
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवन चरित्र भाग ९
।। श्री गणेशाय नमः ।।
४९. श्री तात्यांचे सत्कर्म
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अनेक सत्कर्म केले. मंदिरे बांधले, मूर्तीस्थापना केली. समाजाला सन्मार्गाचे धडे शिकवले, काही लोकांना वाईट व्यसनापासून परावृत्त केले, अनेक ठिकाणी सप्ताह केले, जेथे भजन कीर्तन होत असेल तेथे आवडीने जावून श्रवण करीत होते. तसेच भागवत, रामायण, महाभारत व अनेक धर्मग्रंथाचे वाचन, श्रवण व मनन आपल्या मठामध्ये विधियुक्त करीत असत. ठिकठिकाणी भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करुन बहुसंख्य लोकांना भगवद् भक्तीला लावले. परमार्थास लावले.
असे अनेक सत्कर्म श्री तात्यांच्या हातून घडले. तसेच त्यांनी आपल्या जीवनामध्ये गर्व, अहंकार, दुष्टता आणि कौटिल्थ याचा परित्याग करून, कोणाचाही दोष न पाहता आपले मन, वाणी आणि शरीर यांच्यावर नियंत्रण ठेवून शुचिर्भूत तनमनाने आणि भक्ती भावाने गायत्री मंत्राचा बाराशे जप, सूर्यनमस्कार व श्री दत्तात्रयाची विधियुक्त पूजा-अर्चा करीत आपली दृढ उपासना चालवू लागले. आणि इंद्रियोपभोगाच्या विचाराचा अवरोधकरुन नित्य प्रसन्न राहून नेहमी सत्कर्म करीत राहीले.
कारण समयानुरुप सत्कर्मे करीत राहणे आणि सनातन अशा धर्म नियमांचे पालन करणे या गोष्टी मोक्षप्राप्तीसाठी अत्यावश्यक आहेत. ह्या सर्व गोष्टी श्री तात्यांनी आपल्या जीवनामध्ये आचरणात आणून दाखविल्या. अर्थात शुध्द आचरणामध्ये आपल्या जीवनाची कालक्रमणा करत कोणत्याही गावाची भक्तमंडळी बोलावयास आले म्हणजे त्यांच्या गांवी जावून प्रत्येकाला दर्शन देऊ लागले.
५०. योग आला पण क्षेम झाला नाही !
श्री समर्थ तात्या आपल्या शिष्याला (दत्तक घेतलेल्या मुलाला) पुत्रवत् मानून आवडीने सर्व पैसा त्यांच्या स्वाधीन करु लागले. परंतू त्या पैशाचा योग्य फायदा न घेता त्याचा गैरवापर तो करू लागला आणि आसुरी स्वभावाप्रमाणे वागू लागला. मनुष्याच्या जीवनामध्ये संतसंगती मिळणे फारच दुर्लभआहे. आणि मिळाली तरी ती दीर्घकालापर्यंत टिकणे, लाभणे तर अतिशय दुर्लभ आहे.
त्याप्रमाणे त्या शिष्याच्या जीवनामध्ये त्याची काही तरी पुण्याई म्हणून त्याला श्री तात्यांची भेट होऊन त्यांचा सहवास लाभला. पण तो योग्य रितीने दीर्घकाळ टिकविता आला नाही. यालाच "योग आला पण क्षेम झाला नाही" असे म्हणतात.
या शिष्याला श्री तात्यांच्या संगतीचा योग आला पण शेवटपर्यंत त्यांचे मन सांभाळून, मर्जी संपादन करून वागता आले नाही. अर्थात् क्षेम झाला नाही. कारण हा पैसा, ही संपत्ती अशी विचित्र आहे की, जलप्रवाह ज्याप्रमाणे लाटांना जन्म देतो त्याप्रमाणे ही संपत्ती असंख्य अनर्थ निर्माण करते. किंवा विषारी वेल ज्याप्रमाणे मृत्यूला कारणीभूत होते. त्याप्रमाणे ऐहिक संपत्ती, सुखाऐवजी केवळ दुःखच पदरात बांधते.
त्याचप्रमाणे त्या शिष्यास संपत्तीमुळे अर्थात् संपत्तीचा गैर वापर केल्यामुळे व अनेक वाईट व्यसनी मुलांची संगती केल्यामुळे त्याची पुण्याई संपली आणि त्याच्या हातून समाजनीतीच्या, धर्मशास्त्राच्या आणि संतवचनाच्या विरुध्द अनेक अनैतिक दुष्कर्मे घडून त्याची चुकीची वर्तणूक सर्व लोकांना उघड उघड दिसून येऊ लागली.
५१. विरोध वाढला
समाजनीतीच्या विरुध्द अनेक दुष्कर्म या शिष्याकडून होऊ लागले. त्यामुळे विराळचे सर्व लोक त्याच्या विरोधाने वागू लागले. चार माणसे या बाजूने व दहा माणसे त्याबाजूने बोलून जास्तच विरोध वाढला. परंतू गावच्या पुढे हा एकटा काय करणार ? तारुण्यातील इंद्रियांना बळी पडून जीवनामध्ये अपकीर्तीचा डाग लागला.म्हणून अद्भूत प्रसंगानी परिपूर्ण असलेले तारुण्याचे वन सुरक्षितपणे ओलांडणे फारच अवघड आहे. एखादी महापूर आलेली नदी ओलांडणे, किंवा मगरीनी भरलेला एखादा महासागर ओलांडणेही सोपे आहे. पण तारुण्यातील विषय वासनांचा परित्याग करणे महाकठीण कर्म आहे. कारण ज्या तरुणाचा आत्मसंयम सुटतो; त्याला हृदयरुपी विवरामध्ये राहणारा वासनारूपी राक्षस आपल्या तालावर नाचायला लावतो, ज्याच्या जवळ सद्सद्विवेक बुध्दी नाही, त्याला हे तारुण्य अधःपतनाचे कारणच ठरते. कारण अज्ञानी तारुण्य चंचल मनाच्या विविध प्रकारच्या खेळांना बळी पडते. त्यामुळे नानाप्रकारची दुःखे भोगावी लागतात.सर्व लोक या शिष्याच्या विरोधात पडले. शेवटी सर्वांनी मिळून याच्यावर कोर्टामध्ये कारवाई केली आणि अनेक प्रकारचे आरोप त्याच्यावर लादण्यात आले. त्यावेळी नाइलाजास्तव भीतीने तो शिष्य कोणीकडे पळून गेला आणि लपून कोठे राहिला ? त्याचा पत्ता आणखीही लागलेला नाही. तो शिष्य पळून गेला पण विराळचे लोक श्री तात्यांना अपशब्द बोलू लागले आणि हा यांचाच शिष्य, यांचाच दत्तक पुत्र असे म्हणून द्वेषमत्सराने श्री तात्यांच्या बरोबर सर्व विराळवासी विरोध वाढवू लागले.
५२. श्री तात्यांची उदासीनता
श्री तात्यांनी आपल्या शिष्याला चांगले वागण्याविषयी खूप समजावून सांगितले होते. परंतु त्यांच्या मनात अज्ञानरुपी अंधःकार कोंदलेला असल्या कारणाने सद्गुणाऐवजी दुराचाराचे पीक मात्र त्यांच्या जीवनात फोफावले व शेवटी त्याचे फळ त्याला मिळाले परंतु ज्याप्रमाणे अवगुणी मुलगा निघाल्यास त्याच्या पित्यास दुःख होते. त्याप्रमाणे दुराचारी शिष्य झाल्यास त्याचे दुःख श्रीगुरुला होते म्हणून श्री तात्या उदासीन झाले व त्यांना श्री तुकाराम महाराजांच्या एका अभंगाची आठवण वेळोवेळी होऊ लागली. तो अभंग असा -
मेघवृष्टीने करावा उपदेश । परी गुरुने न करावा शिष्य । वाटा लाभे त्यास । केल्या अर्ध कर्माचा ॥१॥
द्रव्य वेचावे अन्न छत्री । भूती द्यावे सर्वत्र । न घ्यावा हा पुत्र । उत्तम याती पोसणा ।।२।।
बीज न पेरावे खडकी । ओल नाही ज्याचे बुडखी । थिता ठके शेखी । पाठी लागे दिवाण ॥३॥
गुज बोलावे संतासी । पत्नी राखावी जैसी दासी । लाड देता तियेसी । वाटा पावे कर्माचा ।।४।।
शुध्द कसूनि पाहावे । वरिल्या रंगा न भुलावे । तुका म्हणे घ्यावे । ज्या नये तुटी ते ।।५।। तु.म.
अर्थ - अधिकारी गुरुने मेघवृष्टीप्रमाणे उघड उपदेश करावा पण एकांतात मंत्र सांगून कोणाला शिष्य करु नये. कारण शिष्याने केलेल्या पापकर्माचा अर्धा वाटा गुरुला प्राप्त होत असतो. ।।१।। धनिक मनुष्य निपुत्रीक असेल तर त्याने आपल्या धनाचा विनियोग अन्नछत्रासारख्या पवित्र कार्याकडे करावा आणि सर्व भूतमात्रांना अन्न द्यावे पण धनाला वारस नाही म्हणून उत्तम जातीच्या मुलाला देखील दत्तक घेऊ नये ।।२।। खडकावर बी पेरु नये. तसे जिच्या तळाशी ओल नाही अशा भूमितही पेरु नये. कारण अशी पेरणी करणारा शेवटी व्यर्थफसतो. सारा वसूल करण्याकरीता तलाठी पाठीशी लागतो. तेंव्हा त्याला दुःख होते. ।।३।। संताजवळ गुह्य सांगावे, जशी दासी तसी बायको आज्ञेत ठेवावी. तिचा फाजील लाड केला तर तिने केलेल्या पापकर्माचा अर्धा वाटा नवऱ्याला प्राप्त होतो. ।।४।। तु.म. म्हणतात कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू आपल्याला हवीशी वाटल्यास प्रथम ती शुध्द आहे किंवा नाही. याविषयी परीक्षा करावी. वरच्या डौलाला भूलू नये. ज्याच्यात आपले नुकसान आहे, अशी वस्तू कधीही घेऊ नये ।।५।।
म्हणजे तुकाराम महाराज या अभंगातून गुरु-शिष्य सांप्रदायाचा उच्छेद करतात, निषेध करतात असे नाही. तर गुरुने मंत्रोपदेश करते वेळी शिष्याचा अधिकार पाहूनच मंत्रोपदेश द्यावा आणि शिष्यानेही योग्य अधिकाराचा गुरु पाहूनच उपदेश घ्यावा, असा या अभंगातील अभिप्राय आहे. असो.शिष्याच्या दुष्ट आचरणामुळे तात्यांना दुःख झाले. वास्तविक स्वदृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तर ते आपल्या स्वरुप महिमेमध्ये होते. सुखदुःखाच्या अतीत होते. फक्त लौकीक दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तर दुःखी झाल्यासारखे दिसू लागले आणि असे होणे स्वाभाविक आहे. नाण्याला जशा दोन बाजू असतात; त्याप्रमाणेच मनुष्याच्या जीवनात सुख दुःखे येतच असतात. शिष्याची वाईट वर्तणूक म्हणून काही लोक तात्यांना अपशब्द बोलू लागले की, यांनी असला मुलगा कशाला ठेवावा ? आयत्या पैशावर या पोराला मस्तीवान केले, वगैरे असे शब्द ऐकून श्री तात्या खिन्न झाले.
५३. दत्तजयंतीस प्रतिबंध
श्री समर्थ तात्यांनी श्री दत्तात्रयाची सुंदर मुर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करुन प्रतिवर्षी दत्तजन्माचा सोहळा फारच थाटाने साजरा करीत होते. अवती भवतीच्या सर्व भजनीमंडळीस आमंत्रणे देऊन बोलावून घेऊन दिंडीमिरवणूक रात्री हरिकीर्तन, रात्रभर जागर व सकाळी काला असे कार्यक्रम करुन दत्तजयंतीचा सोहळा साजरा करीत असत. त्याही वर्षी श्री तात्यांनी अनेक गावच्या लोकांना व भजनी मंडळींना बोलावून घेतले. त्याच प्रमाणे डोंगर शेळकीच्या भजनी मंडळीसही विराळ येथे बोलावून घेतले. तेंव्हा बरेच भजनी व इतर काही प्रतिष्ठीत मंडळी दत्तजयंतीसाठी विराळगावी हजर झाले. मठामध्ये गर्दी झाली.प्रतिवर्षी असा नियम चालू होता की, सोहळ्यामध्ये लागलेला सर्व खर्च तात्या पुरवित होते व विराळवासी सर्व लोकांनी झटून कार्यामध्ये सहभागी होऊन बाहेरुन आलेल्या सर्व समाजाची व्यवस्था करुन ही दत्तजयंती उत्साहात साजरी करीत असत.या तर्षी मात्र दत्तजयंतीच्या कार्यक्रमामध्ये विराळच्या एकाही व्यक्तिने भाग घेतला नाही. त्याचे कारण तात्यांच्या शिष्याच्याकडून घडलेल्या वाईट प्रकरणामुळे विराळवासीयांनी कार्यामध्ये भाग तर घेतला नाहीच. पण उलट कार्यक्रमास प्रतिबंध आणण्याचा विचार करु लागले. कांही लोकांनी तर इकडे उत्सव चालू असताना आपली गुरे, ढोरे श्री तात्यांच्या शेतामध्ये मोकाट सोडून तूर आदी पिकांचे बरेच नुकसान केले. तात्यांना हे समजले तेंव्हा विराळवासीयांचा खूपच राग आला.
श्री तात्या आपल्या मठामध्ये हा कार्यक्रम करत होते. कार्यक्रमास तर अडथळे हे विराळचे लोक करु लागलेच पण अधिकच विरोध वाढवून शेतामधील पिकांमध्ये गुरे, ढोरे सोडले आणि क्रोधाच्या उर्मीमध्ये तात्यांना वेडेवाकडे अपशब्द बोलू लागले. विराळ मधील काही सज्जन व्यक्तिनी त्या खळ लोकांना (दुष्ट लोकांना) तात्यांच्या संतपणाचे, त्यांच्या सामर्थ्याचे, त्यांच्या शुध्द आचरणाचे महात्म्य वर्णन करुन सांगितले. परंतु अशा लोकांशिवाय संताच्या असीम क्षमा, दया व शांती इत्यादी शुभगुणांची परीक्षा होणार तरी कशी ? हे लोक म्हणजे संतांच्या परीक्षेची प्रश्नपत्रिकाच आहेत आणि क्षमा, दया व शांती यांच्या अभ्यासाची पुस्तके आहेत. ज्या प्रमाणे पुस्तका शिवाय अभ्यास होत नाही; त्याप्रमाणेच अशा लोकाशिवाय संतपणाचा अभ्यास होत नाही किंवा परीक्षाही होत नाही.
त्यामुळे जगांमध्ये अशा खळ लोकांचीहि आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे तेजाची किंमत अंधकाराशिवाय नाही. त्या प्रमाणे संतांची किंमत असंताशिवाय नाही. या गोष्टी परस्पर सापेक्ष आहेत. तरी पण तेज स्वयंप्रकाश व स्वतंत्र असल्याकारणाने ते अंधःकारावर अवलंबून आहे असे मात्र नाही. अंधकार असो वा नसो; तेजाची किंमत स्वयंसिध्दच आहे. त्यामध्ये कमीपणा नाही.पण अंधकारामुळे तेजाचा विशेष विकास होतो एवढेच खरे ! असेच संतांची किंमत असंतावर अवलंबून आहे, असे म्हणता येत नाही. कारण ते स्वयंप्रकाश व स्वतंत्र आहेत. म्हणून त्यांची किंमत स्वयंसिध्दच आहे. खळाकडून असंताकडून त्यांचा विशेष विकास होतो; एवढेच समजावे लागते.म्हणून तर आम्ही म्हणतो की, विराळच्या लोकांनी श्री तात्यांचा छळ केला. त्यांच्याबरोबर विरोध केला. म्हणूनच तात्यांनी विराळचा परित्याग करुन ते डोंगर शेळकीस आले व आपल्या महिमेमध्ये राहून ज्ञानाचा उंचापुरा भाला (दंड) रोवून, वैराग्याची मजबूत दोरी घेऊन, भक्तिच्या किल्यावर आपल्या यशाचा, सदाचाराचा व सद्ङ्कीर्तीचा तिरंगी ध्वज या अवनीतलावर फडकावीत आहेत.
५४. श्री तात्यांची त्यागी वृत्ती
विराळ गावच्या कांही वाईट लोकांनी श्री तात्यांना खूपच ग्रास दिला. तरी तात्या निवांत राहिले. नाही तर आपल्या सर्व भक्त मंडळीना सांगून त्यांच्या करवी या लोकांना सळो की पळो करून सोडले असते. परंतु तात्यांचा स्वभाव फारच सहनशील असल्याकारणाने एक शब्द सुध्दा कोणाला बोलले नाहीत. अगदी शांत राहिले म्हणून कोणत्याही संकटाचा सामना करावा लागला तरीही निराश अथवा मोहग्रस्थ होत नाहीत आणि आपल्या इच्छित कार्याची परिपूर्णता झाल्यानंतरही जे गर्वाने ताठ होत नाहीत. असे पुरुष क्वचितच असतात. शोधूनही अशी माणसे आढळत नाहीत.
परंतु श्री समर्थ तात्या मात्र मोह, स्वार्थ व गर्व यांचा परित्याग करुन सतत भगवद् चिंतन करणारे असल्याकारणाने ते आपल्या स्वरुप महिमेमध्ये निवांत राहून आपल्या भवितव्याचा विचार करु लागले. की आपल्याला संपत्ती नको, मंदिर नको, मठ नको. तसेच या दुष्ट लोकांचा संबंधसुध्दा नको. इतकेच नव्हे तर विराळच्या मठाचा कायमचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. केवढी त्यागाची भूमिका !
मनुष्याला मोडून गेलेली सुईसुध्दा टाकून द्यावी वाटत नाही आणि श्री तात्यांनी तर स्वसामर्थ्याने शून्यातून सर्व संपत्ती कमविली आणि दगडी चौकोनी चिऱ्यांचा व्यवस्थित दोन मजली इमारतीचा भव्य मठ बांधला. इतकेच नव्हे तर समाधी स्थल देखील बांधून ठेवले होते. तेव्हा त्या मठावर, त्या स्थानावर त्यांची किती आसक्ती असावी परंतु ज्या प्रमाणे कमळ पाण्यामध्ये जन्माला येते, पाण्यातच वाढते आणि पाण्यातच राहते पण पाण्याचा एक थेंबही ते पान आपल्याला स्पर्श देत नाही. अगदी अलिप्त राहते. त्याप्रमाणे श्री समर्थ तात्यांनी यत्किंचितही आसक्ती न ठेवता विराळच्या मठाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.
हे चरित्र आपल्याला शिकवते की संतांचे आशीर्वाद, भक्तिभाव आणि गुरुकृपा यामुळे जीवन परिपूर्ण होते.