
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवन चरित्र भाग ७
।। श्री गणेशाय नमः ।।
३७. रात्रीच्या समयास आगमन
श्री समर्थ तात्यांना मेण्यामध्ये बसवून मार्गक्रमणा करीत असता वाटेने मेण्याची मंडळी आलटून-पालटून, बदलून, पाळीवाळीने मेणा वाहू लागली व संताचे अभंग म्हणत डोंगर शेळकीकडे येऊ लागली. आश्विन महिन्यातील शुध्द अष्टमीचा तो दिवस होता. अर्ध्या वाटेत संध्याकाळी दिवे लावण्याची वेळ झाली. आकाशातील माथ्या वरच्या अर्ध्या चंद्राच्या कोरेने झावळ झावळ प्रकाश दिसत होता. त्याच प्रकाशात ही मंडळी चालत असता थोड्याच वेळात ढगाळ वातावरण पसरले व झावळ झावळ प्रकाश देणारी ती चंद्राची अर्धकोर ढगाआड गेली. त्यामुळे अंधार पसरला. असे जरी झाले तरी या मंडळींना श्री तात्यांच्या सहवासात चालत असता अंधाराची जाणीव झाली नाही. कोणाला थकवा, शीण आला नाही. तसेच कोणाला काटासुध्दा रुतला नाही. अशा आनंदगजरामध्ये गावच्या निकट येताच सर्व ग्रामस्थांना समजले की श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांना घेऊन आपली सर्व माणसे जयजयकार करीत येत आहेत. इकडे महादेवाच्या देवळामध्ये पोथीचा अध्याय संपून आरती चालू होती. सर्वांनी आरती व प्रसाद घेऊन ती श्रवणाला आलेली मंडळी व गावातील समाज तसेच भजनी मंडळ या सर्वानी श्री तात्यांना आणण्यासाठी सामोरे जाऊन वाजत गाजत व जयघोष करत त्यांना गावामध्ये घेऊन आले आणि मेणा पहिल्याने मारुतीच्या देवळापुढे उतरवून श्री धोंडूतात्या महाराजांच्या चरणाचे सर्वांचे समाधानपूर्वक दर्शन झाले. रात्री अकरा ते बारा वाजताचा तो समय होता.
३८. धन्य दिवस व धन्य काळ
श्री समर्थ धोंडूतात्या गांवी आले. खरोखर डोंगरशेळकी निवासियांच्या परम भाग्याचाच तो दिवस व धन्य तो काळ ! कारण श्री तुकाराम महाराज म्हणतात.
धन्य आजी दिन । झाले संतांचे दर्शन ।। तु.म.
ज्या काळी संतांची भेट झाली व आपली त्यांच्या चरणी मिठी पडली म्हणजे आपण त्यांचे अनन्य दास झालो तर तो काळ, तो क्षण परम भाग्याचा असतो. कारण ज्यांच्या चरणी मिठी पडली असता संदेहाची गांठ सुटली जाते. जीव संसार सिंधूतून तरुन जातो व पोटी शितलता प्राप्त होते. अर्थात् सकल दुःखाची निवृती व परमानंदाची प्राप्ती होते. म्हणून संत भेटीचा काळ शुभ आहे, मंगळ आहे, धन्य आहे. अशा संतांची भेट होणे फार अवघड आहे.
बहु अवघड आहे संत भेटी । तु.म.
सहजासहजी संतांची भेट होत नाही. असाध्य गोष्टी सर्व साध्य होतील. परंतु संतांची भेट फारच दुर्लभ आहे. मग अशा संतांची भेट कशाने होते ? तर -
पूर्व पुण्य असता गांठी । संत भेटी तया होय ।। तु.म.
थोर पुण्याईचा सांठा असावा लागतो. तेंव्हा संतांची भेट होत असते. या संतवचनावरुन असे म्हणण्यास हरकत नाही की डोंगरशेळकी ग्रामवासियांचे पूर्वपुण्य फळाला आले. तसेच त्यांचे भाग्यही उजळले. म्हणूनच श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची भेट झाली व पुढे चालून भविष्यात सर्व आबाल वृध्दांना त्यांचा दीर्घ सहवासही लाभला.
३९. भेटीचा प्रथम दिवस
एक महत्त्वाची गोष्ट प्रतिपादन करावी वाटते, ती म्हणजे श्री समर्थ तात्यांनी डोंगरशेळकी ग्रामांमध्ये प्रथम पदार्पण केलेला दिवस आश्विन शुध्द आष्टमी शके १८४८ व वेळ रात्री अकरा ते बाराचा समय होता. म्हणजे रात्रीचा द्वितीय प्रहर संपत आलेला होता. तसेच मध्ये एक दिवस जाऊन म्हणजे चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर दुसरे दिवशीच दसऱ्याचा पवित्र व मंगलदायक सण होता. या शुभ मुहुर्तावर तात्यांनी शेळकी ग्रामाची सीमा उल्लंघन केलेली आहे.
यावरुन असे म्हणण्यास हरकत नाही की ज्या प्रमाणे भगवान श्रीकृष्ण गोकुळांमध्ये आष्टमी तिथीस व रात्री बारा वाजता अवतरले. त्याप्रमाणेच श्री तात्या पण डोंगरशेळकीला अष्टमी तिथीस व रात्री बाराच्या सुमारास आले. फरक एवढा की कृष्णजन्माची श्रावणवद्य अष्टमी आहे व तात्या शेळकी गावी आलेली तिथी अश्विन शुध्द अष्टमी आहे. तसेच श्री ज्ञानेश्वर महाराजांची जन्मतिथीही श्रावण वद्य अष्टमीच आहे, असे या अष्टमी तिथीचे महत्त्व आहे.
म्हणूनच तुलना करण्यास काही हरकत नाही की ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आल्याबरोबर गोकुळीच्या सर्व लोकांना सुख झाले. श्री तुकाराम महाराज म्हणतात गोकुळीच्या सुख्खा । अंतपार नाही लेखा ।। तु.म. त्या प्रमाणेच श्री तात्यांनी त्याच्या आगमनाने डोंगर शेळकी निवासीयांना सुखाची मेजवानी दिली. सर्व लोक सुखाच्या सागरात मनसोक्त विहार करु लागले. अर्थात् सर्व ग्रामस्थांना अत्यानंद झाला. प्रत्येकाच्या अंतःकरणात एक वेगळाच सात्विक भाव प्रगट झाला. श्री तात्या डोंगर शेळकी गांवी आलेला हा प्रथमच दिवस होता.
४०. स्नानसंध्या व पूजाविधी
दुसरे दिवशी सकाळी कांही भाविक मंडळी शुचिर्भूत होऊन श्री तात्यांना स्नान घालू लागले. सर्वाचा भाव पाहून तात्यांनी अंगावर पाणी ओतू दिले. पाणी ओतत असताना देवाच्या नामाचा जयजयकार पुंडलिक वरदा हरि विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाराम ।। अशी गर्जना व मुखाने संतांचे अभंग म्हणत स्नान घालू लागले. त्या वेळी पाहण्यासाठी लहान थोरांची बरीच गर्दी झाली. सर्वांनी स्नान घालून झाल्यानंतर तात्यांनी सर्वांना बाजूला थोडे दूर जाण्यास सांगितले. त्यावेळी तात्यांच्या सोबत आलेल्या शिष्याने सोवळ्यामध्ये होऊन तात्यांना नंतर स्नान घातले व त्यांना सोवळे नेसवले आणि एका पाटावर बसवून एकट्यानेच त्या पाटासह उचलून पूजेच्या विधीसाठी म्हणून गायीच्या शेणाने सारवलेल्या पवित्र जाग्यावर व्यवस्थित नेऊन ठेवले. त्या मुलाची शक्ती पाहून सर्व जण नवल करु लागले. त्या मुलाने तात्यांना पूजेसाठी सोवळ्यात पाणी आणून दिले तसेच दुर्वा, फुले व तुळशीच्या मंजुळा, संधेची पळी व पात्र समोर ठेवून नमस्कार करुन तो बाजूला बसला.
श्री तात्यांनी पूजा करण्यास प्रारंभ केला. संध्या करुन गायत्री मंत्राचा जप केले व सूर्य ध्यानमंत्र म्हणून सूर्याची मुख्य बारा नावे घेवून सूर्य नमस्कार घालू लागले. (हे सर्व मंत्र ग्रंथ विस्तार भयास्तव येथे लिहिलेले नाही) पूजेमध्ये बराच वेळ गेला नंतर त्या मुलाने चंदनाचा गंध उगाळून दिल्यानंतर तात्यांनी आपल्या भाळी लाऊन घेतले आणि संध्येच्या पात्रामध्ये दोन तुळशीचे पाने व मंजुळा टाकून ते तीर्थ सर्वांना देण्यास सांगितले. तेव्हा मुलाने ते तीर्थ जमलेल्या सर्व लोकांना दिले.
इकडे सर्व लोक श्री तात्यांच्या दर्शनाची सारखी वाट पाहात होते. इतक्यात तात्यांनी सर्वांना आपल्याकडे येण्यास सांगितले. आज्ञा मिळताच सर्व लहान थोरांनी व्यवस्थितपणे श्रध्दापूर्वक विनयशील होऊन दर्शन घेतले. झटते झोंबते गावचे कार्यकर्ते, वडील- वडील माणसे आणि भजनी मंडळ सतत तात्यांच्या जवळ तिष्ठत राहून समयोचित भाषणाने, मधुर शब्दाने त्यांच्या मनाला आनंद देऊ लागले.
४१. एवढाच स्वयंपाक भरपूर !
पोथीची समाप्ती असल्या कारणाने गावजेवणाची सर्व तयारी सुरु झाली. लहान थोर सर्व श्रध्दायुक्त अंतःकरणाने - कार्यामध्ये सहभागी होऊन सर्व कामे भराभर करु लागले. कोणाला आळस म्हणून नाही. सर्वांच्या अंतःकरणात प्रस्फुरण निर्माण झाले होते. त्यामुळे लवकरच गावजेवणाचा संपूर्ण स्वयंपाक तयार झाला.
पोथीची समाप्ती व श्री तात्यांच्या आगमनाची शुभवार्ता सर्व शिवभाऊच्या लोकांना समजली. त्यामुळे समाज खूपच जमा झाला. त्या वेळी कार्यकर्त्या गावकरी मंडळीमध्ये 'अन्न कमी पडेल' म्हणून चलबिचल होऊ लागली. तेंव्हा काही जण म्हणाले, "समाज खूपच जमा झालेला आहे. तेव्हा आणखी एखादे पोते तांदूळ शिजवूनच मग पंगती बसवावे," अशी कार्यकर्त्याची धावपळ पाहून श्री तात्या म्हणाले, "दुसरे तांदुळ शिजवू नका. एवढाच स्वयंपाक भरपूर होईल ?" असे बोलून मुठभर तांदूळ आपल्या हातामध्ये घेऊन ते तांदुळ स्वयंपाकावर शिंपडायला सांगितले.
तेंव्हा त्या मंडळींनी ते तांदुळ स्वयंपाकावर शिंपडले व सर्वांना पंगत धरुन भोजनास बसण्याचा पुकार करुन वाढ करण्यास सुरुवात केली. सर्व पाहातच होते; कितीही समाज जेवला तरी स्वयंपाक काही कमी होत नव्हता. कारण तात्यांच्या हस्तस्पर्शाचे मुठभर तांदुळ स्वयंपाकावर शिंपडल्याचा परिणाम त्या अन्नामध्ये बरकतता आली. गुप्तरुपाने सिध्दी अन्न पुखू लागली, असे म्हणण्यास काही हरकत नाही.
त्यावेळी शिवभाऊचे सर्व लोक, डोंगर शेळकीचे संपूर्ण गावकरी लहान थोर आणि वाढेकरी सर्व जेऊनही काही स्वयंपाक मागे शिल्लकच होता तो स्वयंपाक 'श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचा प्रसाद' म्हणून पुन्हा कांही लोकांना वाटण्यात आला. सर्व लोक नवल करु लागले. प्रत्येकाच्या ध्यांनात आणि मनांत श्री तात्या बसले.
४२. चमत्काराचे प्रयोजन
चमत्कार करणे हा संतांचा स्थायी भाव नाही. परंतु समाजामध्ये काही नास्तिक लोक असतात. त्या नास्तिक लोकांचा नास्तिकपणा घालविण्यासाठी संत हे वेळप्रसंगी आपल्या दिव्य शक्तिचा वापर करतात. तेव्हा सहजतेने त्यांच्याकडून चमत्कार घडतात.असे चमत्कार पाहून हे नास्तिक ईश्वर सत्तावाद मान्य करुन आस्तिक होतात. तसेच काही बर्हिमुख असतात. त्या बहिर्मुख लोकांना अंतर्मुख करण्यासाठी आणि काही गर्विष्ठ लोकांचा गर्व हरण करण्यासाठी महात्म्यांच्या हातून सहजतेने चमत्कार घडतात.त्यामुळे समाज त्यांच्या आज्ञेत वागून आपल्या जीवनाची वाटचाल योग्य व मर्यादेने करतो. अर्थात् येणकेण प्रकारे समाजाला अपप्रवृत्तीपासून परावृत्त करुन त्यांना सन्मार्गाला लावण्याचा हेतु संतांचा आहे. श्री समर्थ तात्यांच्या अशा एकानेक चमत्काराचे वर्णन सर्व लोक करु लागले.
हे चरित्र आपल्याला शिकवते की संतांचे आशीर्वाद, भक्तिभाव आणि गुरुकृपा यामुळे जीवन परिपूर्ण होते.