
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवन चरित्र भाग ६
।। श्री गणेशाय नमः ।।
३१. भक्तास पाय दिले
विराळ गांवापासून पांच किलोमीटर अंतरावर कुनकी नांवाचे एक गांव आहे. तेथे एक पांगळा मनुष्य राहत होता इतर माणसासारखे त्याचे पाय असुनही लहानपणापासूनच त्यास चालता येत नव्हते. अशा दुःखावस्थेतच हाताने सरकटत त्याने आपल्या जीवनाची पस्तीस चाळीस वर्षे घालवली. त्याला आपल्या पांगळेपणाचे फार वाईट वाटावयाचे. मी जन्मास येऊन काही उपयोग नाही. मला चालता फिरता येत नाही. मी जीवंत असूनही मेल्या सारखा आहे. मी पूर्वजन्मी कोणते पाप केले होते कोणास ठाऊक !
म्हणून मी पांगळा झालो.'केले कर्म झाले तेचि भोगा आले' ए.म.
असा विचार करुन तो सातत्याने भगवंताचे नामस्मरण करु लागला आणि उदास वृत्तीने जीवनाची कालक्रमणा करु लागला. श्री समर्थ धोंडूतात्या अधून मधून कुनकी गावी गेले असता अथवा कुनकीवरुन पुढच्या गावी जात असता हा पांगळा हाताने सरकटत येऊन त्यांचे दर्शन घेत होता. श्री तात्यांचा महिमा व त्यांची तपश्चर्या या सर्व गोष्टी श्रवण करुन त्याची दृढ भक्ती श्री तात्यांच्या चरणी जडली होती.त्यांचे नाव घेतल्याशिवाय तो अन्नसेवन करत नव्हता. असा त्याचा सर्व काळ हरिचिंतनामध्ये जात असल्याकारणाने एके दिवशी त्याचे पुण्य फळाला आले.
इ.स.१९०४ (शके १८२६) सांली एक अघटित घटना घडली. बैलगाडीमध्ये बसून कुनकीगावची काही माणसं विराळगावी श्री समर्थ तात्यांच्या दर्शनानिमित्त निघाले असता त्या सर्वाबरोबर हा पांगळा मनुष्यही विराळगावी आला. सर्वांनी श्री तात्यांचे दर्शन घेतले. तसेच या पांगळ्या मनुष्यानेही आपल्या हाताने सरकटत जाऊन श्री तात्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घातले. त्यास तात्या म्हणाले, "काय रे ? तुझे कसे काय चालले आहे ? बरे आहे ना !" तो म्हणाला, "महाराज ! माझ्यासारख्या पांगळ्या मनुष्याने जीवन जगण्यामध्ये काय अर्थ आहे."
'पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुत विस्तारले' ज्ञा.म.
माझे कोणते पाप असेल की मी पांगळा झालो, असे केविलवाणे शब्द बोलत त्याचे नेत्र पाण्याने डबडबून आले. त्याची ती अवस्था पाहून श्री समर्थ तात्या म्हणाले, "काय रे, तुला पाय पाहिजेत का ? पाहिजे असतील तर तुला मी पाय देतो." तो म्हणाला, 'महाराज, हे आता कसे शक्य आहे ? या जगामध्ये असे कधी घडले आहे का ?' असे त्या पांगळ्या मनुष्याचे केविलवाणे शब्द ऐकून व त्याची ती दुःखावस्था पाहून तात्यांचे अंतःकरण द्रवले आणि त्यांचा दयाभाव जागा झाला. खरोखरच
धन्य ते संसारी । दयावंत जे अंतरी ।।१।।
येथे उपकारासाठी । आले घर ज्या वैकुंठी ।।२।।
खरे दयावंत संतच असतात. 'दयावंत' म्हणजे दयेने संपन्न, दयेने युक्त ते दयावंत ! अर्थात् दयेचा व संतांचा नित्यसंबंध आहे. अत्यंतिक व अमर्याद दया संतांतच असते. सर्वभूतमात्राविषयीची दया संताजवळ असते. संत हे खळ, दुष्ट, दुर्जनावरहि दयाच करतात. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर टीका लिहून पूर्ण झाल्यानंतर श्रीगुरुकडे पसायदान आगितले. त्यावेळी त्यांना प्रथम खळच आठवले व त्यांचेविषयी मागणी केली की -
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो ।
भूतां परस्परे जडो । मैत्र जीवांचे ।।ज्ञा.म. ।।
खळांची 'व्यंकटी' म्हणजे खळांचा वाकडेपणा जाऊन ते ऋजु, सरळ होऊन त्यांची सत्कर्म करण्यात केवळ प्रवृत्तीच नव्हे तर 'रती' म्हणज प्रेम व आवड निर्माण होवो. यावरुन भूतमात्राविषयीची दया संताजवळ असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात
भूतांची दया हे भांडवल संता ।
आपुली ममता नाही देही ।। तु.म. ।।
भूतांची दया हे संतांचे भांडवल असते. श्री ज्ञानेश्वर महाराज संताच्या दयेविषयी दृष्टांत देतात -
निम्न भरलिया उणे । पाणी ढळोचि नेणे ।
नेवी श्रांता तोषोनि जाणे । सामोरे पां ।।ज्ञा.म. ।।
जमिनीवरुन पाणी वाहते तेंव्हा ते समारेचा खड्डा भरल्याशिवाय पुढे जातच नाही; त्याप्रमाणे संत हे दीन, दुःखी, कष्टी, शिणलेला दृष्टीस दिसला तर त्याची पीडा, दुःख दूर केल्याशिवाय पुढे जातच नाहीत. ही दया संतांना वैकुंठात गप्प बसू देत नाही; तर ती ये अवतार घेण्याला भाग पाडते. म्हणून "येथे उपकारासाठ आले" आणि येथे येऊन संसार करीत नाहीत तर -
संसाराच्या नावे घालोनियां शून्य ।
वाढतां हा पुण्य धर्म केला ।। तु. म. ।।
त्यांनी संसार जाळला
-"जाळोनि संसार बैसलो अंगणी !"
स्वतःचा संसार जाळून काय केले ? तर -हरिभजने हे धवळिले जग ।
चुकविला लाग कळिकाळाचा ।। तु. म. ।।
श्री समर्थ धोंडूतात्यांनी त्या पांगळ्या मनुष्याच्या डोक्यावरुन आपला हात फिरवला व त्यास उठून उभे राहण्यास सांगितले. तो काय चमत्कार....! त्या मनुष्याने उभे राहण्याचा प्रयत्न करताच तो सरळ उठून उभा राहिला. आपल्याला पाय मिळाले. माझा पांगळेपणा नाहीसा झाला म्हणून त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू स्त्रवू लागले. तो वेळोवेळा महाराजांच्या चरणाला लागू लागला. ही अघटित घटना पाहून सर्वाच्या अंगावर रोमांच थरारले. किती आश्चर्यजनक ही घटना !! धन्य तात्यांची करणी !!
हा सर्व प्रकार घडला. पण श्री समर्थ तात्या मात्र त्या ठिकाणाहून उठत नव्हते. कारण त्यांन उठून उभे राहण्यासाठी त्यांच्याकडे पायात शक्तीच राहीली नव्हती. त्यांच्या पायातील सर्वच शक्ती क्षीण होऊन गेली. अर्थात् त्यांनी आपले दोन्ही पाय त्या पांगळ्या मनुष्यास दिले. तेंव्हापासून म्हणजे तात्यांच्या क्याच्या ७४ व्या वर्षापासून ते पुढे समाधीपर्यंत श्री समर्थ धोंडूतात्या महाराज फक्त बसलेल्या अवस्थेतच राहिले. त्यांना उठून उभे राहता आले नाही. श्री तात्यांच्या अंगी परोपकाराची भूमिका कितपत आहे ? ही सत्वपरीक्षा घेण्यासाठीच तो पांगळा मनुष्य आला. श्री तात्यांनी त्याचे मनोगत ओळखून आपले दोन्ही पाय त्यास दिले. तेव्हा त्या भक्ताने श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या उपकाराची जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून रात्रंदिवस तात्यांचे नामस्मरण करीत तो तीर्थ यात्रेस निघून गेला. खरोखर संतांच्या अंगी परोपकाराची भूमिका किती विशाल स्वरुपाची असते ! म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणताततैसी बांधिली सोडीत । बुडाली काढीत ।
सांकडी फेडीत । आर्ताचिया ।। ज्ञा.म.
त्याप्रमाणे अविद्येने बध्द झालेल्या जीवांना मुक्त करीत, संसार सागरात बुडालेल्यांना वर काढीत, दुःखी लोकांची दुःखे संकटे नाहीसे करीत ही संत मंडळी था अवनीतलावर विहार करतात.संतांच्या अंगी त्रिविध प्रकारची शक्ती असते. म्हणूनच त्यांच्याकडून अशा अघटीत घटना घडतात.
३२. मेण्यामध्ये बसून प्रवास
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांनी आपले पाय भक्तास दिले. त्यामुळे त्यांना आता उठून उभा राहता येत नाही. ही वार्ता लोकांमध्ये चोहीकडे पसरली. त्याचप्रमाणे कंधार तालुक्यातील उंब्रज संस्थानच्या गादीवरील दुसरे महंत श्री लक्ष्मण महाराजांनाही ही हकीगत समजताच आपल्या काही शिष्य मंडळीसह ते विराळ येथे आले व श्री समर्थ तात्यांची भेट घेतली. दोघा संतांच्या भेटीमध्ये किती तरी प्रेमसुखाचा संवाद झाला. कारण दोन संत एकत्रित आले असता ते काय करतात ?
मच्चिता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्तिच रमन्तिच । भ.गी.
निरंतर माझ्या ठिकाणी मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे भक्तजन सदा सर्वदा माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परांना माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच माझेच कीर्तन करीत संतुष्ट होतात व माझ्या ठिकाणीच निरंतर रममाण होतात. असो.विराळग्रामी एक दिवसाचा मुक्काम करुन श्री लक्ष्मण महाराज उंबरजला जाण्यासाठी निघाले. त्या वेळी त्यांना श्री तात्या म्हणाले, 'मला आता उठून उभे राहता येत नाही. तेव्हा माइयाकडे आता घोडे ठेवून काय करावयाचे आहे ? तर हे घोडे माझ्यातर्फे भेट म्हणून तुम्ही घेऊन जा.'श्री तात्यांचे वचन मान्य करुन लक्ष्मण महाराजांनी घोडे घेऊन जाण्याचे ठरविले व जाते वेळी म्हणाले, 'महाराज तुम्हाला उभे राहता येत नाही. परंतु कुठे बाहेर गावी जाण्याची आवश्यकता भासली तर तुम्ही मेन्यामध्ये बसून प्रवास करा. तुमच्यासाठी एक मेणा पाठवून देतो. त्याचा तुम्ही स्वीकार करावा. अशी माझी विनंती आहे. तेंव्हा श्री तात्यांनी मेणा घेण्याचे कबूल केले व आपले घोडे लक्ष्मण महाराजांना सप्रेम भेट म्हणून दिले. तेव्हापासून उंब्रजसंस्थानी नेहमी दोन घोडे राहू लागले.थोड्याच दिवसांत श्री लक्ष्मण महाराजांनी आपल्या भक्ताकरवी एक उत्तम मेणा तयार करुन आपण स्वतः विराळगांवी येऊन श्री समर्थ तात्यांना तो मेणा देऊन परत स्वस्थानी गेले. तेव्हापासून म्हणजे इ.स. १९०४ (शके १८२६) सालापासनू अर्थात वयाच्या ७४ व्या वर्षापासून श्री समर्थ धोंडूतात्या महाराज मेण्यामध्ये बसून प्रवास करु लागले. श्री समर्थ तात्यांचा व उंब्रज संस्थानचे मूळपुरुष श्री नामदेव महाराज यांचा फारच घनिष्ठ संबंध होता. श्री नामदेव महाराजांनी तात्यांच्या बालपणी तात्यांच्या भविष्यकाळाविषयी बरेच बोलले होते. तसेच आपल्याला या महापुरुषापासून जीवनाची दिशा मिळाली आहे. ही कृतज्ञता मनामध्ये ठेऊन श्री समर्थ तात्या घोड्यावरुन अधून मधून उंबरज गावी जावून नामदेव महाराजांची भेट घेत होते.पुढे इ.स. १८८८ (शके १८१०) साली श्री नामदेव महाराज समाधिस्त झाले. त्यावेळी श्री तात्या उंब्रजला अंत्यविधी संस्कारासाठी उपस्थित राहिले होते. तेव्हा आचार संपन्न वैदिक ब्राम्हण म्हणून श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांना सर्वांनी मानाचे स्थान देऊन त्यांच्या शुभहस्ते अभिषेकविधी करुन दुसरे महंत म्हणून श्री लक्ष्मण महाराजांना संस्थानाधिपती करण्यात आले.(संस्थानाधिपती झालेल्या पुढील प्रत्येक महंतास मूळपुरुषाच्या नावावरुन ओळखले जाते.)
३३. श्री तात्यांचे अवतार कार्य
इहलोकांमध्ये श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचा अवतार कशासाठी झाला असेल ? तर श्री तुकाराम महाराजांच्या शब्दात प्रतिपादन करावयाचे झाले तर -
येथे उपकारासाठी । आले घर ज्या वैकुंठी ।। तु.म.
ब्रम्हस्वरुपामध्ये राहणारे हे महात्मे, ज्यांचा वैकुंठ हरीच आहे, त्या हरि स्वरुपामध्ये राहणारे हे महात्मे इहलोकांमध्ये केवळ लोकोपकाराकरिताच अवतीर्ण झाले किंवा
अवतार तुम्हा धराया कारण ।
उध्दराया जन जडजीव ।। तु.म.
साधूसंतांचा अवतार जड जीवांचा उध्दार करण्यासाठीच आहे. ज्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे जनमाणसांना योग्य मार्गदर्शन व उपदेश करुन प्रत्येकाला सुखी करणे, हा संतांचा स्वभाव आहे. हा जीव अनादी अविद्येने (मायेने) मोहीत होऊन जन्मावाचून जन्माला येतो आणि मरणावाचून मरण पावतो, अशी जन्ममरणाची अनर्थ परंपरा हा जीव भोगतो आहे. ही जीवाची केविलवाणी अवस्था पाहून, त्याची दया येऊन हे साधुसंत या अवनीतलावर अवतार धारण करुन या जीवाला अनर्थ परंपरेतून सदाचा मुक्त करण्याचे कार्य करतात.वास्तविक त्यांना स्वतःचे कोणतेही कर्तव्य शिल्लक राहिलेले नसते. तरीसुध्दा असे महात्मे लोकसंग्रहार्थ, जनहितार्थ म्हणून वेदबोधीत कर्माचे अनुष्ठान करतात आणि इतरांनाही तसे अनुष्ठान करावयास सांगतात. अशा शुध्द आचाराच्या महापुरुषाचे शब्द कोणीही उल्लघंन करु शकत नाहीत. त्या शब्द उल्लंघन न करण्याचा अर्थात त्यांच्या आज्ञा परिपालनाचा फायदा जर काही होत असेल तर बहिर्मुख समाज हा अपप्रवृत्तीपासून परावृत्त होऊन योग्य दिशेने सन्मार्गाने आपल्या जीवनाची वाटचाल करतो आणि भक्तिमार्गाने, परमार्थमार्गाने तो परमात्म प्राप्ती करुन घेऊन कल्याणाला प्राप्त होतो. तसेच संसारामध्ये असताना संतवचनावर विश्वास ठेवून पापपुण्याची जाणीव ठेवून, योग्य व मर्यादेने वर्तन करतो. अर्थात समाजाला सन्मार्गाला लावणे हे समर्थ तात्यांच्या अवतारातील मुख्य कार्य आहे.श्री समर्थ धोंडूतात्या महाराज अहर्निशी ध्यान, जप, पूजा, योगासने व सूर्यनमस्कार अशा परमार्थ साधनेमध्ये आपला काळ क्रमित असल्या कारणाने त्यांची कीर्ती चोहीकडे अधिकाधिक पसरु लागली. कारण
वाऱ्याहाती माप चाले सज्जनांचे ।
कीर्तिमुख त्याचे नारायण ।। तु.म.
सज्जनांची कीर्ती वायुवेगाने, कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे पसरते. त्याप्रमाणे श्री समर्थ तात्यांची कीर्ति पसरत असल्याकारणाने दूर दूरचे लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. तेंव्हा येणाऱ्या भक्तांची, श्रध्दा, भक्ती पाहून दयेने तात्या त्यांच्यावर प्रसन्न होऊन आपल्या भक्तजनांचे कोडे व संकट निवारण करु लागले.
अशी श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची महती, त्यांची तपश्चर्या व त्यांचे आचरण पाहून व ऐकून डोंगर शेळकी ग्रामवासी लोकांची दृढ भक्ती तात्यांच्या चरणी जडली. म्हणून काही मंडळी त्यांचे दर्शन घेण्यासाठी अधून मधून विराळगांवी जाऊ लागले. त्यामुळे डोंगरशेळकीच्या काही मंडळींचा व श्री समर्थ तात्यांचा चांगला परिचय झाला.
३४. श्री तात्यांना निमंत्रण
इ.स. १९२६ (शके १८४८) साली डोंगर शेळकी (ता. उदगीर) येथे श्री महादेवाच्या देवळाच्या पुढे ओट्यावर मोकळ्या जागेमध्ये सर्व बाजूंनी व्यवस्थितपणे आडोसा करुन त्यावर पत्राचा तात्पुरता साफ मंडप घालून प्रतिवर्षाप्रमाणे त्याही वर्षी श्रावणमासानिमित्त पांडवप्रताप ग्रंथ लावलेला होता. प्रती दिवशी नित्यनियमाने ग्रंथ वाचन चालू असताना सर्व गावकरी लहानथोर श्रध्दायुक्त अंतःकरणाने ग्रंथ श्रवणासाठी येत असत. आता थोड्याच दिवसात ग्रंथ समाप्ती होणार म्हणून सर्व थोर थोर मंडळी एकत्रित येऊन विचार करुन, ग्रंथ समाप्तीला गाव जेवण, परु-भंडारा करण्याचे ठरविले आणि आपल्या येथील ग्रंथसमाप्तीच्या व गावजेवणाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून अधिकार संपन्न असलेले अर्थात, शापदपि तपादपि परमपूज्य श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांना आपल्या गावी घेऊन यावे, असा सर्व ग्रामस्थांचा विचार झाला.
दुसऱ्या दिवशी डोंगर शेळकीहून दोन माणसे श्री तात्यांना आमंत्रण देण्यासाठी विराळगावी गेले. मठामध्ये श्री दत्तात्रयाचे दर्शन घेऊन तात्यांच्या भेटीच्या तीव्र लालसेने बैठकीच्या खोलीकडे गेले, पण खोली बंद होती. तेथे विचारपूस केल्यानंतर समजले की, धामणगांवला परु असल्याकारणाने तेथील लोकांनी महाराजांना घेऊन गेले आहेत. तेंव्हा ते दोघे धामणगावी गेले. तेथे श्री तात्यांची भेट झाली. त्यांचे दर्शन घेऊन आपण ग्रंथसमाप्तीस डोंगर शेळकीस यावे, म्हणून विनंती करु लागले. त्यावेळी श्री तात्यांनी मी सहाव्या दिवशी डोंगरशेळकीस येईन असे आश्वासन दिले तेव्हा हे दोघे आनंदीत होऊन परत आले. सर्व ग्रामस्थांना श्री तात्यांच्या आगमनाची वार्ता समजताच सर्व गावकरी अबालवृध्द आनंदीत झाले.
सहावा दिवस उजाडला. सकाळच्या वेळी डोंगरशेळकीहून तीस पस्तीस माणसे श्री तात्यांना आपल्या गावी आणण्यासाठी निघाले. जाते वेळी गावच्या मारुतीचे व महादेवाचे दर्शन घेऊन सर्व जण उल्हासाने चालू लागले. दुपारच्या सुमारास ते विराळगावी पोहोचले. श्री तात्यांचे दर्शन घेण्यासाठी सर्वजन बैठकीच्या खोलीमध्ये गेले. खोलीमध्ये श्री तात्या आणि काही भक्त मंडळी शास्त्रचर्चा करीत बसलेली होती. मुख्यासनावर श्री तात्या विराजमान सूर्यासारखे शोभून दिसत होते. ज्याप्रमाणे चांदण्यामध्ये पोर्णिमेचा चंद्र शोभावा; त्याप्रमाणे त्या मंडळीमध्ये तात्या तेजः संपन्न दिसत होते. गोरी अंगकांती, पांढरीशुभ्र किंचित दाढी, ओठाच्यावर पांढऱ्या मिशा, भालप्रदेशावर गंधाचे आडवे पट्टे, हातामध्ये रुद्राक्षांची माळ व अंगावर उत्तरीय वस्त्र आणि पंचाण्णव वर्षाची वयोवृध्द शरीराकृती; यामुळे ते फारच दिव्य व तेजस्वी दिसत होते.सर्वांनी तात्यांचे क्रमवार दर्शन घेतले व बाजूला बसून राहिले. नंतर समय पाहून तात्यांना निघण्याविषयी विनंती केली. तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यास बोलावून सांगितले की, आज आपल्याला डोंगर शेळकीला जावयाचे आहे. तरी तू निघण्याची सर्व तयारी कर. त्यावेळी त्याने निघण्याची सर्व तयारी करुन मेणा बाहेर काढला.
३५.समाजाला व्यसनापासून परावृत्त
डोंगरशेळकीहून आलेल्या मंडळींनी श्री तात्यांना मेण्याच्या जवळ आणले व त्यांना मेण्यामध्ये बसवणार.....! इतक्यांत श्री तात्या म्हणाले, मी मेण्यामध्ये बसल्यानंतर कोणती माणसे मेणा वाहणार-चालवणार ? ते मला सांगा पाहू. तेव्हा सर्व जण आम्ही चालवणार, असे म्हणू लागली. त्यांना श्री तात्या म्हणाले, माझा मेणा चालविण्यासाठी चांगली माणसे पाहिजेत अर्थात् पवित्र अंतःकरणाची, सद्वर्तनाची माणसे हवी आहेत. कोणी व्यसनी माणसांनी माझ्या मेण्याला स्पर्श करु नका. निर्व्यसनी माणसे पुढे या आणि माझा मेणा उचला ! तेव्हा जी काही मंडळी व्यसनी होती ती मागे मागे दडू लागली. आणि काही श्रध्दायुक्त अंतःकरणाने अनुतापयुक्त होऊन श्री तात्यांना म्हणाले, 'महाराज ! आम्ही आमच्या पूर्व संस्कारामुळे व काही दुष्ट लोकांच्या संगतीमुळे वाईट, निंद्य अशा व्यसनात प्रवृत्त झालो. पण आता आम्ही आपले पाय शिवून अर्थात शपथ वाहून प्रतिज्ञापूर्वक सांगतो आहोत की आम्ही आता यापुढे कोणत्याही वाईट व्यसनामध्ये गुंतणार नाही. इतकेच नव्हे तर आम्ही व्यसनी माणसांची संगती पण करणार नाही. आम्ही इथून पुढे चांगले वर्तन करु; आपण आमचा स्वीकार करावा.' अशी श्रध्दा, असा निश्चय व अनुताप पाहून श्री तात्या म्हणाले, "असे असेल तर मग तुम्हाला माझ्या मेण्याला स्पर्श करावयास परवानगी आहे." अशा अनुतापाने मनुष्याची शुध्दता होते. त्याचा अंगिकार देवही करतो. एखादा मनुष्य अत्यंत दुराचारी, पापी वर्तनाचा असलेला पण त्याला जर अनुताप होईल आणि तो असे ठरवील, असा निश्चय करील की, मी आता यापुढे दुष्कर्म करणार नाही. पुढील भविष्यत् जीवनात मी पवित्र आचरणाने वर्तन करीन, असे जर ठरविले तर भगवान म्हणतात.
अपिचेत्सुदुराचारो भजतेमामनन्य भाक् ।
स्ाधु रे व स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः।। भ.गी.
एखादा मनुष्य अत्यंत दुराचारी असला तरी अनन्य भक्त होऊन माझे भजन करु लागला तर तो साधूच समजला पाहिजे. कारण तो चांगल्या निश्चयाचा असतो.
श्री ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात
तो आधी जरी दुराचारी । तरी सर्वोत्तमचि अवधारी । जैसा बुडाला महापूरी । न मरतु निघाला || ज्ञा.म.
सर्वोत्तमच होतो, असे समजावे. जसा महापुरात बुडालेला तो पूर्वी जरी दराचारी असला, तरी नंतरच्या भक्तीच्या काळात मनुष्य न मरता बाहेर निघाला. अशी शुध्दता अनुतापाने होत असते. म्हणून तुम्हीही माझा मेणा वाहू शकता. मात्र बोलल्याप्रमाणे पुन्हा वर्तन करा. तेंव्हा सर्व जण म्हणाले, महाराज ! आपल्या मनोगताप्रमाणे आम्ही जन्मभर वर्तन करू. असे बोलत सर्वांनी श्री तात्यांच्या चरणावर मस्तक ठेवून क्षमा मागितली आणि पुढे आयुष्यभर कोणत्याही निंद्य व्यसनात प्रवृत्त न होता श्री तात्यांच्या मनोगताप्रमाणे वर्तन करुन त्यांची जवळीक साधले व त्यांच्या कृपेस पात्र झाले.
३६. भाग गेला शीण गेला
श्री समर्थ तात्यांनी डोंगर शेळकीच्या मंडळीस निघण्याची आज्ञा दिली. तेव्हा तात्यांना त्यांच्या शिष्यांनी अलगद उचलून मेण्यामध्ये बसविले. प्रथम माळकरी असलेली माणसे पुढे होऊन मेण्याच्या जवळ आली. पायामध्ये वाहणा तरी एकाच्याही नव्हत्या. कारण ही मंडळी घरुन निघाली त्या वेळीच पायामध्ये वाहाणा न घालता पावित्र्यामध्ये आलेली होती. मेण्याला स्पर्श करताच सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये पुंडलिक वरदा हरि विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाराम ।। असा भगवंताच्या नामाचा जयजयकार करुन मेणा उचलला व विराळगाव मागे टाकून दक्षिण दिशेच्या वाटेने हे सर्व जण भराभर पाऊलामागे पाऊले टाकत जलद गतीने, हर्षोत्फुल्ल अंतःकरणाने डोंगर शेळकीकडे चालू लागले. काही माणसे मेण्याच्या आजुबाजूला चालत असताना श्री तुकाराम महाराजादि संतांचे अभंग मोठ्या प्रेमाने म्हणू लागले व वेळोवेळा जयघोष करत मार्गक्रमना करु लागले. प्रत्येक मनुष्याला एका आगळ्या वेगळ्या आनंदाचा अनुभव आला. प्रत्येकाच्या अंतःकरणात उत्साहाचे प्रस्फुरण होऊ लागले. असा प्रत्येकाचा आनंद दुणावलेला होता त्याची दोन कारणे आहेत. पैकी पहिले या मंडळींना मिळालेले श्री तात्यांचे दर्शन व दुसरे मार्गक्रमण करीत असताना तात्यांचा वाटेचा लाभलेला सहवास ! या दोन कारणास्तव सर्वांना शीणभागविवर्जित आनंदाची प्राप्ती झाली. अशा आनंदाची प्राप्ती फक्त देवाच्या दर्शनाने किंवा संतांच्या दर्शनाने होत असते श्री तुकाराम महाराजांना भगवंताचे दर्शन झाले त्यावेळी ते म्हणतात.
आता कोठे धावे मन । तुड़झे चरण देखिलिया ।।१।। भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद ॥२॥ तु.म.
देवा, तुमच्या चरणारुपी स्वरुपाचा आत्मत्वाने साक्षात्कार झाल्यानंतर आता हे मन कोठे बरे धांव घेईल ? तुमच्या साक्षात्काराने माझा शीणभाग गेलेला असून सर्वत्र आनंदाची प्रतीती येत आहे तसेच श्री संत एकनाथ महाराजांना श्रीगुरु जनार्दन स्वामींचे दर्शन झाले त्यावेळी -
धन्य आजी दिन संत दर्शनाचा । अनंत जन्मीचा शीण गेला ।। ए.म.
महाराज म्हणतात, आजचा दिवस धन्य झाला. त्याचे कारण आज मला श्री संताचे दर्शन मिळाले. त्यामुळे माझा अनंत जन्माचा शीण नाहीसा झालेला आहे. म्हणजे देवदर्शनाने किंवा संतदर्शनानेच अशा सर्वोच्च आनंदाची प्राप्ती होते, असा सिध्दांत आहे. म्हणून अशा आनंदाची प्राप्ती श्री तात्यांच्या दर्शनाने व सहवासाने या मंडळीना झाली.
हे चरित्र आपल्याला शिकवते की संतांचे आशीर्वाद, भक्तिभाव आणि गुरुकृपा यामुळे जीवन परिपूर्ण होते.