
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवन चरित्र भाग २
।। श्री गणेशाय नमः ।।
७. श्रीगुरु सखाराम महाराज
ब्राम्हण वंशातील वाजसनयी शाखेचे व भारद्वाज गोत्राचे हे सखाराम महाराज बाल्यावस्थेतच बारावे वर्षी विरक्त होऊन तीर्थयात्रा करीत फिरता फिरता सत्तावन्नावे वर्षी श्री क्षेत्र पंढरीस आले. तेथे आल्यावर त्यांना असे वाटले की, ब्रम्हज्ञानावाचून मुक्ती नाही व ते तर सद्गुरु वाचून प्राप्त होत नाही तर आपणास गुरु कोण? व कसे मिळणार ? म्हणून पांडुरंगाजवळ त्यांनी अन्नपाण्यावाचून अनुष्ठानास सुरुवात केली, परंतु तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे नाही चालत तांतडी । प्राप्तकाळघडी आल्यावीण ।। तु.म. त्याप्रमाणे एकविसावे दिवशी त्यांना असा दृष्टांत झाला की, "कंधार मुक्कामी हनुमंतराय म्हणून एक साधू आहेत त्यांना तू शरण जा, म्हणजे ते तुला कृतार्थ करतील." ताबडतोब ते कंधारास आले व सद्गुरुमुखाने महावाक्य उपदेश होताच कृतार्थ झाले. पुढे ते लोहा येथे आले. कारण तेथे ब्राम्हणांचा व वैश्यांचा समाज जास्त असल्याकारणाने विधियुक्त पुराण श्रवण व शास्त्रचर्चा करुन पारमार्थिक आनंद उपभोगता यावा तसेच आपल्या हातून विद्या प्रदान करण्यासाठी म्हणून ते लोहा येथे आले. दुसरे कारण म्हणजे नवा लोहा येथे विहीर खोदतेवेळी श्री विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती निघालेली आहे. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करुन त्या विहिरी शेजारी विठ्ठलाचे भव्य मंदिर बांधले आहे. अशा या स्थानाचा महिमा जाणूनच ते विठ्ठल मंदिरामध्ये राहून काही मुलांना वैदिक विद्येचे शिक्षण देवू लागले. त्यांच्या अंगी धगधगीत वैराग्य होते. वयाच्या पंचविसाव्या वर्षी एक प्रसंग घडला. सखाराम महाराजांच्या अंगावर बहुमोलाचे वस्त्र होते. जरीकाठी धोतर, चांगला शर्ट व जरीचा फेटा पाहून काही कुचेष्ठित माणसे त्यांना म्हणाली "महाराज एवढे भारी बहुमोलाचे कपडे तुम्हाला काय करावयाचे आहे.” असे वाक्य ऐकून त्यांनी ते अंगावरचे वस्त्र उतरुन ठेवले व सुतारा हाती एक लाकडी जांग तयार करुन घेऊन ती जांग वेष्टन करुन आजन्म नैष्ठिक ब्रम्हचारी व्रताने राहिले. ते आषाढी व कार्तिकी या दोन्ही वाऱ्या सुमारे चाळीस वर्षे करीत होते. महाराजांचे मस्तकावर बारावर्षापासून जो जटाभार होता तो वृध्दपणांत वयाचे नव्वदावे वर्षी सहन होईनासा झाला तेंव्हा आषाढी वारीच्या वेळी पांडुरंगाचे चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली की "हे पांडुरंगा ! देवा !! 'कृपा करुनि मजवर । उतरी हा भार मस्तकीचा ।।'तु.म. अशी प्रार्थना करुन मस्तक उचलल्याबरोबर जटाभार पांडुरंगाचे पायावरच राहिला. असे पाहून बडवे व पुजारी यांना फार आश्चर्य वाटले. एवढ्या अधिकाराचे ते सखाराम महाराज श्री धोंडूतात्यांना श्रीगुरु लाभले केवढे भाग्य...... ! मुमुक्षंना 'अधिकार संपन्न श्रीगुरु भेटणे' यात शिष्यांचे भाग्य असते व श्री गुरुंना कृपापात्र सशिष्य लाभणे गुरुंचे भाग्य ! त्या प्रमाणे सखाराम महाराजांना त्यांच्या जीवनामध्ये अनेक विद्यार्थी शिष्य लाभले. त्यापैकी त्यांच्या वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी त्यांना त्यांची मर्जी संपादन करुन मनोगत ओळखून वर्तन करणारे सदाचार संपन्न श्री धोंडूतात्या महाराज हे पहिले शिष्य लाभले व वयाच्या शेवटी गु.भ. दास मारुती महाराज शर्मा लोहेकर हे दुसरे शिष्य लाभले. या मारुती महाराजांनी श्री समर्थ तात्यांच्या हयातीतच तात्यांच्याविषयी ओवीबध्द चरित्र लिहिलेले आहे. ते नवा लोहा (विठ्ठलवाडी) येथे दत्तसंस्थानामध्ये संग्रही आहे. ते अद्याप प्रकाशित झालेले नाही.
८. मौजीबंधन
आई वडीलांनी श्री धोंडूतात्या महाराजांचे मौजीबंधन करावयाचे ठरवून सखाराम महाराजांच्या सान्निध्यात होम हवन करून तात्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी विधियुक्त व्रतबंधन करुन यज्ञोपवीत-जाणवे घातले. तसेच सखाराम महाराजांनी आपल्या जवळची रुद्राक्षांची माला श्री तात्यांच्या गळ्यामध्ये घालून मंत्रोपदेश दिले. श्री तात्यांच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली. सखाराम महाराज प्रेमाने शिकवू लागले व धोंडू महाराज आपल्या तीव्र बुध्दीने सर्व वैदिक विद्या ग्रहन करु लागले. त्यांनी श्री गुरुंच्या सान्निध्यात सात वर्ष राहून बरीचशी वैदिक विद्या ग्रहण केली. आई वडीलांच्या सान्निध्यात राहून लहान धोंडूतात्यांचा काळ आनंदात जाऊ लागला. इ.स. १८४३ मध्ये त्यांच्या वडील बंधूचे (राम महाराजांचे) लग्न झाले.
९. वडिलांचा स्वर्गवास
श्री तात्या आपल्या वडिलांच्या जवळ व श्री गुरुंच्या जवळ किंचितही वेळ वाया न घालवता आपल्या तीव्र बुध्दीने सर्व विद्या ग्रहन करु लागले. त्यांची तीव्र बुध्दी पाहून त्यांना तात्याविषयी कुतूहल निर्माण झाले व प्रेमाने लळे पुरवून पाठ शिकवू लागले. परंतु आपल्या सुपूत्राचे यश व सदाचार तसेच सोज्वळ कीर्ती हे सर्व पाहण्यासाठी पिता अंबादास महाराजांचे आयुष्य अपुरे पडले आणि (इ.स. १८४५) वैशाख वद्य सप्तमी शके १७६७ साली स्वर्गवासी झाले. श्री तात्यांना त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी वडीलांचा वियोग घडला.
१०. विराळगांवी आगमन
मातोश्री गंगाबाईचे वडील बंधू श्री बापुराव महाराज माली पाटील यांनी श्री तात्यांना व त्यांच्या मातोश्रींना आपल्या घरी इ.स. १८४६ (शके १७६८) साली विराळ गावी आणले. विराळ हे गाव आजच्या लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात येते. श्री बापुराव महाराजांना संतती नसल्याकारणाने त्यांनी आपला भगिनीपुत्र (भाचा) दत्तक घेण्याचे ठरवून आपल्या बहिणीजवळ सर्व मनोगत सांगून धोंडूतात्या विषयीची मागणी केली व श्री तात्यांना दत्तक म्हणून आपल्या घरी ठेवून घेतले. आपले मामा, मामी व आई यांच्या सान्निध्यात त्यांच्या आज्ञेमध्ये वर्तन करून, त्यांची मर्जी संपादन करुन या सर्वांचा शुभाशिर्वाद श्री. तात्यांनी मिळविला व जीवनात सुयश कमवून अजरामर झाले, कीर्तिमान झाले.
११. नैष्ठिक ब्रम्हचर्य
श्री समर्थ तात्यांचा काळ विराळगावी मातुलगृही आनंदात जाऊ लागला. दैनंदिन कालचक्रात सकाळनंतर दुपार यावी त्याप्रमाणे श्रीतात्या नव तारुण्यात वयात आले. तेंव्हा जगरुढीप्रमाणे पाहुणे मंडळी येवून धोंडूतात्यांच्या विवाहादिषयी विचार विनिमय करु लागले. त्या वेळी श्री तात्यांनी सर्व पाहुणे मंडळीस निर्धाराने निश्चयपूर्वक प्रतिपादन केले की तुम्ही कोणीही माझ्या विवाहाविषयी बोलू नका. मी आजन्म नैष्ठिक ब्रम्हचारी व्रताने राहणार आहे. श्री तात्यांनी असा दृढ निश्चय करुन आजन्म नैष्ठिक ब्रम्हचारी राहिले. पुढे तात्यांच्या वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांच्या गुरु बंधूने (श्री मारुती महाराजांनी) श्री तात्यांचे ओवीबध्द चरित्र लिहिलेले आहे. त्या चरित्रात त्यांनी लिहिलेले आहे. ते मुळीचे अविवाहीत । अंतरी आठवी विवाहीत । प्रभाती होवोनियाशुचिष्मंत । कर्म आचरत निष्काम ।। अशा परमार्थ साधनेमध्ये भक्ती मार्गाचा अवलंब करून श्री तात्या आजन्म नैष्ठिक ब्रम्हचारी व्रताने राहिले. साधुसंताना संसार करता येत नव्हता म्हणून केला नाही का निष्फळ म्हणून केला नाही ? ज्यांना अशक्य ते शक्य करता येत होते म्हणजे रेड्यामुखी वेद बोलविता येत होता, भिंत चालवता येत होती किंवा श्री तुकाराम महाराजांवर शिवाजी महाराजासारखे प्रसन्न होते, किंबहुना 'लक्ष्मीवल्लभ तया जवळी ।' तसेच अष्ट महासिध्दी वोळंगती द्वारी । तु.म. अशी ज्यांची स्थिती होती त्यांना संसार वाढविणे अशक्य नव्हते. त्यांनी संसाराचे खरे स्वरुप जाणले होते. 'न रुपमस्येह तथोपलभ्येते ।' यया फळ ना चुंबिता । फूल ना तुरंबिता ।। असा संसार आहे हे त्यांनी ओळखले होते. म्हणून ते त्यांच्या मागे लागले नाहीत.
१२. तारुण्यकाल
श्री तात्या आपल्या तारुण्याचा काल शांतपणे ओलांडत जगामध्ये आदरणीय होऊ लागले. म्हणून नम्रतेने अलंकृत आणि दया क्षमा अशा गुणांनी तेजाळलेले जे तारुण्य तेच सौंदर्याने मुसमुसलेले खरे तारुण्य आहे, असे तेजः संपन्न तारुण्य आपल्या ईश्वर भक्तीसाठी ब्रम्हचर्य व्रतस्थ राहून काल क्रमू लागले. जयाचिया आवडी । न गणिती ब्रम्हचर्याची सांकडी । निष्ठूर होऊनि बापुडी । इंद्रिये करितो ।। ८-१०६ तु.म. ज्या भगवंत प्राप्तीच्या आवडीने ब्रम्हचर्यासारख्या कठीण संकटाचीही पर्वा करीत नाही आणि जे निष्ठूर होऊन इंद्रियांना निग्रहाचा मार देऊन त्यांना गरीब, दीन करुन सोडतात. त्याप्रमाणे श्री तात्या इंद्रिये निग्रहासाठी दररोज व्यायाम, आसने, सूर्यनमस्कार व बाराशे गायत्री मंत्राचा जप करु लागले. ज्याप्रमाणे गंगेच्या पोटी जन्म घेऊन देवव्रत भीष्माचार्य गंगेप्रमाणे पवित्र आजन्म ब्रम्हचारी राहिले, त्याप्रमाणेच श्री तात्यांनी मातोश्री गंगाबाईच्या उदरी जन्म घेऊन आजन्म ब्रम्हचारी राहिले आणि गंगा ज्याप्रमाणे जगाला पावन करते-फेडीत जगाचे पाप ताप । पोखीत तीरीचे पादप । समुद्रा जाय आप । गंगेचे जैसे ।। १६-११९ ज्ञा.म. गंगेचे पाणी जीवमात्राचे पाप आणि ताप नाहीसे करीत व तिरावरील वृक्षाचे पोषण करीत समुद्राला जसे जाते त्याप्रमाणे श्री तात्या गंगेप्रमाणे पवित्र आचरणाने वर्तन करीत सर्वाना सन्मार्गाचे धडे देऊन समाजाला पावन करीत आपल्या जीवनाची वाटचाल करु लागले.
हे चरित्र आपल्याला शिकवते की भक्ती, संतश्रद्धा आणि गुरुकृपा यामुळेच जीवनाला खरी दिशा मिळते.