
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवन चरित्र भाग ३
।। श्री गणेशाय नमः ।।
१३. तात्यांची भक्ती
श्री तात्यांनी आपल्या जीवनामध्ये भक्तीची वेल बहरावी, फुलावी आगि फळावी यासाठी त्यांनी भगवद्भक्तांचा सहवास, भगवंतांची व भक्तांची नित्यसेवा, एकादशीला उपवास करणे भगवंतासी संबंधीत उत्सव साजरे करणे, भगवंताच्या यशोकथांचे श्रवण आणि पठण करुन त्यांचा प्रचार करणे, अविरत भक्तीने भगवंताचे पूजन करणे आणि भगवंताच्या श्रेष्ठ गुणांचे गायन अशा शुध्द भक्तीच्या मार्गाने ते आपला काळ घालवू लागले. ज्याप्रमाणे डोळे असूनही मनुष्याला रात्रीच्या वेळी नीट दिसत नाही. पण दिवा आणल्याबरोबर वाट उमजू लागते. त्याप्रमाणे भगवद्भक्ती करणाऱ्यांचे जीवनपथ आत्मप्रकाशाने उजळून निघतात. श्री तात्या अशी भगवद्भक्ती सातत्याने करीत राहिले म्हणून त्यांचे जीवन आत्मप्रकाशाने उजळून निघाले. कारण हरिभक्ती हेच खरे भाग्य आहे एकनाथ महाराज म्हणतात
निजभाग्याची परमजोडी । महासुखाची आवडी गाढी ।
सकळ गोडीयांची परमगोडी । भक्ती रोकडी श्रीहरीची। ए.म.
'समर्थ' या संज्ञेला पात्र झाले. आणि या भक्तीच्या बळावरच ते सामर्थ्यवान होऊन
तसेच या भक्तीने त्यांनी देवाला आपलासा केले. इतकेच नव्हे तर या भक्तीसाधनाने श्री तात्या कर्तुम्, अकर्तुम् व अन्यथाकर्तुम् अशा त्रिविध शक्तीने संपन्न झाले.
१४. श्री तात्यांची उपासना
श्री समर्थ तात्या ब्रम्हचर्य व्रतस्थ राहून नित्य नियमाने आसने, सूर्यनमस्कार व गायत्री मंत्राचा बाराशे जप करीत असत. श्री मारुती महाराज लोहेकर लिहितात
आणिक तयाचा नेम जाण । नित्य करी सूर्य आराधन ।
या संकल्पविधी पूजनावीन । नघे अन्न कालत्रयी ।। ८
आणखी एक त्यांचा नेम असा की ते नित्य सूर्यदेवतेची आराधना करीत व सकाळ, दुपार व संध्याकाळी संध्या वंदनाचा विधीसंकल्प होता. ती पूजा पूर्ण केल्याशिवाय अन्न सेवन करीत नसत. श्री तात्या सूर्य आराधना करण्याचे कारण श्रीगुरुमुखाने सूर्योपासकांचे मत त्यांच्या ऐकण्यात आले की, एका सूर्यावाचून सर्व देव अंध आहेत, सूर्यच सर्वाचे प्रकाशन करतो. दीप आणि रत्नादिपदार्थ हे अन्य पदार्थाचे प्रकाशन करतात. परंतु तेही सूर्याचेच अंश आहेत. दुसऱ्याच्या हिताकरीता स्वतः सारखे भ्रमण करणारा सूर्याशिवाय दुसरा देव कोणीही नाही. सर्व वैदिक कर्मे कालाधीन आहेत. तो भूत, भविष्य आणि वर्तमानकाळ सूर्य गतीच्या आधीन आहे. ज्यांच्या कोपाने सर्व भस्म होऊन जाईल. अशी सूर्य देवता उपासकांना, भक्तांना लवकर प्रसन्न होते. याच सूर्यदेवाने प्रसन्न होऊन पांडवांना थाली दिलेली होती. त्यामुळे त्यांच्या नशिबी आलेला वनवास त्यांना अवघड गेला नाही. तसेच-
जगाचे आंध्य फेडितु । श्रियेची राऊळे उघडितु ।
निघे जैसा भास्वतु । प्रदक्षिणे ।। ज्ञा.म.
सूर्य जसा जगाचा आंधळेपणा नाहिसा करीत, लक्ष्मीची मंदिरे म्हणजे कमले ती विकसित करीत आणि सृष्टी शोभेची मंदिरे उघडी करीत (सूर्य) पृथ्वी प्रदक्षिणेला निघतो. अशी ही सूर्यदेवता अत्यंत परोपकारी आहे. अशी सूर्य महती जाणून श्री समर्थ तात्या नित्य नियमाने सूर्य आराधना करु लागले. त्यामुळे त्यांच्या अंगी अचिंत्य दैवी शक्ती उदयास आली.
१५. सूर्यगती अवरोध
एके दिवशी भाद्रपद महिन्यातील वद्य सप्तमी दिवशी श्राध्ददिन होता. पितर म्हणून बाहेरगावच्या ब्राम्हण मंडळींना आमंत्रण दिलेले होते. ती पितर मंडळी वेळेवर हजर राहिले नाही आणि नियम तर असा आहे की, सूर्यास्ताच्या आंत सर्व विधी परिपूर्ण झाला पाहिजे. तेव्हा मातोश्री चिंतायुक्त होऊन तात्यांना म्हणाल्या "धोंडू, सूर्य तर मावळायला गेला आणि आणखी ब्राम्हण मंडळी आलेली नाही. तेंव्हा आपला विधी कसा पूर्ण होणार ?" तात्या म्हणाले, "आई तू काही काळजी करु नको. आपला श्राध्द विधी पूर्ण झाल्याशिवाय मी सूर्य देवतेस मावळू देणार नाही."
असे बोलून त्यांनी तुळशीच्या ओट्यावर वृंदावनाशेजारी एक दगड ठेवला व त्या दगडाच्या पूर्व दिशेला हळूहळू सरकत असलेल्या छायेपुढे आपल्या हातामध्ये संध्येची पळी घेऊन दक्षिण उत्तर एक रेषा ओढली आणि आईच्या हाती श्राध्दविधीचे सर्व साहित्य एका पात्रावर मांडून ते पात्र रेषेच्या पूर्व दिशेला ठेवावयास सांगितले.
मातोश्रीने पूजेचे पात्र ठेवताच श्री तात्या आईच्या शेजारी तुळशीच्या ओट्यावर उभे राहून मावळत्या सूर्याकडे पाहत, हात जोडून म्हणाले, हे सूर्यनारायणा तुम्हाला माझा नमस्कार असो. आज माझी एक विनंती आहे की, या धोंड्याची छाया (सावली) मी ओढलेल्या रेषेच्या पुढे जाऊ देऊ नकोस व श्राध्दविधीच्या साहित्य पात्रावर सावली पडू देऊ नकोस. आमचा सर्व विधी तुमच्या कृपा प्रकाशात पूर्ण होऊ द्या. ही नम्रतेची प्रार्थना ! इतक्यात पाहुणे - ब्राम्हण मंडळी आली. तेंव्हा मातोश्रींना आनंद झाला. श्री तात्यांनी निवांतपणे सर्व श्राध्दविधी परिपूर्ण केले. ब्राम्हणभोजन झाले. त्यांना विडा व दक्षिणा देऊन तात्यांनी त्यांचे आदरपूर्वक दर्शन घेतले. ती ब्राम्हण मंडळी एकमेकांशी बोलू लागले की, 'अहो, भोजनापूर्वीच सूर्य मावळायला गेलेला दिसला आणि आपले भोजन झाले तरी सूर्य तेथेच कसा ? का मावळत नाही ?' असे बोलत ते आश्चर्य करु लागले. तेव्हा श्री तात्या आईसह घराबाहेर तुळशी वृंदावनाजवळ आले. सर्व ब्राम्हण मंडळी पाहतच होती. मातोश्रींनीही पाहिले आणि आश्चर्य करु लागल्या की, माझ्या धोंडूने धोंडा ठेवून रेषा ओढली तर माझ्या धोंडूची लक्ष्मणरेषा सूर्याने उल्लंघन केलेली नाही केवढे आश्चर्य !! श्री तात्यांनी सूर्य देवतेकडे पाहून नमस्कार केला आणि तो दगड उचलला.
तेंव्हा एका क्षणातच सूर्य मावळला. गडद अंधःकार, काळोख पसरला. श्री तात्यांची ही आश्चर्यजनक कृती पाहून सर्व ब्राम्हण मंडळीच्या अंगावर रोमांच उभे राहिले व मातोश्रींच्या नेत्रामध्ये आनंदाश्रू आले. त्यांनी श्री तात्यांनी आईचे आदर भावाने दर्शन घेतले. धन्य तात्यांचे सामर्थ्य ! व धन्य त्यांची निष्ठा ! असा संतांचा महिमा आहे तो सामान्यांना अनाकलनीय, अवर्णनीय आहे. श्री तुकाराम महाराज म्हणतात
संतांचा महिमा तो बहु दुर्गम ।
शाब्दीकांचे कांम नाही येथे ।। तु.म.
१६. सर्पदंश
एके दिवशी श्री तात्यांच्या पायाला सर्पदंश झाला. तो सर्पदंश झालेला सर्वानी पाहिला व ताबडतोब त्या सापास मारले, नंतर त्यांना नागमंत्र्याकडे न्यावे का नागमंत्र्यासच इकडे बोलवावे ? अशा विचारात घाबरे होवून सर्व जण धावपळ करु लागले. तेव्हा तात्या निर्भय होऊन लोकांना म्हणाले, तुम्ही घाबरु नका. विषाची मला काहीही भीती वाटत नाही. कारण विष आमचा मावळा आहे. अर्थात लक्ष्मी आमची माता आहे व नारायण आमचा पिता आहे आणि माता लक्ष्मीचा जन्म समुद्रामध्येच झालेला आहे. अर्थात लक्ष्मी व विष हे दोघे बहिण भाऊ म्हणून विष मला मातुल आहे. त्यामुळे ते मला काहीही बाधा करु शकणार नाही. फक्त तुम्ही मला स्नान घाला. असे बोलत असता त्यांचे अंग काळेनिळे झाले. तेंव्हा सर्व जण घाबरुन विचार करु लागले की, सर्पदंश झाल्यानंतर पाण्याचे फारच वैरत्व आहे आणि तात्या तर स्नान घाला म्हणतात. तेंव्हा काय करावे ? पण यांचे सामर्थ्य काही वेगळेच आहे. तेंव्हा 'स्नान घालू' असे म्हणून भीत भीत त्यांना स्नान घातले.
स्नाननंतर श्री तात्या गायत्री मंत्राचा जप करु लागले. तेंव्हा सर्व मंडळी पाहतच होती की काळेनिळे झालेले अंग ते जसा जसा गायत्री मंत्राचा जप करु लागले तसे तसे त्यांची अंगकांती पूर्ववत गोरी व तेज संपन्न होऊ लागली हे केवढे आश्चर्य !
खरोखर फक्त साधुसंत सोडून जगातील सर्व मानवमात्रांना एक साप डंखलेला आहे. श्री एकनाथ महाराज म्हणतात
लोभ सर्प डंखला करु काय ।
स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय ।ए.म.
या लोभ सर्पाच्या दंशामुळे सर्वाना भुली पडलेली आहे. म्हणून आपल्या स्वरुप स्थितीस दुरावत आहेत. परंतु श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांना मात्र या सापाची बाधा होऊ शकली नाही. त्याचे कारण-
गुरु गारुडी आला धाऊनी ।
बोध वैराग्याचे पाजिले पाणी ।
विवेक अंजन घातले नयनी ।
सोहम् शब्दे वाजवी नामध्वनी ।। ए.म.
१७. मातेची कुशी धन्य
सदाचार संपन्न, सत्वशाली वैदिक ब्राम्हण म्हणून श्री तात्यांची प्रसिध्दी, कीर्ती चोहिकडे पसरली. आपल्या पवित्र आचरणाने समाजाचे मन वेधून ते सर्वांचे आवडते झाले. वैदिक ब्राम्हण म्हणून प्रत्येक सत्कार्यामध्ये त्यांना मानाचे पहिले स्थान देवून लोक त्यांचा गौरव करु लागले व गुरु दक्षिणेच्या रुपाने भरपूर धन द्रव्य देवू लागले. तसेच गावोगावीचे भाविक भक्त श्री तात्यांना आवडीने आपल्या गावी घेवून जाऊ लागले. तेंव्हा वयाच्या चोवीसाव्या वर्षी इ.स. १८५४ सालापासून त्यांनी घोड्यावरुन भ्रमंती सुरु केली.
आपला मुलगा सद्गुणी, सदाचार-संपन्न, कीर्तिवंत आणि धनवंत पाहून कोणत्या आईला आनंद वाटणार नाही ? तर प्रत्येक आईला आनंद वाटणार, त्याप्रमाणे पवित्र आचरणाच्या सद्गुणी सुपूत्राकडे पाहून मातोश्री गंगाबाई आपल्या पतिवियोगाचे दुःख विसरुन श्री तात्यांच्याकडे पाहून 'आपली कुशी धन्य झाली' असे वाटून जीवनाचा काळ आनंदाने भगवद् भक्तीमध्ये घालवू लागल्या.
विशाल सागरामध्ये ज्याप्रमाणे लाकडाचे ओंडके एकत्र येतात आणि काही काळ बरोबर वाहत राहिल्यानंतर एकमेकांपासून दूर जातात त्याप्रमाणे बायका, मुले, नातेवाईक, सोयीरेधाइरे आणि संपत्ती यांचा संयोग वियोग होत असतो. हा वियोग अटळ असतो. अर्थात संयोगाचा शेवट वियोगानेच होतो. त्याप्रमाणे जीवनाचा अंत मृत्यूने होतो. तो मृत्यू (सात चिरंजीव व ईश्वर सोडून) प्रत्येकाच्या पाठीमागे सतत उभा आहे. या जगत् प्रवाहाच्या नियमाप्रमाणे मातोश्री गंगाबाई इ.स. १८६० (शके १७८२) साली वैकुंठवासी झाल्या. अर्थात श्री तात्यांना त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी आईचा वियोग घडला.
१८. देणगीचा सत्कार्यामध्ये विनियोग
श्री तात्यांना गुरु दक्षिणा द्यावी म्हणून सर्व भाविक भक्त देणगी (दक्षिणा) देऊ लागले. हे सर्व पाहून तात्यांचे कोळनुरचे लोभाजी न्हावी, समवयस्क मित्र जांबचे नागादेव व हे दोघे श्री तात्यांना म्हणाले, "महाराज तुम्ही आपल्या शिष्य मंडळातर्फे भाविक भक्तांच्या तर्फे दक्षिणा, देणगी कशासाठी घेता ?" असा प्रश्न विचारण्याचे कारण श्री तात्या नैष्ठिक ब्रम्हचर्य व्रतस्थ राहून इंद्रियोपयोगाचा अवरोध करून परमार्थ साधनेमध्ये, भगवद्भक्तीमध्ये आपला काळ घालू लागले होते म्हणून हा प्रश्न त्यांनी विचारला.
तेंव्हा तात्या म्हणाले, "मी वैदिक ब्राम्हण आहे म्हणून वेदविधानाप्रमाणे कर्माचे अनुष्ठान करीत राहणे हा माझा स्वधर्म आहे. म्हणून कपीलाषष्ठी, सिंहस्थ पर्वणी, चंद्रसूर्याची ग्रहणे, अशा पर्वकाळांमध्ये प्रयागादि तीर्थाचे स्नान, पुण्यपावन क्षेत्रास भेट, तीर्थयात्रा, देवदर्शन व संतदर्शन या सर्व गोष्टी माझ्या हातून घडाव्यात अशी अपेक्षा आहे आणि या सर्व गोष्टी साध्य करुन घेण्यासाठी शरीरसामर्थ्याबरोबर द्रव्य सामर्थ्यांची नितांत जरुरी आहे. म्हणून माझ्या शिष्यमंडळींच्या दक्षिणेचा व भाविक भक्तांच्या देणगीचा मी स्वीकार करीत आहे आणि ही देणगी ब.घेवून माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्ताने प्रतीवर्षी अखंड हरिनाम सप्ताह करुन अन्नदान करीत आहे."अर्थात
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ।
उदास विचारे वेंच करी ।। तु.म.
श्री तुकाराम महाराजांच्या या वचनाप्रमाणे मी द्रव्याचा योग्य विनियोग सत्कार्यामध्ये करीत आहे. असे श्री तात्यांचे समाधानकारक वाक्य श्रवण करुन श्री नागादेव व लोभाजी संतुष्ट झाले व त्या दोघांनीही त्यांना दक्षिणा देवून दर्शन घेतले व पुढे आयुष्यभर तात्यांच्या मनोगताप्रमाणे वर्तन करुन त्यांची जवळीक साधली.
हे चरित्र आपल्याला शिकवते की भक्ती, संतश्रद्धा आणि गुरुकृपा यामुळेच जीवनाला खरी दिशा मिळते.