
संत मुक्ताबाई आणि योगी चांगदेव यांची ऐतिहासिक भेट
योगसिद्ध व तपस्वी योगी चांगदेव यांना एकदा संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान व मुक्ताबाई यांच्या ख्यातीची माहिती मिळाली. त्यांच्या भेटीची उत्सुकता वाढली. त्यांनी पत्र लिहिण्याचा विचार केला पण काहीच सुचले नाही, आणि कोरे पत्र ज्ञानेश्वरांना पाठवले.
निवृत्तीनाथांनी ते पत्र पाहून चांगदेवांचे अद्यात्मिक अपूर्णत्व ओळखले व ज्ञानेश्वरांना उत्तर लिहिण्याची आज्ञा केली. ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले, ते ६५ ओव्यात होते आणि ते“चांगदेव पासष्टी” म्हणून प्रसिद्ध झाले — जे आत्मज्ञान, विनय, आणि बोधयात्रेचे प्रतीक ठरले.
भिंत चालली : अहंकाराचा पराभव
योगसिद्ध चांगदेवांनी ज्ञानेश्वरांची भेट घेण्यासाठी वाघावर बसून, हातात नाग घेऊन आणि शिष्यांसह मोठ्या गर्वाने प्रस्थान केले. त्यांच्या सिद्धीचा प्रदर्शन करायचा हेतू होता. पण ज्ञानेश्वर व भावंडं एका भिंतीवर बसले होते.
चांगदेवांचा अहंकार लक्षात येताच ज्ञानेश्वरांनी भिंतीला पुढे जाण्याचा आदेश दिला, आणि भिंत चालू लागली! हा चमत्कार पाहून चांगदेव विस्मयचकीत झाले. त्यांनी शरणागती स्वीकारली आणि आपली अहंता बाजूला ठेवली.
मुक्ताबाईंचा गुरुपद स्वीकार
या भेटीनंतर निवृत्तीनाथांनी आदेश दिला की चांगदेवांनी मुक्ताबाईंचे शिष्य व्हावे. आध्यात्मिक शक्ती असूनही आत्मज्ञानाचा अभाव असलेल्या चांगदेवांना मुक्ताबाईंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता होती.
"योगिया म्हणवी आणि इंद्रियांचा रंकु, तयाचा विवेकु जाळी परता"
मुक्ताई यांनी त्यांना
“चांगदेव पासष्टी”चा अर्थ समजावून सांगितला. त्यातून गुरु-शिष्य नात्याची सुरुवात झाली. पुढे चांगदेव यांनी मुक्ताबाईंना नम्रतेने वंदन करत पुढील शब्दांत आपली भावना व्यक्त केली:
"चौदा शत झाली बुद्धी माझी गेली, सोय दाखविली मुक्ताईने"
चांगदेवांनी नंतर मुक्ताबाई व इतर भावंडांची पूजा केली आणि पुढे शके १२२७ (इ.स. १३०५) मध्ये समाधी घेतली. (या तारखेबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.)
उपसंहार
संत मुक्ताबाई आणि योगी चांगदेव यांची भेट ही केवळ एक चमत्कारी प्रसंग नव्हे, तर आत्मविकासाची आणि अहंकार-विनाशाची शिकवण देणारी दैवी कथा आहे. मुक्ताईसारख्या थोर संतांनी योग्य मार्गदर्शन देऊन योगसिद्धीही आत्मज्ञानात रुपांतरित कशी होते याचे दर्शन या प्रसंगातून घडते.
हेही वाचा: श्री चांगदेव पासष्टी- हे संत ज्ञानेश्वर माऊली यांचे एक अद्वैतवादी ग्रंथ आहे
रामकृष्ण हरी
उत्तर द्याहटवा