशी ।

द्वैतभाव ठेवुनि पायी हरिरुप होसी ॥३॥

एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव ।

एक एक पाहता अवघे स्वप्नवत वाव ॥४॥

१०

अधरी धरुनि वेणु ।

वाजविला कुणी नेणुं ॥१॥

प्रातकाळी तो वनमाळी ।

घेऊनि जातो धेनु ॥२॥

उभी मी राहे वाट मी पाहे ।

केव्हां भेटेल मम कान्हु ॥३॥

एका जनार्दनी वाजविला वेणु ।

ऐकता मन झाले तल्लीनु ॥४॥

११

तुझ्या मुरलीचा ध्वनी ।

अकल्पित पडिला कानी ।

विव्हळ झाले अंतःकरणी ।

मी घरधंदा विसरले ॥१॥

अहा रे सांवळीया कैशी

वाजविली मुरली ॥धृ॥

मुरली नोहे केवळ बाण ।

तिने हरीला माझा प्राण ।

संसार केला दाणादीन ।

येउनि हृदयी संचरली ॥२॥

तुझ्या मुरलीचा सूर तान ।

मी विसरले देहभान ।

सोडोनि धरिले रान ।

मी वृंदावनी गेले ॥३॥

एका जनार्दनी गोविंदा ।

पतितपावन परमानंद ।

तुझ्या नामाचा मज धंदा ।

वृत्ति तंव पदीं निवर्तली ॥४॥

१२

मुरली मनोहर रे माधव ॥धृ॥

श्रीवत्सलांछन हृदयी विलासन ।

दीन दयाघन रे ॥१॥

सुरनर किन्नर नारद तुंबर ।

गाती निरंतर रे ॥२॥

एका जनार्दनी त्रिभुवनमोहन ।

राखीतो गोधन रे ॥३॥

१३

दुडीवरी दुडी गौळणी साते निघाली ।

गौळणी गोरस म्हणों विसरली ॥१॥

गोविंदु घ्या कोनी दामोदरु घ्या गे ।

तंव तंव हांसती मथुरेच्या गे ॥२॥

दुडीयामाझारी कान्होंबा झाला भारी ।

उचंबळे गोरस सांडे बाहेरी ॥३॥

एका जनार्दनी सबलस गौळणी ।

ब्रह्मानंदु न समाये मनी ॥४॥

खांद्यावरी कांबळी हातामधीं काठी ।

चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥

राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी ।

वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥

एक एक गौळणी एक एक गोपाळा ।

हाती धरुनि नाचती रासमंडळा ॥३॥

एका जनार्दनी रासमंडळ रचिले ।

जिकडे पाहे तिकडे अवघें ब्रह्म कोंदले ॥४॥

१५

गौळणी म्हणती यशोदेला ।

कोठे गे सावळा ।

का रथ शृंगारिला ।

सांगे वो मजला ।

अक्रुर उभा असे बाई गे साजनी ॥१॥

या नंदाच्या अंगणी ।

मिळाल्या गौळणी ॥धृ॥

बोले नंदाची पट्टराणी ।

सद्गदीत होऊनि ।

मथुरेसी चक्रपाणी ।

जातो गे साजणी ।

विव्हळ झाले मन वचन ऐकोनि ॥२॥

अक्रुरा चांडाळा ।

तुज कोनी धाडिला ।

का घाता करु आलासी ।

वधिशी सकळा ।

अक्रुरा तुझे नाम तैशीच करणी ॥३॥

रथीं चढले वनमाळी ।

आकांत गोकुळी ।

भूमि पडल्या व्रजबाळी ।

कोण त्या सांभाळी ।

नयनींच्या उदकांने भिजली धरणी ॥४॥

देव बोले अक्रुरासी ।

वेगे हांकी रथासी ।

या गोपींच्या शोकासी ।

न पहावे मजसी ।

एका जनार्दनी रथ गेला निघोनि ॥५॥

१६

गौळणी सांगती गाऱ्हाणी ।

रात्री आला चक्रपणी ।

खाऊनी दही दूध तूप लोणी ।

फोडिली अवघी विरजणी ।

हा गे बाई कोणासी आवरेना ॥१॥

यशोदे बाळ तुझा तान्हा ।

कोठवर सोसू धिंगाणा ॥धृ॥

दुसरी आली धांवत ।

याने बाई काय केली मात ।

मुखाशीं मुखचुंबन देत ।

गळ्यामधी हात घालीत ।

धरुं जाता सांपडेना ॥२॥

तिसरी आली धांऊनि ।

म्हणे गे बाई काय केली करणी ।

पतीची दाढ़ी माझी वेणी ।

दोहीसी गांठ देऊनी ।

गांठ बाई कोणासी सुटेना ॥३॥

मिळोनि अवघ्या गौळणी ।

येती नंदाच्या अंगणी ।

जातो आम्ही गोकुळ सोडोनी ।

आमुच्या सुना घेऊनी ।

हे बाई आम्हांसी पहावेना ॥४॥

ऐशीं ऐकता गाऱ्हाणी ।

यशोदानयनी आले पाणी ।

कृष्णा खोडी दे टाकुनी ।

एका जनार्दनी चरणी ।

प्रेम तया आवरेना ॥५॥

१७

ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगु काई ।

त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई ॥१॥

देवकीने वाहिला यशोदेने पाळिला ।

पांडवांचा बंदीजन होऊनियं राहिला ॥२॥

ब्रह्मांडाची सांठवण योगीयाचे निजधन ।

चोरी केली म्हणऊनी उखळासी बंधन ॥३॥

सकळ तीर्थें जया चरणी सुलभ हा शूळपाणी ।

राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ॥४॥

शरण एका जनार्दनी कैवल्याचा मोक्षदानी ।

गाई गोप गोपीबाळा मेळविले आपुलेपणी ॥५॥

१८

आवरी आवरी आपुला हरी ।

दुर्बळाची केली चोरी ।

घरा जावयाची उरी ।

कृष्णें ठेविली नाही ॥१॥

गौळणी उतावेळी ।

आली यशोदेजवळी ।

आवरी आपुला वनमाळी ।

प्रळय आम्हां दिधला ॥२॥

कवाड भ्रांतीचे उघडिले कुलुप मायेचे मोडिले ।

शिंके अविद्येचे तोडिले ।

बाई तुझिया कृष्णें ॥३॥

होती क्रोधांची अर्गळा ।

हळूचि काढिलीसे बळा ।

होती अज्ञानाची खिळा ।

तीहि निर्मूळ केली ॥४॥

डेरा फोडिला दंभाचा ।

त्रिगुण तिवईस ठाव कैसा ।

प्रंपंच सडा हा ताकाचा ।

केला तुझिया कृष्णें ॥५॥

अहंकार होता ठोंबा ।

उपडिला धुसळखांबा ।

तोहि टाकिला स्वयंभा ।

बाई तुझिया कृष्णें ॥६॥

संचित हे शिळे लोणी ।

याचि केली धूळीधाणी ।

संकल्प विकल्प दुधाणी ।

तीही फोडिली कृष्णें ॥७॥

प्रारब्ध हे शिळे दही ।

माझे खादले गे बाई ।

क्रियमाण दुध साई ।

तींही मुखीवोतिली ॥८॥

द्वेष रांजण सगळे ।

स्पर्शे होती हात काळे ।

होते कामाचे ते पाळे ।

तेहि फोडिले कृष्णें ॥९॥

सुचित दुश्चित घृत घागरी ।

लोभे भरल्या अहोत्या घरी ।

त्याही टाकिल्या बाहेरी ।

तुझिया कृष्णें ॥ १० ॥

कल्पनेची उतरंडी ।

याची केली फोडाफॊडी ।

होती आयुष्याची दुरडी ।

तेही मोडिली कृष्णें ॥ ११ ॥

पोरे ग अचपळ आमुची ।

संगती धरली या कृष्णाची ।

मिळणी मिळाली तयाची ।

संसाराची शुद्धी नाही ॥ १२ ॥

ऐशी वार्ता श्रवनी पडे ।

मग मी धांवोनि आले पुढे ।

होते द्वैताचे लुगडे ।

तेही फिटोनि गेले ॥ १३ ॥

आपआपणा विसरणे ।

कृष्णस्वरुपीं मिळाले ।

एका जनार्दनी केले ।

बाई नवल चोज ॥ १४ ॥

१९

गोकुळी चोरी करितो चक्रपाणी ।

गौळणी येउनी सांगती गाऱ्हाणी ।

येणे माझे भक्षिले दही दूध लोणी ।

पळोनिया येथे आला शारंगपाणी वो ॥१॥

आवरी आवरी यशोदे आपुला कान्हा ।

याच्या खोडी किती सांगु जाणा ।

याचे लाघव न कळे चतुरानना ।

यासी पाहता मन नुरे मीपणा वो ॥२॥

एके दिवशीं मी आपुले मंदिरी ।

मंथन करिता देखिला पुतनारी ।

जवळी येवोनि रवीदंड धरी ।

म्हणे मी घुसळितो तु राहे क्षणभरी वो ॥३॥

परवा आमुचे घरासी आला ।

संगे घेउनी गोपाळांचा मेळा ।

नाचले ऐकत धरे पाहे अचला ।

धरूं जाता तो पळोनिया गेला वो ॥४॥

ऐसे बहु लाघव केले येणे ।

किती सांगावे तुज गाऱ्हाणे ।

एका जनार्दनी परब्रह्मा तान्हें ।

यासी ध्याता खुंटले येणे जाणे वो ॥५॥

२०

नंदनंदन मुरलीवाला ।

याच्या मुरलीचा वेध लागला ॥१॥

प्रपंच धंदा नाठवे काही ।

मुरलीचा नाद भरला हृदयी ॥२॥

पती सुताचा विसर पडिला ।

याच्यामुरलीचा छंद लागला ॥३॥

स्थावर जंगम विसरुनि गेले ।

भेदभाव हारपले ॥४॥

समाधि उन्मनी तुच्छ वाटती ।

मुरली नाद ऐकता मना विश्रांती ॥५॥

एका जनार्दनी मुरलीचा नाद ।

ऐकता होती त्या सदगद ॥६॥

२१

कृष्णमूर्ती होय गे कळो आली सोयं गे ।

प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगुं काय गे ॥१॥

तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे ।

अर्धांगी रुक्मिणी विंझणे वारित गोपी बाळा गे ॥२॥

पीतांबराची कास गे कसिली सावकाश गे ।

नारद तुंबर गायन करिती पुढे निजदास गे ॥३॥

भक्त कृपेची माय गे ओळखिली विठाई गे ।

एका जनार्दनी विटे जोडीयेले पाय गे ॥४॥

२२

कृष्णाला भुलविले गोपीने ॥धृ॥

यशोदे तुझा हा कान्हा राहीना ।

मी मारीन क्रोधाने ॥१॥

नंदजी तुमचा कृष्ण लाडका ।

हाका मरितो मोठ्याने ॥२॥

वेताटी घेउनी नावेंत बैसला ।

वांचविले देवाने ॥३॥

एका जनार्दनी पूर्ण कृपेने ।

नाही ऐकिले मातेने ॥४॥

२३

कसा मला टाकुनी गेला राम ॥धृ॥

रामाविण जीव व्याकुळ होतो ।

सुचत नाही काम ॥१॥

रामाच्या विण मज चैन पडेना ।

नाही जीवासी आराम ॥२॥

एका जनार्दनी पाहुनी डोळा ।

स्वरुप तुझे घनःश्याम ॥३॥

२४

तुझी संगती नाही कामाची ।

मी सुंदरा कोवळ्या मनाची ।

मज दृष्टी होईल साची ।

मग तुझी घेइन चर्या ॥१॥

कसे वेड लाविले कान्हों गोवळिया ॥धु॥

माझा वंश आहे मोठ्याचा ।

तुं तंव यातीहीन गौळ्याचा ।

ऐक्य जालीया नांवरुपाचा ।

ठावचि पुसलिया ॥२॥

तुझ्या अंगेची घुरट घाणी ।

तनु काय दिसती वोंगळवाणी ।

मुरली वाजविसी मंजुळवाणी ।

मनमोहन कान्हया ॥३॥

तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा ।

चोरी करुनी भरिसी पोटा ।

व्रजनारी सुंदरा चावटा ।

अडविसी अवगुणीया ॥४॥

सर्व सुखाची कृष्णसंगती ।

वेणुनादे गाई गोप वेधती ।

एका जनार्दनी हरिरुपी रमती ।

त्या व्रज सुंदरीया ॥५॥

२५

गोधने चाराया जातो शारंगपाणी ।

मार्गीं भेटली राधिका गौळणी ।

कृष्ण दान मागे निरी आसडोनी ।

तंव ती देखिली यशोदा जननी ॥१॥

यशोदा म्हणे नाटका हृषीकेशी ।

परनारीसी कैसा रे झोंबसी ।

येरु रुदत सांगतो मातेपाशी ।

माझा चेंडु लपविला निरिपाशीं ॥२॥

राधिका म्हणे यशोदे परियेसी ।

चेंडु नाही नाही वो मजपाशी ।

परि हा लटिका लबाड हृषीकेशी ।

निरी आसडिता चेंडु पडे धरणीसी ॥३॥

यशोदा म्हणे चाळका तुम्ही नारी ।

मार्गीं बैसता क्षण एक मुरारी ।

एका जनार्दनी विनवी श्रीहरी ।

नाम घेता पातके जाती दुरी ॥४॥

२६

पाहिला नंदाचा नंदन । तेणे वेधियेले मन ।।१।।

मोर मुकुट पीतांबर । काळ्या घोंगडीचा भार ।।२।।

गोधने चारी आनंदे नाचत । करी काला दहिभात ।।३।।

एका जनार्दनी लडिवाळ बाळ तान्हा ।

गोपाळांशी खेळे कान्हा कुंजवना ।।४।।

२७

रडते माझे बाळ तान्हे ।

समजाविता राहीना ॥धृ॥

नानापरी समजाविते ।

मागील ते खाया देते ।

थापटोनी निजविते ।

तरी हा उगा राहीना ॥१॥

नानापरी करितो छंद ।

रडतो हा स्फुंद स्फुंद ।

नेत्रावाटे वाहे बुंद ।

रडता हा राहीना ॥२॥

पोटी धरुनिया दम ।

सर्वाअंगी सुटला घाम ।

एका जनार्दने प्रेम यशोदेसी माईना॥३॥

|| ज्ञानेश्वर माउली ||
|| ज्ञानराज माउली तुकाराम ||
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने