नागपंचमी – आख्यायिका, परंपरा व आधुनिक दृष्टिकोन | Nag Panchami – Tradition, Story & Modern

Nag Panchami Sampurn Mahiti Marathi

नाग पंचमी सणाची संपूर्ण माहिती

नाग पंचमी: महत्व, पूजा पद्धती, व्रत कथा आणि संपूर्ण माहिती

नागपंचमी हा एक पारंपरिक सण आहे जो सापांप्रती श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी नाग किंवा सर्प देवतेची पूजा केली जाते. भारत, नेपाळ आणि इतर काही देशांमध्ये राहणारे हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीय नागपंचमी पाळतात. हा सण श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा होतो, काही राज्यांमध्ये कृष्ण पक्षातील पंचमीला देखील साजरा केला जातो.

पूजेच्या वेळी नागदेवतांची मूर्ती चांदी, लाकूड, दगड किंवा चित्राच्या रूपात साकारून त्यांना दूध अर्पण केले जाते. हे अभिषेक आणि पूजा मुख्यतः कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी केली जाते. अनेक ठिकाणी जिवंत सापांनाही दूध अर्पण करून पूजा केली जाते आणि या पूजेसाठी गारूड्याची मदत घेतली जाते.

पौराणिक कथा सांगते की भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुनेतून सुरक्षित वर येण्याचा दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता, आणि याच दिवशी नागपूजेला प्रारंभ झाल्याचे मानले जाते.

दर बारा वर्षांनी नाथ संप्रदायाचे साधू नागपंचमीच्या दिवशी गंगा आणि गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर एकत्र स्नान करतात, ही परंपरा विशेष महत्त्वाची मानली जाते.

आख्यायिकेची पार्श्वभूमी आणि धार्मिक श्रद्धा

नागपंचमीसंबंधी एक लोकश्रुती अशी सांगितली जाते की, एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळामुळे एका नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली. या घटनेमुळे नागदेवतेचा कोप झाला आणि म्हणूनच या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाहीत. फक्त शेतच नव्हे तर घरातही काही विशिष्ट कामे टाळली जातात — जसे की भाज्या चिरणे, तवा वापरणे, वस्तू खणणे किंवा कुटणे. ही प्रथा नागदेवतेचा आदर राखण्यासाठी आजही अनेक ठिकाणी पाळली जाते.

या दिवशी श्रद्धाळू नागदेवतांना दूध, लाह्या व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करतात आणि संकटांपासून रक्षण व्हावे यासाठी प्रार्थना करतात. नागपंचमीला पूजले जाणारे नाग प्रामुख्याने अनंत (शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया असे मानले जातात.

पण काही शास्त्रांमध्ये नागांची नावे थोडी वेगळी दिली गेली आहेत. भविष्योत्तर पुराणातील एका श्लोकानुसार, वासुकी, तक्षक, कालिय, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय या आठ नागांची पूजा करण्याचा निर्देश आहे:

वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥

या सर्व नावे विविध पुराणकथांमध्ये प्रसिद्ध असून नागपंचमीच्या दिवशी त्यांना स्मरण करून भक्त आपले संरक्षण मागतात.

भारतीय सांस्कृतिक परंपरेतील नागपूजेचे महत्त्व

भारतीय संस्कृतीत नागांना विशेष महत्त्व आहे आणि त्यांची पूजा अनेक रूपांतून केली जाते. फणा असलेल्या सर्पाला 'नाग' मानले जाते. त्यांच्या फण्यावर दहा या अंकासारखे चिन्ह असते, शरीराचा रंग हिरवट किंवा पिवळसर असून, तोंडात विषयुक्त दात आणि दुभंगलेली जीभ असते. या वैशिष्ट्यपूर्ण रूपामुळे प्राचीन भारतीयांनी नागाला दैवताचे स्थान दिले आणि त्याची पूजाअर्चा सुरू केली. कृषीसंस्कृतीमध्ये नागाचे महत्त्व अधिक आहे, कारण नाग व साप हे शेतीचे रक्षण करणारे आणि शेतकऱ्यांचे मित्र मानले जातात.

या सणात स्त्रियांचाही सहभाग लक्षणीय असतो. विवाहित बहिणीला भाऊ नागपंचमीच्या निमित्ताने माहेरी घेऊन येतो अशी परंपरा अनेक भागांत आजही प्रचलित आहे. पूजेच्या दिवशी स्त्रिया हाताला मेंदी लावतात आणि ही एक हौसेची परंपरा बनली आहे. पूजेनंतर स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून पारंपरिक गाणी म्हणत झोके घेतात.

पूर्वी नागपंचमी येण्यापूर्वीच महिलांनी आनंद साजरा करण्याची तयारी सुरू केली जात असे. आठ-दहा दिवस आधीपासून गल्लीतल्या सर्व स्त्रिया एकत्र येऊन फेर धरून गाणी म्हणत आणि पारंपरिक खेळ — झिम्मा, फुगडी, पिंगा, घोडा-चुईफुई — मनमुराद खेळत. खेळांदरम्यान उखाणे घेणे, गाणी म्हणणे यामुळे एक वेगळीच सांस्कृतिक रंगत अनुभवायला मिळे.

नागपंचमीच्या दिवशी महिला जमून वर्तुळाकार आकारात पारंपरिक नृत्य, खेळ आणि गाणी सादर करतात. हा सण स्त्रियांसाठी भक्ती, आनंद आणि बंधुत्व यांचा सुंदर संगम असतो.

नागपंचमीच्या पूजेची पारंपरिक रीत

नागपंचमीच्या दिवशी महिलांकडून पूजेसाठी विशेष तयारी केली जाते. घराची संपूर्ण स्वच्छता केली जाते, जमिनीला शेणाने सारवले जाते आणि अंगणात रांगोळ्या काढल्या जातात. भिंतींवर नागदेवतेची चित्रे रंगवून त्यांची श्रद्धेने पूजा केली जाते.

काही भागांत महिलांचे समूह नागाच्या वारुळाजवळ जाऊन पारंपरिक गाणी म्हणत पूजाअर्चा करतात. वारुळाला फुले वाहून, दूध व लाह्यांचा नैवेद्य अर्पण करून नागदेवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो.

भारताच्या काही भागांत या दिवशी जिवंत सापांचीही पूजा केली जाते. सापांना दूध व लाह्या अर्पण केल्या जातात. तथापि, या वस्तू माणसांच्या आवडत्या असल्या तरी सापांचे नैसर्गिक अन्न नाहीत, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

पावसाळ्याच्या काळात साप अधिक प्रमाणात जमिनीवर दिसू लागतात, म्हणूनच या ऋतूत त्यांच्या रक्षणासाठी आणि शांततेसाठी नागपंचमीची पूजा अधिक महत्त्वाची मानली जाते.

बत्तीस शिराळा – नागपंचमीची खास परंपरा आणि इतिहास

सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात वसलेले बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमीच्या पारंपरिक आणि भव्य उत्सवासाठी विशेष प्रसिद्ध आहे. पुणे–बेंगळुरू महामार्गावर कोल्हापूरकडे जाताना पेठ नाका (इस्लामपूर) येथे उजवीकडे फाटा घेऊन सुमारे वीस किलोमीटर आत हे निसर्गरम्य गाव वसलेले आहे. जवळच चांदोली अभयारण्य आणि धरण असल्याने या परिसराला एक वेगळेच नैसर्गिक महत्त्व लाभले आहे.

पूर्वी येथे नागपंचमीचा सण अत्यंत जल्लोषात साजरा केला जात असे. सणाच्या तयारीसाठी जवळपास एक महिना आधी गावातील विविध नागमंडळे जंगलात जाऊन नाग पकडायची मोहीम राबवत. हातात लांब काठी, नागासाठी मडके आणि सोबतचा चमू घेऊन ही मोहीम पार पडत असे. पकडलेले नाग सणाच्या अखेरपर्यंत काळजीपूर्वक ठेवले जात आणि त्यांची योग्य निगा राखली जाई.

उत्सवाच्या मुख्य दिवशी गावातील ग्रामदेवतेची पूजा करून अंदाजे १०० ते १२५ नागांची भव्य मिरवणूक काढली जात असे. त्यानंतर नागांचे खेळ सादर केले जात, ज्यात उंच फणा काढणारा, सर्वात लांब नाग असलेल्या मंडळांना विशेष बक्षिसे दिली जात. सणात सहभागी होण्यासाठी हजारो नागरिक गावात गर्दी करत, आणि सर्व वयोगटातील लोक निर्भयपणे गळ्यात नाग किंवा धामण घालून फोटोही काढत.

या उत्सवाची ख्याती देशाच्या सीमांपलिकडेही पोहोचली होती. एकेकाळी नागपंचमीला येथे लाखांहून अधिक लोक जमायचे. मात्र, नंतर सापांवर होणाऱ्या अन्यायामुळे आणि त्यांच्या रक्षणाच्या हेतूने निसर्गप्रेमी आणि वन्यजीव कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर २००२ साली न्यायालयाने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार साप पकडणे, त्यांचे खेळ, मिरवणुका, स्पर्धा यावर बंदी घातली.

आज बत्तीस शिराळ्यात नागपंचमी साजरी होते खरी, पण फक्त प्रतीकात्मक मिरवणुकीच्या रूपात. उत्सवाची पारंपरिक भव्यता आता स्मृतीरूपात उरली असून, वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन करत या परंपरेला आधुनिक आणि संवेदनशील दिशा दिली गेली आहे.

आधुनिक काळातील नागपंचमी व्रताचे सामाजिक भान

आधुनिक काळात नागपंचमी साजरी करताना केवळ पारंपरिक पूजाअर्चेपुरतीच मर्यादा न ठेवता, या सणामागील मूळ उद्देश आणि पर्यावरण-संवेदनशीलता यांचाही विचार केला पाहिजे. पूजेबरोबरच आजच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी संदर्भातील जाणिवा अधिक समृद्ध करण्याचा मार्ग या व्रतातून स्वीकारता येतो.

नागपंचमीच्या व्रताचा खरा अर्थ आज असा घेतला जाऊ शकतो की, आपण नागवंशीय समाजातील कोणत्या तरी व्यक्तीशी संवाद साधावा आणि त्यांच्या परंपरेची ओळख करून घ्यावी. यामुळे समाजात एक समरसतेची भावना निर्माण होते आणि सांस्कृतिक मुळे खोल जातात.

प्राचीन काळात नागांची पूजा त्यांच्या दैवी रूपासाठी केली जात होती. मात्र, काही ठिकाणी दात काढून आणि उपाशी ठेवून नागांना टोपल्यांमध्ये बंद करून त्यांचा खेळ दाखवला जात होता. अशा अमानवी प्रथा बंद होणे गरजेचे आहे आणि नागपंचमीच्या दिवशी याच्या विरोधात आवाज उठवणे हे खरे व्रत ठरू शकते.

नाग आणि साप हे केवळ भीतीदायक प्राणी नाहीत, तर पर्यावरणीय दृष्टिकोनातून फार उपयुक्त आहेत. ते उंदरांची संख्या नियंत्रित ठेवतात आणि त्यामुळे धान्याची हानी टळते. हरित क्रांतीचे स्वप्न साकार करायचे असेल तर “धामण पाळा, धान्य वाचवा” ही संकल्पना कृतीत उतरवणे महत्त्वाचे आहे.

या सणाचे सामाजिक आणि शैक्षणिक रूप अधिक प्रभावी करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये नागांच्या महत्त्वाची माहिती दिली जावी. सर्पप्रेम, पर्यावरण जागर, सर्पसंवर्धन यासंबंधी व्याख्याने, चित्रप्रदर्शने आणि चर्चासत्रे आयोजित केली जावीत.

याच काळात मैदानी खेळांचे आयोजन करून मुलांना सक्रिय ठेवणे ही देखील एक पारंपरिक परंपरा आहे. मुलांनी श्रावण महिन्यात मैदानी खेळ खेळावे, यासाठी नागपंचमीच्या निमित्ताने स्पर्धा घेतल्या जाव्यात आणि त्याचा संकल्प चातुर्मासात पूर्ण केला जावा.

शेवटी, नागपंथाचा इतिहास आणि त्यासंबंधी असलेली विविध कला, परंपरा आणि प्रतीके यांचा अभ्यास करून नागपंचमीचा सण अधिक अर्थपूर्ण आणि ज्ञानवर्धक केला जाऊ शकतो. अशा प्रकारे नागपंचमी केवळ धार्मिक पूजेपुरती मर्यादित न राहता, सामाजिक-जागृती आणि पर्यावरण रक्षणाची चळवळ बनू शकते.

भारतभरातील नागपंचमीच्या साजरीकरणातील विविधता

प्राचीन काळात फक्त भारतातच नव्हे, तर इतर देशांमध्येही नागपूजेला व नागाशी निगडित प्रतीकांना महत्त्व होते. ग्रीक आणि रोमन संस्कृतींमध्ये नागनृत्याची परंपरा होती, ज्याला सर्जनशीलतेशी जोडलेले मानले जाई. नाग आणि पृथ्वी यांच्यातील पवित्र संबंध या संस्कृतींनी मान्य केला होता, आणि यामुळेच नाग हे fertility (उत्पादकता) व जीवनशक्तीचे प्रतीक मानले जात होते.

नवनागस्तोत्र या प्राचीन स्तोत्रात नव नागांची नावे दिली आहेत. या स्तोत्राचे रोज पठण केल्यास विषाचा कोणताही धोका राहत नाही, तसेच सर्वत्र यश प्राप्त होते, असा विश्वास आहे:

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।
शङ्खपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा॥
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्।
सायङ्काले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः।
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्॥
लोकगीतांमधून नागपंचमीच्या सणाचे भावनिक आणि सांस्कृतिक रंग अधिक गडदपणे उमटतात. या गीतांमध्ये नागाला “भाऊराया” या रूपात संबोधले जाते. त्याला दूध, लाह्या, पेढा, गूळ, कढी यांचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्याच्याकडून रक्षणाची याचना केली जाते.

लोकगीतातील काही ओळी:

नागपंचमीच्या दिवशी मी गं नेसले हिरवी साडी,
नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी...

या गीतांमध्ये स्त्रिया नागदेवताच्या पूजेसाठी आनंदाने वारुळाजवळ जमतात. “चल गं सये वारुळाला...” अशा ओळींमधून स्त्रियांच्या सामूहिक पूजेचे दृश्य उभे राहते.

सणाच्या आणखी एका भावनिक पैलूत, बहिणीला माहेरी नेण्यासाठी तिचा भाऊ येतो आणि सासरची परवानगी मिळावी म्हणून ती लोकगीतांमधून सासू, सासरे, नवरा, दीर-नणंद यांच्याकडे विनंती करताना दिसते:

पंचमीच्या सणाला, बंधू आल्यात नियाला।
बंधू आल्यात नियाला, रजा द्या मला जायला।
सासू म्हणते, मला काय विचारतीस? विचार तुझ्या सासऱ्याला...

या प्रकारच्या लोकगीतांतून नागपंचमी हा सण केवळ पूजाअर्चेपुरता न राहता, तो घरगुती नातेसंबंध, स्त्रीचं भावविश्व, आणि सामूहिक सांस्कृतिक भावना यांचा सुंदर मिलाफ बनतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने