संत तुकाराम महाराज गवळणी

संत तुकाराम महाराज गवळणी

संत तुकाराम महाराज गवळणी

गवळणी १

कान्हया रे जगजेठी । देई भेटी एकवेळा ॥१॥

काय मोकलिले वनी । सावजांनी वेढिले ॥धृ॥

येथवरी होता संग । अंगे अंग लपविले ॥२॥

तुका म्हणे पाहिले मागे । एवढया वेगे अंतरला ॥३॥

गवळणी २

आंत हरि बाहेर हरि । हरिने घरी कोंडिले ॥१॥

हरिने कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविले ॥धृ॥

हरिने जीवे केली साटी । पाडिली तुटी सकळासी ॥२॥

तुका म्हणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोंवताला ॥३॥

गवळणी ३

कोणी एकी भुलली नारी । विकिता गोरस घ्या म्हणे हरी ॥१॥

देखिला डोळा बैसला मनी । तोचि वदनी उच्चारी ॥धृ॥

आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुके ॥२॥

तुका म्हणे हांसे जन । नाही कान तये ठायीं ॥३॥

गवळणी ४

हरिने माझे हरिले चित्त । भार वित्त विसरले ॥१॥

आता कैसी जाऊ घरा । नव्हे बरा लौकिक ॥धृ॥

पारखियांसी सांगता गोष्टी । घरची कुटी खातील ॥२॥

तुका म्हणे निवांत राही । पाहिले पाही परतोनी ॥३॥

गवळणी ५

हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी ।

तुझ्या दर्शने होईन काळी । मग हे वाळी जन मज ॥१॥

उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गोवळा ।

तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥धृ॥

तुझिये अंगी घुरट घाणी । बहु खासी दुध तुप लोणी ।

घरिचे बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥२॥

मज ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन । अंगी

तुझे देखोनि लक्षण । मग विटंबणा होइल रे ॥३॥

तुज लाज भय शंका नाही । मज तंव सज्जन पिशुन व्याही ।

आणीक मात बोलूं काही । कैसी भीड नाही तुज माझी ॥४॥

वचन मोडी नेदी हात । कळले न साहे ची मात ।

तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनि भोगी ॥५॥

गवळणी ६

गाई गोपाळ यमुनेचे तटी । येती पाणिया मिळोनि जगजेठी ।

चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी । चला चला म्हणती पाहूं दृष्टी वो ॥१॥

ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ देखावया हरी ।

मिस पाणियाचे करितील घरी । बारा सोळा मिळोनि परस्परी वो ॥धृ॥

चिरे चोळिया त्या धुता विसरती । ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती ।

कोणा नाठवे कोण कुळ याती । जालीं तटस्थ सकळ नेत्रपाती वो ॥२॥

दंतधावनाचा मुखामाजी हात । वाद्यें वाजती नाइके जनमात ।

करी श्रवण कृष्णवेणुगीत । स्वामी तुकयाचा पुरवील मनोरथ वो ॥३॥

गवळणी ७

बाळपणी हरि । खेळे मथुरेमाझारी ।

पायी घागरिया सरी । कडदोरा वांकी ।

मुख पाहे माता । सुख न माये चित्ता ।

धन्य मानव संचिता । वोडवले आजि ॥१॥

बाळ चांगले वो । बाळ चांगले वो ।

म्हणता चांगले । वेळ लागे तया बोले ।

जीवापरीस ते वाल्हें । मज आवडते ॥धृ॥

मिळोनिया याती । येती नारी कुमारी बहुती ।

नाही आठव त्या चित्ती । देहभाव काही ।

विसरल्या घरे । तान्ही पारठी लेकुरे ।

धाक सांडोनिया येरे । तान भूक नाही ॥२॥

एकी असतील घरी । चित्त तयापासीं परी ।

वेगी करोनि वोसरी । तेथे जाऊ पाहे ।

लाज सांडियेली वोज । नाही फजितीचे काज ।

सुख सांडोनिया सेज । तेथे धाव घाली ॥३॥

वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा ।

बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या ।

कुमर कुमारी । नाही भाव हा शरीरी ।

दृष्टी न फिरे माघारी । तया देखता हे ॥४॥

वैरभाव नाही । आप पर कोणी काही ।

शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं ।

तुका म्हणे सुखी । केलीं आपणासारिखीं ।

स्वामी माझा कवतुकी । बाळवेषें खेळे ॥५॥

गवळणी ८

स्वये सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव ।

अवघ्यां अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथेचि त्याचा जीव वो ॥१॥

आपआपणाशीं करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल ।

एका मेघःश्यामे जलधर वोल । रसीं उताविळ हृदय सखोल वो ॥धृ॥

एक विषय तो सकळाचा हरि । त्याच्या आवडीने आवडी इतरी ।

अंध बहिर हे प्रेत लोका चारी । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरी वो ॥२॥

स्तुति पराविया मुखे रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवी आदर ।

परस्परे हे सादरा सादर । योग सज्जनाच्या सुखा नाही पार वो ॥३॥

भक्तिवल्लभ न तुटे चराचरी । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी ।

दुरी जवळी संचिता ऐसे धरी । रंगा रंगा ऐसे होणे लागे हरि वो ॥४॥

तुका लाधला हे उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमे वोसंडून ।

पडिले कानी त्या जीवाचे जतन । धरियेले एकाभावे हृदयी चरण वो ॥५॥

गवळणी ९

आजि नवल मी आले येणे राणे । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें ।

गोवी सांगती वो सकळ ही जन । होते संचित आणियेले तेणे वो ॥१॥

गेले होउनि न चले आता काही । साद घालिता जवळी दुजे नाही ।

अंगी जडला मग उरले ते काई । आता राखता गुमान भले बाई वो ॥धृ॥

बहुत कामे मज नाही आराणूक । एक सारिता तो पुढे उभे एक ।

आजि मी टाकोनि आले सकळिक । तंव रचिले आणिक कवतुक वो ॥२॥

चिंता करिता हरिली नारायणे । अंगसंगे मिनता दोघेजणे ।

सुखे निर्भर जालिये त्याच्या गुणे । तुका म्हणे खुंटले येणे जाणे वो ॥३॥

गवळणी १०

होते बहुत हे दिवस मानसी । आजि नवस हे फळले नवसी ।

व्हावी भेटी ते झाली गोविंदासीं । आता सेवा करीन निश्चयेसीं वो ॥१॥

स्थिर स्थिर मजचि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ।

येथे आड मज न साहावे वारा । देऊनि कपाट आले ते दुसरे वारा वो ॥धृ॥

मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळे होऊ एकी घडी ।

नाही लौकिक स्मरला आवडी । आता येणे काळे या लोभे वेडी वो ॥२॥

उदयीं उदय साधिला अवकाश । निश्चिंतीने निश्चिंती सावकाश ।

धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता न ये दिवस वो ॥३॥

गवळणी ११

आजि का वो तू दिससी दुश्चिती । म्हणीये काम न लगे तुझ्या चित्ती ।

दिले ठेवू ते विसरसी हाती । नेणों काय बैसला हरि चित्ती वो ॥१॥

सर सर परती जालीस आता भांड । कैसे दाखविसी जगासी या तोंड ।

व्याली माय ते लाजविली रांड । नाही थार दो ठायीं जाला खंड वो ॥धृ॥

होते तैसे ते उमटले वरी । बाह्य संपादणी अंतरींची चोरी ।

नाही मर्यादा निःसंग बावरी । मन हे गोविंदीं देह काम करी वो ॥२॥

नाही करीत उत्तर कोणासवे । पराधीन भोजन दिले खावे ।

नाही अचळ सावरावा ठावे । देखों उदासीन तुझे देहभावं वो ॥३॥

कोठे नेणों हा फावला एकांत । सदा किलकिल भोंवती बहुत ।

दोघे एकवाटा बोलावया मात । नाही लाज धरिली दिला हात वो ॥४॥

करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासासुना ।

परा भक्ति हे शुद्ध तुम्ही जाणा । तुका म्हणे ऐसे कळो यावे जना वो ॥५॥

गवळणी १२

भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचे गोविंदाची चट ।

चाले झडझडां उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तोचि नीट वो ॥१॥

चाळा लावियेले गोप गोपीनाथें । जाणे आवडीचे रूप जेथे तेथे ।

दावी बहुतांच्या बहुवेषपंथें । गुणातीते खेळ मांडियेला येथे वो ॥धृ॥

मनी आवडे ते करावे उत्तर । काही निमित्ताचा पाहोनि आधार ।

उगा राहे का मारिसी कंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥२॥

धरिली खोडी दे टाकोनिया मागे । न ये विनोद हा कामा मशीं संगे ।

मिठी घालीन या जीवाचिया त्यागे । नाही ठाउकी पडिलीं तुझी सोंगे वो ॥३॥

सुख अंतरींचे बाह्य ठसठसी । म्हणे विनोद हा काय सोंग यासी ।

तुज मज काय सोयरीक ऐसी । नंदानंदन या थोरपणे जासी रे ॥४॥

करी कारण ते कळो नेदी कोणा । सुख अंतरींचे बाह्य रंग जाना ।

मन मिनले रे तुका म्हणे मना । भोग अंतरींचा पावे नारायणा वो ॥५॥

गवळणी १३

नका काही उपचार माझ्या शरीरा । करू न साहती बहु होतो उबारा ।

मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा वो ॥१॥

सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा ।

उमटली अंगी वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा वो ॥धृ॥

नये कळो नेदावी हे दुजियासि मात । घडावा तयासि उत्कंठा एकांत ।

एकाएकी साक्षी येथे आपुले चित्त । कोण्या काळे होइल नेणों भाग्य उदित वो ॥२॥

स्वाद सीण देहभान निद्रा खंडन । पाहिले तटस्थ उन्मळित लोचन ।

अवघें वोसाऊन उरले ते चरण । तुका म्हणे दर्शनापे आले जीवन वो ॥३॥

गवळणी १४

पडिली भुली धांवते सैराट । छंद गोविंदाचा चोजविते वाट ।

मागे सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजेठेवुनि ललाट वो ॥१॥

कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होते वहिले लपाला आता खांदीं ।

कोठे आड आली हे देहबुद्धी । धांवा आळवी करुणा कृपानिधी वो ॥धृ॥

मागे बहुतांचा अंतरला संग । मुळे जयाचिया तेणे केला त्याग ।

पैल पाहाता ते हरपले अंग । खुंटली वाट नाहींसे झाले जग वो ॥२॥

शोके वियोग घडला सकळाचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा ।

केला उच्चार रे घडल्या दोषांचा । झाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥३॥

गवळणी १५

काय उणे का करिशील चोरी । किती सांगों तुज नाइकसी हरी ।

परपरता तू पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥

माया करुणा हे करिते बहुत । किती सोसूं या जनांचे आघात ।

न पुरे अवसरु हे चि नित्यानित्य । तूचि सोडवी करूनि स्थिर चित्त वो ॥धृ॥

बहुत कामे मी गुंतलिये घरी । जासी डोळा तू चुकवूनि हरी ।

करिता लाग न येसी चपळभरी । नाही सायासाची उरो दिली उरी वो ॥२॥

तुज म्हणीये मी न संगे अनंता । नको जाऊ या डोळिया परता ।

न लगे जोडी हे तुजविण आता । तुकयास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥३॥

गवळणी १६

घाली कवाड टळली वाड राती । कामे व्यापिलीं का पडिली दुश्चित्ती ।

कोणे लागला गे सदैवेचे हाती । आजि शून्य शेजे नाही दिसे पती वो ॥१॥

बोले दूतिकेशीं राधा हे वचन । मशीं लाघव दाखवी नारायण ।

म्हणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशीं न बोले कळला मज पूर्ण वो ॥धृ॥

धाडिले गरुडा आणिले हनुमंता । तैं पाचारिले होउनि येई वो सीता ।

लाजिन्नली रूप न ये पालटिता । झाला भीमकी आपण राम सीता वो ॥२॥

सत्यभामा दान करी नारदासी । तैं कळला वो मज हृषीकेशी ।

तुळे घालिता न ये कनक वो रासी । सम तुके एक पान तुळसी वो ॥३॥

मज भुली पडली कैशापरी । आम्हां भोगूनि म्हणे मी ब्रम्हचारी ।

दिली वाट यमुने माये खरी । तुम्हा आम्हां न कळे अद्यापवरी वो ॥४॥

जाणे जीवींचे सकळ नारायण । असे व्यापूनि परी न दिसे लपून ।

राधा संबोखिली प्रीती आलिंगून । तुका म्हणे येथे भावचि कारण वो ॥५॥

गवळणी १७

धरिला पालव न सोडी माझा येणे । काही करिता या नंदाचिया कान्हें ।

एकली न येते मी ऐसे काय जाणे । कोठे भरले या अवघड राणे रे ॥१॥

सोडी पालव जाऊ दे मज हरी । वेळ लागला रे कोपतील घरी ।

सासू दारुण सासरा आहे भारी । तुज मज सांगता नाही उरी रे ॥धृ॥

सखिया वेशिया होतिया । तुज फावले रे फांकता तयासी ।

होते अंतर तर सांपडते कैसी । एकाएकी अंगी जडलासी रे ॥२॥

ऐसी भागली हे करिता उत्तर । शक्ति मावळल्या आसुडिता कर ।

स्वामी तुकयाचा भोगिया चतुर । भोग भोगी त्यांचा राखे लोकाचार वो ॥३॥

गवळणी १८

हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥१॥

अवघ्या अंगे सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥धृ॥

वाचा वाच्यत्वासि न ये । कोठे काय करावे ॥२॥

तुका म्हणे देवा ऐशा । देवपिशा उदारा ॥३॥

गवळणी १९

कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी स्वतंता ॥१॥

अवघियांची जगनिंद । झाली धिंद सारखी ॥धृ॥

अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥२॥

तुका म्हणे करा सेवा । आले जीवावरी तरी ॥३॥

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने