श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवनचरित्र — भाग ८

Shri Samarth Dhondu Tatya Maharaj

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवन चरित्र भाग ८

।। श्री गणेशाय नमः ।।

४३. नवचैतन्य अवतरले

इकडे पंगती बसण्याच्या अगोदरच महादेवाच्या देवळामध्ये पांडव प्रताप ग्रंथाचा कळसाध्याय वाचून घेऊन, सोवळ्यातील नैवेद्य दाखवून आरती करुन घेतली होती. तसेच श्री तात्यांच्यासाठी त्यांच्या शिष्याने सोवळ्यामध्ये स्वयंपाक केलेला होता. त्यांचेही भोजन झाले.

थोड्याच वेळात दिवे लावण्याची वेळ झाली. सर्व भजनी मंडळीनी श्री तात्यांच्या समोर भजन करावयाचे म्हणून टाळ मृदंगासह येऊन त्यांच्या समोर मधुर सुस्वरामध्ये प्रेमाने भजन म्हणू लागले. भजनी मंडळीचे भजन ऐकून तात्या प्रसन्न झाले व भजनी मंडळीबरोबर प्रेमाने संवाद करु लागले. श्री तात्यांची प्रसन्नता पाहून भजनी मंडळींनी विनंती केली की, उद्या दसऱ्याचा सण आहे. म्हणून आम्ही आपली मिरवणूक काढणार आहोत. त्या निमित्ताने डोंगरशेळकीच्या सर्व परिसरास आपले पाय लागावेत, अशी आमची अपेक्षा आहे. तेंव्हा आपण आमची एवढी विनंती मान्य करावी, अशी भजनी मंडळीची विनंती ऐकून श्री तात्यांनी होकार दिले.

आज दसऱ्याचा सण म्हणून प्रत्येकांनी आपापल्या घरासमोर रांगोळी काढली लहान थोरांनी नवे वस्त्र परिधान केले. प्रत्येकाच्या घरात सणानिमित्त पक्वान्न शिजू लागले. तसेच आज दसऱ्याच्या दिवशी आपल्याला श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे दर्शन लाभणार म्हणून सर्वाच्या हृदयात आनंद नांदू लागला. अशा आनंदमय वातावरणामुळे डोंगरशेळकी गावामध्ये नवचैतन्य अवतरले.

४४. तात्यांची मिरवणूक

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची भव्य मिरवणूक निघणार आहे, असे डोंगर शेळकी गावामध्ये सर्वाना समजले. म्हणून सर्व लहानथोर तयारीत राहिले. दुपारी बारा वाजताच्या सुमारास गावकरी मंडळींनी वाजंत्री बोलावून घेतले. सर्व भजनी समुदाय टाळमृदंगासह आले. तेव्हा वाजंत्री वाद्य वाजवू लागले. तसेच सर्व भजनी मंडळी तालास्वरात अभंग गाऊ लागले.मिरवणुकीसाठी सर्व समाज बहुसंख्येने एकत्रित आला.इकडे काही मंडळीनी फुलांच्या माळा श्री तात्यांच्या गळ्यांमध्ये घालून त्यांना मेण्यामध्ये बसविले आणि मेणा उचलतेवेळी

पुंडलिका वरदा हरि विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाराम ।।

असा गजर करुन मेणा उचलून चालू लागले. ही मिरवणूक महादेवाच्या देवळापासून निघाली.

१) सर्वाच्या पुढे वाजंत्री वाद्य वाजवू लागले.

२)भजनी मंडळी अभंग गाऊ लागले.

३) मध्यभागी श्री समर्थ धोंडूतात्यांचा मेणा

४) कुमारिका पंचारती घेऊन चालू लागल्या.

५) सुवासिनी स्त्रिया भरलेले कुंभ माथ्यावर घेवून चालू लागल्या

व त्यामागे इतर सर्व स्त्री पुरुषांचा समाज येऊ लागला, अशा क्रमपध्दतीने श्री तात्यांची मिरवणूक निघाली.

काही मंडळी मेण्याच्या बाजूने चालत गावस्थानाची माहिती तात्यांना सांगू लागले. ही मिरवणूक मारुतीला उजवे घेऊन नगर प्रदक्षिणा करून काही वेळाने परत महादेव मंदिरासमीप आली. तेथे आरती करुन महादेवाच्या ओट्यावर मेणा ठेवला. दर्शन घेऊन सर्व लोक घरी गेले व काही मंडळी श्री समर्थ तात्यांच्या सान्निध्यात बसून सर्व माहिती सांगू लागले.

४५. अशी आहे डोंगरशेळकी

डोंगरशेळकी गावच्या दक्षिण दिशेला काही अंतरावर अग्नेय व नैऋत्य टोक धरुन उंच उंच टेकड्या, माळरान व डोंगर असल्या कारणाने या गावास 'डोंगरशेळकी' हे नाव पडले आहे.गावाच्या दक्षिणेकडील उंच टेकड्यामधून डोंगरामधूनच एका लहानशा नदीचा उगम होऊन ती नदी उत्तरेकडे वाहात वळणे घेत डोंगर शेळकी गावच्या अगदी समीप येऊन पूर्वेकडे वळण घेत पुढे उत्तरेकडे वाहात गेलेली आहे. ज्याप्रमाणे चंद्रभागा चंद्राच्या कोरीप्रमाणे वळण घेऊन पंढरपूर क्षेत्राच्याबाजूने वाहत आहे; त्याप्रमाणेच ही छोटी नदी डोंगर शेळकीच्या बाजूने चंद्राच्या कोरेप्रमाणे गावच्या पूर्वेकडून वाहात पुढे गेली आहे.तसेच गावची रचना फारच मनोरम आहे. गावच्या मध्यभागी पाटील लोकांचा उंच गढीचा वाडा असून पांढऱ्या मातीचे बुरुज आहेत आणि सभोवती ग्रामवासियांची घरे आहेत. तसेच गावाला वेस अर्थात महाद्वार आहे.गावच्या उत्तरेकडील बाजूला दास्यत्व भक्तीचे पुरस्कर्ते व भक्तीच्या वाटा दाखविणारे रामभक्त मारुतीचे, दक्षिणेकडे द्वार असलेले देऊळ आहे, मंदिराचे व पाराचे बांधकाम दगडी चौकोनी चिऱ्यांचे आहे.

४६. शिवालय

येथे एक शिवालय आहे. मंदिर लहानच आहे पण त्याची बांधणूक मात्र हेमाडपंथी आहे. बाहेरुन मंदिराकडे पाहिले तर कसे तरी ओबड धोबड व विद्रूप आकाराचे मोठमोठे दगड एकावर एक ठेवल्यासारखे दिसतात. पण जवळ जाऊन आंत पाहिले तर आंतल्या बाजू आर.सी.सी. च्या भिंतीसारखे साफ व एकारेषेमध्ये अगदी सुंदर घोळलेल्या दगडांच्या दिसतील. शिवालयाचे द्वार पुर्वेकडे आहे आणि दक्षिणेकडील भींतीला एक चौकोनी आकाराची खिडकी आहे. पश्चिमेकडील भिंतीला अगदी लहान त्रिकोणी आकाराची दिवलाणे ठेवता येईल अशी दिवळी आहे व उत्तरेकडील भिंतीला दगडाचीच भिंतीमध्ये रोवून, तशी त्या दगडाची जोड सांधून तयार केलेली आडवी दगडी फळी आहे. त्यावर पूर्वी पूर्वजांनी काही देवतांची प्रतिष्ठापना केलेली आहे. मंदिरात मध्यभागी कैलासपती भगवान शंकराचे विराजमान उत्तराभिमुख शिवलिंग आहे. वरची बाजू पतराने आच्छादन केलेली आहे व बाहेरुन चोहोबाजूंनी उंचवटा घातलेला आहे. (पूर्वीचे रहणजे इ.स.१९२० च्या दरम्यानचे पूर्वज श्रावण मासातील पोथी, नेहमीचे भजन व कीर्तन येथे करीत असत.) असे हे शिवालय छोटेच आहे पण त्यात असे विशेष आहे की, या देवळाच्या बांधकामामध्ये चिखल, माती, चिपा, अर्थात लहान दगड काहीही नाही. फक्त मोठ्या दगडाचे बांधलेलेशिवालय लहानच आहे पण त्याचे आश्चर्य करावे, अशी त्याची जडण घडण आहे.

४७. श्री तात्यांच्या सान्निध्यात दसरा

इकडे चार वाजताच्या सुमारास सर्व गावकरी एकत्र जमा होवून सीमोल्लंघन करुन आपट्याची पानं व नवरात्रीतील घटस्थापनेतील उगवलेले धान्याचे अंकुर हा दसऱ्याचा तुरा घेऊन सोने म्हणून श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांना देवून प्रत्येकाने त्यांचे दर्शन घेतले. खरोखर डोंगर शेळकी निवासियांच्या भाग्याचाच तो दिवस ! कारण प्रतिवर्षाचा मंगलदायक दसरा सण व त्याच दिवशी समर्थ तात्यांचे दर्शन घडले. श्री तुकाराम महाराज म्हणतात.

दसरा दिवाळी तोचि आम्हा सण । सखे संतजन भेटतील ।।१।।

अमुप जोडिल्या सुखाचिया राशी । पार त्या भाग्याशी नाही आता ।।२।।

धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामे ।।३।।

तुका म्हणे काय होऊ उत्तरायी । जीव ठेवू पायी संताचिये ।।४।।

कोणत्याही काळात संतांची भेट झाल्यास त्या दिवशी दसरा व दिवाळी हे सण एक समयावच्छेदेकरुन आलेला आनंद मिळतो आणि आज तर कालौघातील प्रतिवर्षाचा दसरा सण व त्यामध्ये श्री समर्थ तात्यांच्या सारख्या संतांचे दर्शन मिळाले, ही किती भाग्याची गोष्ट !म्हणूनसर्व जण तात्यांचे आदर भावनेने दर्शन घेऊ लागले. काही सुवासिनी स्त्रियांनी तर ताटामध्ये पंचारती व गळ्यातील सुवर्णाचे अलंकार ठेवून तात्यांना सोन्यारुप्याने ओवाळून त्यांचा शुभाशिर्वाद घेतला, तसेच सर्व लहान थोरांनी -

संवदड आपटा रान चारा ।

हा तो दसऱ्याचा तुरा ।। तु.म.

एकमेकास सोने म्हणून देऊन व घेऊन आनंदाने श्री तात्यांच्या सान्निध्यात दसरा सण साजरा केला.

४८. परत भेट देईन

दुसरे दिवशी एकादशीचा दिवस उजाडला. श्री तात्यांनी विराळला जावयाचे आहे असे सांगितल्याबरोबर त्यांना सन्मानपूर्वक, पाठविण्यासाठी सर्व समुदाय गोळा झाला. भजनी मंडळी भजन करत विराळपर्यंत जाण्याचे ठरवून टाळमृदंगासह आले. सर्वांच्या गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळाला गोपी चंदनाचा गंध असल्या कारणाने सर्व भजनी शोभून दिसू लागले. सर्वांनी तात्यांचे दर्शन घेतले. आरती करुन जयघोषात तात्यांना मेण्यामध्ये बसविले व मेणा घेवून चालू लागले. श्री तात्यांना पाठविण्यासाठी गांवच्या बाहेर सर्व लहान थोर आले.

त्यावेळी सर्वांच्या नेत्रामध्ये अश्रू आले. अशी सर्व गांवकऱ्यांची प्रेमपूर्वक आस्था पाहून श्री समर्थ तात्या प्रत्सन्न झाले. काही जण तात्यांना म्हणाले, महाराज आपण आमच्या गांवातच राहावे, असे आम्हाला वाटत आहे, असे डोंगर शेळकीच्या लहान थोरांचे शब्द ऐकून तात्यांचे चित्त वेधले गेले व लहान थोरावर त्यांचे प्रेम बसले. तेंव्हा तात्या म्हणाले, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा परत भेट देईन, असे बोलून हाताने इशारा केल्यानंतर मेणा चालवू लागले.

सर्व गांवकरी समुदाय परत फिरला व भजनी मंडळीसह समर्थ धोंडूतात्या महाराज विराळगांवी स्वस्थानी पोहोचले.

हे चरित्र आपल्याला शिकवते की संतांचे आशीर्वाद, भक्तिभाव आणि गुरुकृपा यामुळे जीवन परिपूर्ण होते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने