श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवन चरित्र भाग ४

Shri Samarth Dhondu Tatya Maharaj

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवन चरित्र भाग ४

।। श्री गणेशाय नमः ।।

१९. वैदिक कर्माचे अधिकारी

"ब्राम्हणांनी यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह या षट्‌कर्माचे आचरण करावे." या शास्त्र विधानाप्रमाणे श्री तात्या स्वधर्माचे आचरण करीत नित्य व नैमित्तिक कर्माचे यथासांग अनुष्ठान करु लागले. श्री तात्या, वैदिक कर्माचे उत्कृष्ट अधिकारी होते. त्याचे कारण असे की कोणत्याही वैदिक कर्माचा अधिकारी १) अर्थी २) समर्थ, ३) विद्वान व ४) शास्त्रापर्युदस्त ! असे असावे लागतात.

१) अर्थी - कर्म करण्याची इच्छा असलेले

२) समर्थ - कर्म करण्याचे सामर्थ्य असलेले.

३) विद्वान - कर्म करण्याचे ज्ञान असलेले आणि चंब

४) शास्त्रापर्युदस्त - शास्त्राने निषिध्द न मानलेले.

या चार अंगानी जे युक्त असतात त्यांना वैदिक कमरि अधिकारी मानले जाते. यापैकी एक अंग जरी न्यून असेल ता ते वैदिक कर्माचे अधिकारी होवू शकत नाहीत.

श्री तात्यांच्याकडे हे चारही अंग परिपूर्ण असल्या कारणाने त्यांची वैदिक कर्माचे उत्कृष्ट अधिकारी म्हणून ख्याती (प्रसिध्दी) होऊ लागली.

२०. श्री क्षेत्र पंढरीस आले

श्री तात्यांचे श्रीगुरु सखाराम महाराज काशीकर हे पंढरी यात्रेवरुन परत येते वेळी तुळजापूर येथे आषाढ वद्य एकादशी इ.स.१८८३ (शके १८०५) साली समाधीस्त झाले. श्री तात्यांना ही वार्ता समजताच काही मंडळी आपल्यासोबत घेऊन कंधार तालुक्यातील लोहा या गावी आले व आपल्या श्रीगुरूंची अंत्यविधी संस्कारानंतरची सर्व उत्तर क्रिया विधियुक्त करुन नवा लोहा (विठ्ठलवाडी येथे विठ्ठल मंदिरामध्ये श्री तात्यांनी ब्राम्हण भोजन दिले. नंतर काही मंडळीसह तुळजापुरास जाऊन ज्या स्थानी श्री सखाराम महाराज काशीकर यांचे देहावसान झाले. त्या स्थानी आपल्या श्रीगुरुस्मरणा प्रित्यर्थ श्री तात्यांनी समाधीचे बांधकाम केले व तेथून पुढे श्री क्षेत्र पंढरीस आले. चंद्रभागेचे स्नान करुन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले व परत विराळ येथे आले. श्री तात्यांच्या वयाच्या त्र्येपन्नाव्यावर्षी त्यांच्या श्रीगुरुंचे प्रयाण झाले.

२१. बोरीगावाहून धान्य

श्री समर्थ तात्या नामदेव महाराजांच्या भेटीनिमित्त उंबरज (ता. कंधार) येथे गेले. तेथे उंबरजच्या शेजारी असलेल्या बोरी गावचे एक सावकार तेथे आले. या दोन्ही महात्म्यांचे त्यांनी दर्शन घेतले व आपली घरगुती अडचण प्रतिपादन करु लागले की महाराज ! "मला माझ्या दोन कन्यांचा विवाह करावयाचा आहे सोयरीक वगैरे झालेली आहे. दोन लग्न असल्याकारणाने मला खर्च जास्त लागणार आहे. त्यासाठी मला आपल्याकडून कर्जाच्या स्वरुपात काही रक्कम हवी आहे. ती आपण द्याल तर फार चांगले होईल."

अशी त्या सावकाराची विनवणी ऐकून नामदेव महाराजांनी ती तात्यांना रक्कम द्यावयास लावली. त्यावेळी श्री तात्यांनी बोरीच्या सावकारास रक्कम दिली. तेंव्हा त्या सावकारांनी आपल्या उभय कन्यांचा विवाह समारंभ थाटाने साजरा केला व श्री तात्यांनी दिलेल्या रक्कमेचा मोबदला म्हणून श्री तात्या आपल्या वडीलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने करत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील केले जाणारे गावजेवण (परु) त्यासाठी लागणारा सर्व खर्च बोरीकर सावकार करीत असत. अर्थात ते सावकार प्रतीवर्षी बोरी गावाहून बैल गाड्यावर माल घेवून येवून हा पुण्यतिथी सोहळा व्यवस्थितपणे साजरा करत असत.

प्रतीवर्षी हाच क्रम त्या सावकारांनी प्राभाणिकपणे चालू ठेवला. पुढे श्री समर्थ धोंडुतात्या महाराज विराळचा परित्याग करुन डोंगरशेळीस आल्यानंतर श्री तात्यांच्या आज्ञेवरुन त्या सावकारांनी हा क्रम थांबविला. कारण डोंगर शेळकी ग्रामवासीयांनी हा सर्व खर्च करण्याचे कबूल केले म्हणून.... !!

२२. पूजेतील दुर्वा

श्री समर्थ तात्यांनी काही भक्त मंडळींना सांगून शेतातील बरीचशी दुर्वा, गवत (हराळी) आणवून घेतले व त्या आणलेल्या दुर्वा, गवताच्या लहान लहान जुड्या करुन आपल्या लाकडी कपाटामध्ये ठेवून देवू लागले.

तेव्हा धान्याचे पोते घरी ठेवून परत जाते वेळी एका शेजाऱ्याने पाहिले व त्याने चकीत होवून विचारले, तात्या हे काय करता ? तात्या म्हणाले, अरे, उन्हाळ्यामध्ये घरी खाण्यासाठी तू कोठारामध्ये धान्य साठवून ठेवत आहेस; त्याप्रमाणे मी माझ्या नित्याच्या पूजेमध्ये दुर्वा वाहतो, त्या उन्हाळ्यामध्ये देखील वाहता याव्यात म्हणून मी दुर्वा गवताच्या जुड्या करुन कपाटामध्ये संग्रही ठेवत आहे. तेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात आले की, श्री तात्यांची नित्य पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची किती तयारी असते कळून आले.

२३. मठाचे बांधकाम

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांनी मठ बांधावयाचे ठरवून विराळ गावच्या मारुती मंदिरा शेजारी एका न्हाव्याचे (नाभिकाचे) घर होते. त्या घरामुळे श्री तात्यांनी घेतलेली जागा अवकोन होत होती. त्यावेळी श्री तात्यांनी त्या न्हाव्याची जागा आपण घेवून त्या न्हाव्यास व्यवस्थित घर बांधून दिले व मारुती मंदिराशेजारी त्यांनी आपल्या जागेचा आराखडा चौकोनी करुन त्या जागेवर इ.सन १८९४ (शके १८९६) साली विराळच्या मठाच्या बांधकामास सुरुवात केली. सर्व भक्त जणांनी या बांधकामामध्ये खूपच साह्य केले. अवती भवतीच्या खेड्यातील काही भाविकांनी बैलगाडीने तर काही भक्तांनी आपल्या डोक्यावर दगडं आणून, मदत करु लागले. पुढे इ.स. १९०२ (शके १८२४) सालापर्यंत विराळच्या मठाचे बरेच बांधकाम झाले.

२४. विशाल वृक्ष

श्री तात्या मठाचे बांधकाम करते वेळी जशी दगडाची श्र मदत लोकांनी (भाविकांनी) दिली त्याचप्रमाणे मोठे मोठे लाकडाची सरं, कड्या किलचणे व लहानसान सामान या सर्व वस्तूही ते पुरवू लागले. विराळच्या सीमेवर ज्या ठिकाणी तीन वाटा (रस्ते) एकत्रीत आलेल्या आहेत. अशा जागेवर (तीन तीकट्यात) एक विशाल वृक्ष होता. त्या वृक्षामध्ये भूत पिशाच्च यांचे वास्तव्य होते की काय ! कोणास ठाऊक ? पण तो वृक्ष खूप वर्षापासून त्या जागेवर फोफावत होता. काही व्यक्तींनी त्या वृक्षास तोडण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न अयशस्वी होवू लागला. काही वयोवृध्द माणसे असे सांगतात की त्या वृक्षावर घाव घालताच त्या वृक्षातून विचित्र व भेसूर ध्वनी (आवाज) निघत होता. तसेच ती जागा, ते स्थळ भयावह असल्या कारणाने कोणीही त्या वृक्षास तोडले नाही. श्री धोंडूतात्या मठाचे बांधकाम करत आहेत. तेव्हा तो वृक्ष त्यांना द्यावा असा सर्व गावकऱ्यांनी व शेतमालकाने विचार करुन श्री तात्यांना विनंती केली की, 'तो वृक्ष तोडून तुम्ही मठाच्या बांधकामात वापरा.' त्यावेळी तात्यांनी होकार देवून ते कांही लाकूड तोड्यासहीत त्या वृक्षाखाली आले व त्या वृक्षास उजव्या हाताचा स्पर्श करुन त्या वृक्षाच्या बुडाशी आपण पाठ टेकून बसले लाकूडतोड्यांना आज्ञा देताच त्यांनी श्री तात्यांचे दर्शन घेऊन वृक्ष तोडण्यास सुरुवात केली. हे पाहण्यासाठी बरेच लहान थोर जमले होते.लाकूड तोडणाऱ्यांनी त्या वृक्षाच्या बुडाशी घाव घालताच त्या वृक्षातून विचित्र ध्वनी उमटला. तो विचित्र आवाज ऐकून सर्वानाच भीती वाटली. त्यावेळी तात्यांनी सर्वांना नाभिकार, धीर देवून शांत केले. तेंव्हा सर्वांनी मिळून तो वृक्ष तोडून टाकला. पुढे त्या वृक्षाचा उपयोग तात्यांनी आपल्या विराळच्या मठाच्या बांधकामासाठी केला. भगवंतानी गीतेच्या पंधराव्या अध्यायामध्ये संसाररुपी वृक्षाचे प्रतिपादन केले आहे. हा संसार वृक्ष फारच विशाल व दारुण आहे. या वृक्षाला तोडण्याचा मोठ्या मोठ्यांचा प्रयत्न निष्फळ होतो. अर्थात सिध्द, ऋषी, महंत व योगी इतकेच नव्हे तर करिता विचार । तोहा दृढ संसार । ब्रम्हादिका पार । नुल्लंघवे सामर्थे । तु.म. ब्रम्हादिक देवांनाही अशक्य असलेल्या अशा संसाररुपी वृक्षास श्री समर्थ धोंडुतात्या महाराजांनी आपल्या स्वसामर्थ्याने मुळासह, आमुलाग्र तोडून टाकले. मग हा वृक्ष तरी काय ?

हे चरित्र आपल्याला शिकवते की भक्ती, संतश्रद्धा आणि गुरुकृपा यामुळेच जीवनाला खरी दिशा मिळते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने