
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवन चरित्र भाग 10
।। श्री गणेशाय नमः ।।
५५. विराळ सोडले
श्री समर्थ तात्यांनी आयोजित केलेला दत्तजयंतीचा कार्यक्रम चालू असताना त्यामध्ये काही लोकांनी प्रतिबंध निर्माण केले. बाहेरगावच्या सर्व भजनी मंडळींनी मिळून जयंती कार्यक्रम पार पाडला. काला झाल्यानंतर श्री तात्यांची आज्ञा घेण्यासाठी सर्व गावचे भजनी त्यांच्या समोर आले व दर्शन घेवून आज्ञा मागितले. तेंव्हा श्री तात्यांनी सर्वांना परवानगी दिली. सर्व भजनी आपापल्या गावी गेले. तसेच डोंगर शेळकीचेही भजनी मंडळीनी त्यांच्या समोर जावून आज्ञा मागितली. तेंव्हा त्यांनी आज्ञा न देता सर्वांना जवळ बसवून घेतले आणि म्हणाले, मला विराळवासी विरोध करत आहेत. कार्यक्रमात अडथळा आणतात, पिकामध्ये जनावरे सोडतात. त्यामुळे यांच्या अशा स्वभावाचा मला कंटाळा आलेला आहे. म्हणून इथे माझे मन रमत नाही. तेंव्हा मला विराळ नको आणि मठही नको, मला डोंगर शेळकीला यावयाचे आहे तर तुम्ही मला ताबडतोब घेवून चला. श्री समर्थ तात्यांचे असे शब्द ऐकल्याबरोबर डोंगरशेळकीच्या मंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्वांच्या बाह्या स्फुरण पावल्या. व अंतःकरणामध्ये आगळावेगळा सात्विक आविर्भाव प्रगट झाला तेंव्हा तात्याचे दर्शन घेत सर्व जण म्हणाले, महाराज, आमचे किती भाग्य ! पाहिजे होते तेच आणि मिळाले तेच !! चला आता आपण निघू. असे बोलून सर्व मंडळी सज्ज होऊन तात्यांना मेण्यामध्ये बसविले आणि सर्वांनी एकमुखाने पुंडलिक वरदा हरि विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाराम ।। असा गजर करुन मेणा उचलून चालू लागले.
५६. डोंगर शेळकीस वास्तव्य
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांना अगदी आनंदाने नामघोषणाच्या गजरात डोंगर शेळकीस घेऊन आले. सर्व लहान थोर ग्रामस्थांना त्यांच्या आगमनाने आनंदी आनंद झाला. सर्व जण तात्यांच्या सहवासात राहू लागले. व जेणेकरुन त्याच्या मनाला आनंद होईल असे आचरण करु लागले. सर्व जण त्यांच्या आज्ञेत वर्तन करुन लागले. त्यामुळे श्री तात्या प्रसन्न चित्ताने शेळकी ग्रामांमध्ये आपला काळ घालवू लागले आणि येथूनच अवतीभोवतीच्या खेड्यांना जावून भेटी देवून परत मुक्कामाला डोंगरशेळकीमध्येच राहू लागले. कारण तात्यांना डोंगर शेळकी रहिवासास आवडली. श्री समर्थ तात्यांचे आचरण फारच शुध्द होते. नेहमी सोवळ्यांमध्ये पूजा, सोवळ्यांतच स्वयंपाक व सोवळ्यांतच भोजन अशी त्यांची आचारसंहिता असल्या कारणाने गांवातील काही प्रतिष्ठित मंडळीनी विचार करुन ब्राम्हणाच्या घरी राहण्याची त्यांची व्यवस्था करण्यात आली. गांवातील सर्व भाविक भक्त त्यांच्या दर्शनानिमित्त ब्राम्हणाच्या वाड्यामध्ये सतत तात्यांच्या समीप राहू लागले. या घरधनी ब्राम्हणाचा स्वभाव चिडखोरपणाचा असल्याकारणाने दोन महिने कसे तरी निवांत राहिले. पण त्यांना ही वर्दळ सहन होईनासी झाली त्यावेळी त्यांना वाटले की आपण संपत्तीवान आहोत आणि आपल्या घरी येणाऱ्या कोण्या माणसाचा स्वभाव कसा असेल ? काही सांगता येत नाही. बरीच माणसे येऊन गर्दी करतात तेंव्हा कोणी जर आपली एखादी वस्तू घेऊन गेले तर काय करावे ? असा संशय येवून ते रागावले आणि काही मंडळीच्या समोर श्री तात्यांना म्हणाले," महाराज, तुमच्यामुळे आमच्या घरी या लोकांनी वर्दळ दिलेली आहे. त्यामुळे आम्हांला त्रास होत आहे. तेंव्हा तुम्ही आपली व्यवस्था दुसरीकडे कुठेही करा; पण आमच्या इथे थांबू नका.” असे बोलत ते बडबड करु लागले. तात्यांच्या जवळ असलेली मंडळी हे सर्व ऐकून थक्कच झाली आणि संपत्ती मनुष्याला कशी अंध बनवते असे वाटून ब्राम्हणाच्या स्वभावाची निंदा करु लागले. कारण संपत्ती मनुष्याला गर्वाच्या आणि आढयतेच्या भोवऱ्यात ओढते. त्याचप्रमाणे या ब्राम्हणालाही झाले. कारण आपली संपत्ती चोरली जाईल; म्हणून श्री समर्थ तात्या सारख्या थोर तपस्वी महात्म्याला वर्दळ म्हणून घराबाहेर काढत आहेत. ही कसली दुर्बुध्दी!! आपल्या घरी कामधेनू गाय आली असता तिला कांठी मारुन बदाडून लावावे. किंवा चिंतामणी हातामध्ये आला असता, तो दगड म्हणून फेकून द्यावा. त्याप्रमाणे या ब्राम्हणाचे झाले, असा विचार सर्व मंडळी करु लागली आणि शेवटी सर्वांनी श्री तात्यांना मेण्यामध्ये बसवून त्या वाड्याच्या बाहेर निघाले व बस्तापुरे यांच्या घरी त्यांची राहण्याची व्यवस्था केली. श्री समर्थ तात्या वाड्याबाहेर पडल्यानंतर त्या ब्राम्हणास किती तरी पश्चाताप झाला. मी उगीच त्यांना बाहेर काढले. ते उन्हाच्या वेळी भर दुपारी घराबाहेर निघाले. आपले किती दुर्दैव म्हणावे ! असा विचार करुन ते फारच पश्चातापामध्ये पडले. (श्री तात्या चैत्र महिन्यामध्ये दुपारी बारा वाजता ब्राम्हणाच्या वाड्यातून बाहेर पडले.)
५७. डोंगर शेळकीस पाणी
प्रतिवर्षी वैशाख महिन्यामध्ये डोंगर शेळकीची नदी व विहीरी कोरड्या पडून जवळपास पाणी नसल्याकरणाने गावकऱ्यांचे व गुराढोरांचे फारच हाल होत होते. पाच सहा कि.मी. आंतरावर कोठेही पाणी नव्हते. शेजारच्या गावाहून पाणी आणावे लागत होते आणि गुरा ढोरांना पाणी पाजण्यासाठी तेथेच न्यावे लागत होते. तसेच आणलेले पाणी फारच तोलून व जपून वापरावे लागत होते. अर्थात लहान मुलालेकरांना बाजेवर (चौपाईवर) इसवून स्नान घालत असत व ते पाणी जमीनीवर न सांडू देता खाली ठेवून टोपलीमध्ये सांठवून तेच पाणी सडा सारवणाकरीता वापरत असत. असा पाण्याचा प्रतिवर्षी एक दीड महिना त्रास होत होता. काही मंडळी श्री समर्थ तात्यांच्या सान्निध्यांत बसून त्यांना म्हणाले, महाराज आपल्यापासून क्षणभरही बाजूला परता होवू नये असे वाटते आहे; परंतु आम्हाला बाहेरुन पाणी आणावे लागत असल्याकारणाने आमची फारच बेजारी व हाल होत आहेत. तसेच बराच वेळ वाया जात आहे. प्रतिवर्षी एक दोन महिने आम्हां दुरून पाणी आणावे लागत असल्याकारणाने हे दिवस आमचे त्रासाचे जातात. हा आमचा त्रास केंव्हा कमी होईल असे आम्हाला ग्रामस्थांना वाटत आहे. अशी या लोकांची केविलवाणी अवस्था पाहून श्री समर्थ तात्यांना दया आली आणि ज्याप्रमाणे मेघ राजा प्रसन्न होऊन चातक पक्ष्यावर जलधाराचा वर्षाव करावा, त्याप्रमाणे श्री तात्या प्रसन्नतेने म्हणाले, तुम्हाला पाण्याविषयी काळजी करण्याचे काहीही कारण नाही. गावाच्या दक्षिणेस काही अंतरावर गुप्त पाण्याचा झरा आहे. तुम्ही तेथे पाच फूट जमीन खोदून छोटा हिरा (खट्टा) काढा. तुमच्या गावाला पुरेल एवढे पाणी तेथे आहे. जा लवकर कामाला लागा. अशी तात्यांची आज्ञा झाल्याबरोबर सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले. आपल्यासोबत हळद-कुंकू, साखर व नारळ घेऊन जाऊन तात्यांनी खूण सांगितलेल्या जागेवर पूजा करुन नारळ फोडले व सर्वांनी एका आवाजात - पुंडलिक वरदा हरि विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाराम ।। असा देवाच्या नामाचा गजर करुन हीरा (खड्डा) खोदू लागले. थोड्याच वेळात भरपूर पाणी लागले. सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. काही मंडळीनी वाजंत्री बोलावले. सर्व नवतरुणांनी भरलेल्या घागरी खांद्यावर घेऊन नाचत, गर्जना करीत गावच्या मारुतीला व महादेवाला पाणी घालून श्री तात्यांच्याकडे आले आणि त्यांच्या चरणावरही ते पाणी ओतून त्यांचे पाय धुतले व ते चरणतीर्थ सर्वांनी घेतले. आजूबाजूच्या सर्व परिसरात श्री समर्थ तात्यांनी डोंगर शेळकीला पाणी दिल्याची शुभवार्ता पसरली. सर्व लोक नवल करुन लागले. डोंगर शेळकी निवासी तर खुपच आनंदीत झाले. ज्यावेळी श्री तात्यांनी डोंगर शेळकीला पाणी दिले त्यावेळेपासून गावाला पाणी आणण्याचा प्रतिवर्षी उन्हाळ्यामध्ये होणारा त्रास तो नाहीसा झाला. अर्थात तेंव्हापासून गावाला पाण्याचा दुष्काळ राहिलेला नाही आणि आता तर श्री तात्यानी खूण सांगितलेल्या जागेवर म्हणजे महाराजांचा हिरा म्हणून प्रसिध्द असलेल्या त्या जागेवरच शासनातर्फे विहीर खोदून त्याच विहीरीचे पाणी नळयोजनेने गावाला पुरविले जात आहे अर्थात् हे पाणी श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या प्रसादाचे, कृपेचे आहे.
५८. श्री तात्यांचे उपकार
श्री समर्थ तात्यांनी आपल्या स्वेच्छेने प्रेरित होऊन डोंगर शेळकीला पाणी देऊन दुरून पाणी आणण्याचा त्रास नाहिसा केला. कारण दुःख हरण करण्याच्या कामी तत्पर असणे हा साधू महात्म्यांचा स्वभाव आहे. जसा चंद्र, सूर्याच्या प्रखर किरणांनी तप्त झालेल्या पृथ्वीस आपल्या शीतल किरणांनी शांती देऊन तिचे रक्षण स्वयंप्रेरणेनेच करीत असतो. त्याप्रमाणे जीवांचे दुःख निवारण करणे हा साधूंचा स्वभाव आहे. तसेच ऋतू ज्या प्रमाणे आपल्या आगमनाने सृष्टीला नवजीवन प्राप्त करुन देतो त्या प्रमाणे संत हे सर्व लोकांचे कल्याण करीत असतात. असे परोपकारी संत असतात. श्री तात्यांचे आपल्यावर अनंत उपकार झाले आहेत. त्यांच्या उपकारातून आपण केव्हाही उतरायी होणार नाही. असे डोंगरशेळकीच्या ग्रामस्थांना वाटू लागले. खरेच, संतांनी केलेल्या उपकाराची परतफेड कोणीही, केव्हाही व कसेही करु शकत नाही. या संदर्भात विषय प्रतिपादन करतेवेळी श्री तुकाराम महाराजांनी आपण स्वतः एका मुमुक्षूची भूमिका घेऊन संतांच्या उपकाराचे बहारदारीचे वर्णन केलेले आहे. ते त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर - काय सांगो आता संतांचे उपकार । मजनिरंतर जागविती ।।१।। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई । ठेविता हा पायी जीव थोडा ।।२।। सहज बोलणे हीत उपदेश । करुनि सायास शिकविती ।।३।। तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती । तैसे मज येती सांभाळीत ।।४।। तु.म. अशा उपकाराची परतफेड हा जीव कोणता मोबदला देऊन फेडणार ? शक्य नाही. परंतु त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून प्रामाणिकपणे वर्तन करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. श्री समर्थ तात्यांनी भूमीमध्ये गढून असलेल्या गुप्त पाण्याचा झरा दाखवून गावाला पाणी देऊन सुखी केले. इतकेच नव्हे तर संस्कृतमध्ये पाण्यास "जीवन" म्हणतात आणि मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या काळालाही "जीवन" म्हणतात. हे मानवी जीवन सुखी व समृध्द करण्यासाठी त्यांनी "जीवन" म्हणजे काय ? त्यांचे खरे मूल्य दाखवून सर्वांना सुखी केले. आपण श्री तात्यांच्या उपकारातून केव्हाही उतराई होणार नाही, असे डोंगर शेळकीच्या सर्व ग्रामस्थांना वाटू लागले.
५९. वडिलांच्या पुण्यतिथीस सप्ताह
श्री समर्थ धोंडूतात्या महाराज विराळगावी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिवर्षी वैशाख वद्य प्रतिपदेपासून ते वैशाख वद्य अष्टमी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह साजरा करीत होते. तो नेस आता डोंगर शेळकीमध्ये करावयाचे ठरवून त्यांनी गावातील सर्व लहान थोरांना अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी करण्यास सांगितले. तसेच अवती भोवतीच्या आपल्या भक्त मंडळींनाही सांगून ठेवले. श्री समर्थ तात्यांची आज्ञा शिरसा मान्य करुन सर्व जण सप्ताहाच्या तयारीस लागले. प्रत्येकाचा पाऊल जमिनीवर ठरत नव्हता. असा उल्हास, उत्साह सर्वामध्ये निर्माण झाला. त्याचे कारण तात्यांनी गावाला पाणी दिले. लहान थोरांची बेजारी - हैराणी चुकविली. म्हणून सर्व जण काया, वाचा, मनाने त्यांचे अनन्य सेवक होऊन त्यांनी आयोजित केलेल्या सप्ताहाची सर्व कामे आळस न करता भराभर करु लागले. काही माणसे उंबरजगावी श्री एकनाथ महाराजांना आमंत्रण देण्यास पाठविले. तेव्हा सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी येण्याचे उंबरजकरांनी कबूल केले. वैशाख वद्य प्रतिपदा शके १८४९ (इ.स.१९२७) या दिवशी सप्ताहाची सुरुवात झाली. भजन कीर्तनाने गगन दुमदुमून गेले. लहान थोरांच्या अंतःकरणात एक आगळा वेगळा आनंद निर्माण झाला. सर्व जण देवाच्या भजनात तल्लीन झाले. लहान थोर प्रत्येक जन सभामंडपामध्ये पाहाऱ्याचा वीणा आपल्या गळ्यामध्ये घेऊन 'रामकृष्णहरी' नामाचा जप करु लागले. सर्व भजनी मंडळी दररोज रात्रभर हरिजागर करु लागले. रात्री ठरलेल्या कीर्तनाला सर्व भाविक भक्त उपस्थित राहू लागले. दिन रजनी हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ।। तु.म. श्री तुकाराम महाराजांच्या या उक्तीप्रमाणे त्या नामसप्ताहामध्ये सर्व ग्रामवासियांचा धंदा अन्य कोणताही न राहता भजन, पूजन व श्रवण हाच होवून बसला. अशा हरिभजनाच्या आनंद गजरात वावरत टाळकरी टाळ मृदंगाच्या तालावर वेगवेगळे पाऊल धरुन नाचू लागले. सप्ताहामध्येखूपच रंग देवता अवतरली.
६०. श्री तात्यांचे दर्शन व महाप्रसाद
वैशाख वद्य सप्तमीचा दिवस उजाडला. आज सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणून प्रत्येकाच्या द्वारामध्ये सडा व रांगोळ्या शोभून दिसू लागल्या. आज गावजेवण म्हणून सर्व सामुग्रीची जुळवा-जुळव करण्यात आली. आणि पहाटे स्वयंपाकास प्रारंभकेला. स्वयंपाक वरण भाताचा होता. गावच्या बाहेरच्या बाजूला एका मोकळ्या जागेमध्ये काही पत्रांचा मांडव घालून त्याखाली स्वयंपाकाची व्यवस्था करण्यात आली. अवती भोवतीच्या सर्व खेड्यांना व शिवभाऊच्या लोकांना असे समजले की, हा सप्ताह श्री समर्थ तात्यांनी त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्ताने सुरु केलेला आहे आणि शेवटच्या दिवशी श्री एकनाथ महाराज उंबरजकर या समारंभास उपस्थित राहणार आहेत. अशी वार्ता सर्वांना समजली. तसेच भोवतालच्या काही प्रतिष्ठित मंडळीना आमंत्रनेही होती. त्यामुळे त्या आमंत्रणाच्या मंडळी बरोबर त्या त्या खेड्यातील व वस्तीतील आबाल वृध्द श्री समर्थ तात्यांच्या दर्शनानिमित्त डोंगर शेळकी गावी एकत्र जमा झाले. जिकडे तिकडे माणसांची गर्दीच गर्दी झाली. स्वयंपाकाचा आराखडा डोंगर शेळकी गाव व आमंत्रणाची इतर मंडळी असा गृहित धरुन करण्यात आला. परंतु स्वयंपाक पूर्ण तयार होईपर्यंत गृहित धरलेल्या, कल्पनेने ठरविलेल्या जन समुदायापेक्षा तीन चार पटीने अधिक समाज जमा झाला. आलेल्या सर्व भाविकांना श्री समर्थ तात्या म्हणाले की, आपण कोणीहि भोजन केल्याशिवाय जावू नये. असे ऐकून सर्व आबाल वृध्द आनंदीत झाले. आणि सर्व मंडळी महाप्रसाद घेण्यासाठी थांबून राहिले. कारण संताचा प्रसाद जो मिळतो तो सभाग्यालाच मिळतो. इतरांना तो मिळणे शक्य नाही. जो कोण भाग्यवान, साधनचतुष्ट्य संपन्न असेल अर्थात विवेक, वैराग्य, शमादि षट्क व मुमुक्षत्व, अशा संपत्तीने युक्त असलेल्या साधकास श्री गुरु संत हे ब्रम्हरसाचे भोजन देत असतात. ज्या ब्रम्हरसाच्या सेवनाने जीवाची येरझार संपते. आणि सकल दुःखाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती होते. असा ब्रम्हरस प्राप्त करुन घ्यावयाचा असेल तर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी तनुमनुजीवे । चरणासी लागावे । अगर्वता करावे । दास्य सकळ ।। मग अपेक्षित जे आपुले । तेहि सांगती पुसिले । जेणे अंतःकरण बोधले । संकल्पा नये ।। ज्ञा.म. तरी शरीराने, मनाने व जीवाभावाने संतांच्या चरणांना नमस्कार करावा, आणि निरभिमानपणाने त्यांचे सर्व प्रकारचे दास्य करावे मग आपल्याला जे आत्मज्ञान अपेक्षित असते त्या संबंधी प्रश्न केला असता ते संत ज्ञान सांगतात, की ज्यांच्या सांगण्याने अंतःकरण ज्ञानसंपन्न होऊन पुनश्च संशयविपर्यासाला प्राप्त होत नाही. अर्थात हे सर्व प्राप्त होते. परंतु अशी संतसेवा संसारिक जीवास घडणे प्रायः शक्य नाही. "नव्हे गुरुदास्य संसारिया" ।। तु.म. म्हणून हे संसारिक जीव आपल्या समाधानासाठी व इच्छापूर्तीसाठी एखाद्या तपस्वी महात्म्यांचे दर्शन घडून त्यांच्या हाताचा प्रसाद आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा व आपला संसार सुखाचा व्हावा; या हेतूने श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे दर्शन व त्यांचा प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविकांचा समुदाय गोळा झाला.
हे चरित्र आपल्याला शिकवते की संतांचे आशीर्वाद, भक्तिभाव आणि गुरुकृपा यामुळे जीवन परिपूर्ण होते.